Wednesday, 23 April 2014

गोपाळ कृष्ण गोखले

Gopal Krushna Gokhale

नामदार गोपाळ कृष्ण गोखले.......

‘राजकारणाचे आध्यात्मिकरण’ ही अद्वितीय संकल्पना भारतात मांडणारे; सार्वजनिक जीवनात स्वत: ही संकल्पना आचरणात आणणारे एक ‘आदर्श भारतसेवक’!’झाले बहु होतील बहु; परंतु या सम हा’ ही उक्ती ज्यांच्या बाबतीत सार्थ ठरते असे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे सुरुवातीच्या काळातील मवाळ, सनदशीर नेते व आदर्श भारतसेवक म्हणजे नामदार गोपाळ कृष्ण गोखले होत.

१८८४ मध्ये बी.ए. (गणित) पदवी घेऊन जानेवारी, १८८५ मध्ये पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्यांनी शिक्षकाची नोकरी स्वीकारली. पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्यत्व, फर्ग्युसन कॉलेजमध्ये अध्यापन, १८९५ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर फेलो म्हणून नियुक्ती असा प्रवास सुरू असतानाच भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या माध्यमातून त्यांचा सार्वजनिक जीवनात प्रवेश झाला. सार्वजनिक सभेचे सचिव म्हणूनही त्यांनी काही काळ कार्य केले. शेतकर्‍यांचे कर्ज, दुष्काळ व सावकारांचा त्रास आदी विषयांचा सखोल अभ्यास करून सरकारकडे निवेदने पाठवणे, त्याबाबत पाठपुरावा करणे-अशा महाराष्ट्रातील शेतकर्‍यांविषयक करण्यात येणार्‍या कार्यात त्यांनी शिस्त निर्माण केली. त्यामुळे त्यांच्या निवेदनांना सर्वत्र मान्यता मिळाली.

१८८९ मध्ये कॉंग्रेसच्या व्यासपीठावर केलेल्या पहिल्या भाषणापासून त्यांचा कॉंग्रेसशी संबंध प्रस्थापित झाला. आयुष्याच्या अखेरीपर्यंत ते कॉंग्रेसशी एकनिष्ठ राहिले. कॉंग्रेसचे ते राष्ट्रीय पातळीवरील नेते म्हणून गणले जात. डिसेंबर, १९०५ मध्ये बनारस येथे भरलेल्या कॉंग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. त्यांनी कॉंग्रेसचे कार्य भारतात व इंग्लंडमध्येही केले. भारताच्या सेवेसाठी तरुण त्यागी, निष्ठावान कार्यकर्ते घडवण्याच्या उद्देशाने १३ जून, १९०५ रोजी त्यांनी भारत सेवक समाजाची (The Servants of India Society) स्थापना केली. मुंबई प्रांताच्या विधिमंडळाचे सभासदत्व, सन १९०२पासून मध्ये केंद्रीय कायदेमंडळाचे सभासदत्व अशी अनेक मानाची पदे त्यांनी भूषविली. ते प्रदीर्घ काळ केंद्रीय कायदे मंडळाचे सभासद होते. सभागृहात अर्थसंकल्पावरील भाषणे गाजविणे हा तर त्यांचा हातखंडा होता.ते भारतातील पहिल्या श्रेणीचे अर्थतज्ज्ञ होते.
त्या काळी भारतातील ब्रिटिश राज्याच्या वाढत्या खर्चाची चौकशी करण्यासाठी लॉर्ड वेल्बी यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या आयोगासमोर गोखले यांची साक्ष अतिशय महत्त्वाची ठरली होती. या बुद्धिमत्तेच्या व गाढ व्यासंगाच्या आधारे दिलेल्या साक्षीमुळे त्यांचे नाव महाराष्ट्रात किंवा भारतातच नव्हे, तर परदेशातही प्रसिद्ध झाले.
न्यायमूर्ती रानडे यांच्या आर्थिक व राजकीय विचारांचा गोखले यांच्यावर विशेष प्रभाव होता. ते न्यायमूर्ती रानडे यांना आपल्या गुरुस्थानी मानत; तर गोखले यांच्या अंगी असलेल्या शुचिता, नैतिकता, तत्त्वनिष्ठता, सौजन्यशीलता व नि:स्वार्थी सेवावृत्ती आदी गुणांनी प्रभावित होऊन महात्मा गांधीजी त्यांना (गोखले यांना) गुरुस्थानी मानत असत. गांधीजी त्यांना ‘महात्मा गोखले, धर्मात्मा गोखले’ म्हणत.

भारतात सर्वप्रथम कायद्याचे राज्य, शांतता, सुव्यवस्थेचे प्रस्थापन, आधुनिक विचारांचे केलेले बीजारोपण, देशात केलेल्या अनेक सुधारणा यांमुळे इंग्रजी सत्तेविषयी त्यांचे धोरण मवाळ होते. कोणतीही चळवळ कायद्याच्या चौकटीतून करणे, स्वदेशीच्या वापरातून आपल्या देशातील उत्पादनास चालना देऊन आर्थिक उद्दिष्ट साध्य करणे असे त्यांचे विचार असत. गोपाळ गणेश आगरकरांनी सुरू केलेल्या ’सुधारक’ च्या इंग्रजी आवृत्तीची जबाबदारी नामदार गोखले यांनी काही काळ सांभाळली. सार्वजनिक सभा, राष्ट्रसभा समाचार या वृत्तपत्रांतूनही त्यांनी लेखन केले. वृत्तपत्रातील लिखाणाद्वारे ते समाजसुधारणांचा सतत पाठपुरावा करत.

‘राजकारणाचे आध्यात्मिकरण’ ही अतिशय वेगळी (परंतु कोणत्याही स्तरावरील, क्षेत्रातील राजकारणात सर्वकाळ अत्यावश्यक असणारी) संकल्पना त्यांनी भारतात मांडली. राजकारण हे साधन शुचितेला महत्त्व देऊन, सेवाभावाने करायचे विशेष कार्य आहे , असे त्यांचे ठाम मत होते. चारित्र्य, नैतिकता, नि:स्वार्थी वृत्ती या सद्गुणांचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला, स्वत:चे आदर्श उदाहरणही तत्कालीन नेत्यांसमोर व जनतेसमोर ठेवले.

संपूर्ण आयुष्य राजकारणात राहूनही ’राजकारण’ न करता विशुद्ध सार्वजनिक जीवन जगणार्‍या या महाराष्ट्राच्या सुपुत्राचे वयाच्या अवघ्या ४९व्या वर्षी निधन झाले.

रत्नागिरी जिल्ह्यातील कोतळूक या खेड्यात जन्मलेल्या गोखले यांचे बालपण कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षणही येथेच झाले. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे वडीलबंधू गोविंदराव यांनी स्वत:चे शिक्षण सोडून आणि त्यांच्या वहिनींनी स्वत:चे दागिने विकून केलेल्या त्यागामुळे त्यांचे उच्च शिक्षण कोल्हापूरचे राजाराम कॉलेज व मुंबईचे एलफिन्स्टन कॉलेज येथे होऊ शकले.

तात्या टोपे

Tatya Tope

तात्या टोपे...............

                    १८५७ च्या स्वातंत्र्यसमराच्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्याचा पाया रचणारे एक लढवय्ये सरदार! 

                     हिंदुस्थानातल्या राष्ट्रभक्तांनी ब्रिटिश शासकांविरुद्ध पुकारलेले १८५७ चे स्वातंत्र्यसमर ही इतिहासातील एक धगधगती घटना. सैनिकांमध्ये असंतोष पसरून १८५७ ची ठिणगी पडली. या लढ्याच्या पार्श्र्वभूमीवर एक मराठी नाव सुवर्णाक्षरांनी कोरले गेले. अवघ्या महाराष्ट्राची मान ताठ करणारे हे नाव म्हणजे पेशव्यांचे सेनापती तात्या टोपे. स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान मोठे होतेच, तसेच त्यामध्ये तात्यांचे स्थानही तेवढेच मोठे होते. 

                     १८१४ मध्ये नाशिक जिल्ह्यातील येवल्यातला त्यांचा जन्म. पांडुरंग टोपे यांच्या आठ अपत्यांपैकी तात्या हे दुसरे अपत्य. त्यांचे मूळ नाव रघुनाथ. त्यांचे नाव रामचंद्र असेही ठेवण्यात आले होते. रघुनाथचे वडील पेशव्यांकडे दानाध्यक्षाचे काम पाहण्यासाठी ब्रह्मावर्तास येऊन राहिले. पर्यायाने रघुनाथचे अर्थात तात्यांचे बालपण नानासाहेब पेशवे आणि राणी लक्ष्मीबाई यांच्याबरोबर गेले. पुढे बरीच वर्षे नानांच्या दरबारात तात्या कारकुनी कामांत गुंतलेले होते. १८५७ च्या समरात ग्वाल्हेरहून तात्यांनी आणलेल्या सैन्यावर मुख्य सेनापती म्हणून नानासाहेबांनी त्यांचीच निवड केली. त्या वेळी तात्यांच्या कर्तृत्वाचा कस लागला. कानपूरवर चढाई करण्यासाठी तात्या सज्ज झाले. 


                   १८५७ मधील दिल्ली, लखनौ, जगदीशपूर व कानपूर या ठिकाणच्या उठावांचे सूत्रधार तात्या टोपेच होते. त्यांचा धाडसी स्वभाव, गनिमी काव्याचे अवगत तंत्र, स्वदेशावरची श्रद्धा आणि स्वामिनिष्ठा यांच्या बळावर त्यांच्या तलवारीला धार आली होती. कानपूर, लखनौ, झाशी असे कूच करताना तात्यांचा पराक्रम पणाला लागला. कमकुवत सैन्य, नियोजनाची कमतरता, पैसा-रसद-तोफा या साधनांची कमतरता असताना त्यांना यशापयशाची चव चाखायला लागत होती. पण तात्यांची ध्येयासक्ती प्रचंड होती. 

                       नानासाहेब पेशवे यांचा अज्ञातवास, ग्वाल्हेरच्या लढाईत राणी लक्ष्मीबाईंचा पराभव या पार्श्र्वभूमीवर एकच मराठी वाघ शत्रूला तोंड देत होता. शत्रूवर जरब बसवत, वेळोवेळी इंग्रजांच्या तावडीतून सुटून पुढचे ध्येय गाठण्याचा त्यांचा यत्न इंग्रजांना मेटाकुटीला आणत होता. तात्यांच्या या पराक्रमाची गाथा जगभर पसरली. काही युरोपियन इतिहासकारांनी तात्यांच्या शौर्याचा गौरव त्या काळी केला होता.

                           तात्यांची एकाकी झुंज थकली, जिंकण्याची आशा लोपली. इंग्रजांपुढे वाकायचे नाही हा निश्र्चय मात्र कायम होता. तात्या शत्रूपासून बचाव करताना मानसिंग या मित्राच्या आश्रयाला गेले. तात्यांच्या पराक्रमाला थिटी पाडणारी घटना घडली, तात्यांचा मागमूस काढणारी इंग्रजी फौज मानसिंगापर्यंत पोहोचली. मानसिंगाची फितुरी नडली आणि तात्या इंग्रजांचे कैदी झाले.

                          ७ एप्रिल, १८५९ रोजी आरोपांना उत्तर देताना तात्यांच्या चेहेर्‍यावर भीती नव्हती, अपराधीपणा नव्हता, दु:ख तर नव्हतेच, होता तो देशाभिमान अन्‌ हौतात्म्याचे समाधान! १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धातल्या होमकुंडात तात्यांची शेवटची आहुती पडली. १८ एप्रिल, १८५९ रोजी त्यांना मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे फाशी देण्यात आले. या ठिकाणीच त्यांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे. महाराष्ट्राचे ऊर दु:खाने पण अभिमानानेही भरून आणणारी ही घटना तात्यांसारख्या मराठी वीराची ख्याती जगभर पसरवून गेली. 

बाजीराव पेशवे

श्रीमंत बाजीराव पेशवे / Bajirav Peshave

छत्रपती शिवाजी महाराजांनंतर मराठी मुलखात जणू तेवढाच आत्मविश्र्वास व
स्वराज्यनिष्ठा निर्माण करणारा ‘संस्थापक पेशवा’!
दिल्लीच्या तख्तापर्यंत धडक मारणारा एकमेव मराठी लढवय्या म्हणजे श्रीमंत बाजीराव पेशवे. १७ एप्रिल,१७२० रोजी ; वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी पेशवाईची सूत्रे बाजीरावांच्या हाती आली. तल्लख बुद्धीने डावपेचांची आखणी करून आणि अद्वितीय शौर्याने त्याची अंमलबजावणी करून अवघ्या २० वर्षांत बाजीरावांनी मराठ्यांच्या नेतृत्वाला मराठी मुलखाच्या बाहेर प्रवेश मिळवून दिला. दक्षिणेत मराठ्यांचे नेतृत्व संपादणे व उत्तरेत मराठी सत्तेचा विस्तार करून सार्‍या बुंदेलखंडात मराठ्यांचा दबदबा निर्माण करणे ही बाजीरावांची महत्त्वाकांक्षा होती आणि ती त्यांनी बहुतांशी पूर्ण केली.
बाजीरावांनी १७२५ ते १७२७ ह्या काळात दक्षिणेत मराठ्यांचे नेतृत्व निर्माण केले. ह्याच वेळी निजामाने पुण्यावर हल्ला केल्याने त्यांना गुजरात दौरा अर्धवट सोडून यावे लागले. पण बाजीराव निजामाच्या मुलखात घुसल्याने स्वत:च्या मुलखाच्या रक्षणासाठी निजामाला पुण्यातून पळ काढावा लागला. १७२८ साली पालखेड येथे पराभव पत्करून निजामाने मुंगी-शेगांवचा तह केला, त्याचे पूर्ण खच्चीकरण झाले. अत्यंत मुत्सद्देगिरीने लढलेल्या या लढाईपासूनच बाजीरावांची ख्याती गनिमीकाव्याचा प्रभू म्हणून झाली. १७३८ साली दिल्लीच्या रक्षणासाठी पातशाहने जेव्हा निजामाची मदत घेतली. त्या वेळीदेखील बाजीरावांनी भोपाळ येथे निजामाचा दारूण पराभव केला. नाईलाजाने निजामाला पुन्हा तह करावा लागला. या तहान्वये नर्मदा आणि चंबळमधील प्रदेश मराठ्यांच्या ताब्यात आला. भोपाळचा विजय म्हणजे बाजीरावांच्या कर्तृत्वाचा परमोच्च बिंदू होता. या विजयाने ते ‘हिंद-केसरी’ बनले, अर्थात यापूर्वीच पालखेड-डभईच्या विजयाने ते ‘महाराष्ट्र-केसरी’ बनलेलेच होते.

थोरल्या बाजीरावांनी मराठी सत्तेचा झेंडा उत्तरेत फडकविल्याने जसे त्यांना बृहत्तर महाराष्ट्राचा संस्थापक म्हटले गेले, तसेच ते पुण्याचेही संस्थापक पेशवा आहेतच. उत्तरेकडील मोहिमांसाठी पुणे शहर सोईचे वाटल्याने त्यांनीच छत्रपती शाहू महाराजांची मर्जी संपादून पुणे हे आपले निवासस्थान बनविले. त्यांनी बांधलेला भव्य शनिवारवाडा हा त्या काळी देशाच्या राजकारणाचा मध्यबिंदू बनला.

अशा ह्या धोरणी, कर्तृत्ववान थोरल्या बाजीरावाचे वर्णन करतांना यदुनाथ सरकार म्हणतात, ‘बाजीरावाने हिंदुस्थानच्या इतिहासात मराठ्यांना मानाचे स्थान मिळवून दिले. मराठेशाहीत छत्रपती शिवाजी राजांनंतरच्या कर्तृत्ववान पुरुषांत बाजीराव पेशव्यांची गणना केली पाहिजे. छत्रपतींनी महाराष्ट्र राज्याची निर्मिती केली व या राज्याला बृहत्तर महाराष्ट्राचे रूप देण्याचा प्रारंभ बाजीरावांनी केला.’

अवघे ४० वर्षांचे आयुष्य आणि केवळ २० वर्षांची कारकीर्द लाभलेल्या अशा या मराठी लढवय्याने २८ एप्रिल,१७४० रोजी नर्मदातीरावर रावेरखेडी (मध्य प्रदेश) येथे शेवटचा श्र्वास घेतला.

पु.ल.देशपांडे


पु.ल.देशपांडे साहित्य, संगीत, नाटक, चित्रपट, वक्तृत्व आदी क्षेत्रांत ज्यांना अभिव्यक्तीची ‘अमृतसिद्धी’ साध्य झाली होती आणि ज्यांची ‘साठवण’ मराठीजनांनी अनंत काळासाठी मनामनात करून ठेवली आहे असे ‘आनंदयात्री’!
महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी मनाजवळचं व्यक्तिमत्त्व म्हणजे पु. ल. देशपांडे. सर्वसामान्य मराठी माणसाचं प्रेम, आपुलकी, आदर, त्यांच्याबद्दलचा अभिमान... आदी भावनांचं सर्वाधिक प्रकटीकरण ज्यांच्याबाबत महाराष्ट्रानं अनुभवलं ते व्यक्तिमत्त्व म्हणजे पुरूषोत्तम लक्ष्मण देशपांडे! त्यांच्याबद्दल लिहायला शब्द अपुरे पडतील. केवळ लेखक नव्हे तर बहुआयामी असणारं असं व्यक्तिमत्त्व. लेखनातही तोचतोचपणा नाही. निबंध, समीक्षण, नाटक, प्रहसन, एकांकिका, अनुवाद, पटकथा, व्यक्तिचित्रण, चिंतनात्मक लेखन अशा अनेक लेखनप्रकारात त्यांच्या लेखणीने हुकूमत गाजवली. गांधीजींचं चरित्रलेखन, बंगाली भाषेचा अभ्यास, रवींद्रनाथांच्या कवितांचा अनुवाद याही वेगळ्या प्रकारच्या लेखनातून पु. ल. आपल्याला भेटतात. साहित्य, संगीत, नाटक, वक्तृत्व, अभिनय.... कलेच्या ज्या ज्या प्रांतात पु.ल. वावरले त्या त्या प्रांताचे ते अनभिषिक्त सम्राट झाले. अभिनय, एकपात्री अभिनय, हार्मोनियम (संवादिनी) वादन, कथाकथन, स्वत:च्या लेखनाचे सादरीकरण, अभिवाचन, नाट्य व पटकथा लेखन, दिग्दर्शन, काव्यवाचन... या प्रत्येक क्षेत्रात पुलंनी अतिशय उच्च दर्जाचे यश प्राप्त केले, अफाट लोकप्रियता मिळवली, आपला श्रेष्ठ दर्जा सिद्ध केला.

वयाच्या १६ व्या वर्षी ‘आजोबा हरले’ या प्रहसनापासून पु. लं ची लेखनयात्रा चालू झाली. पुढे पूर्वरंग, अपूर्वाईतून त्यांनी प्रवास घडवला, कधी व्यक्ती आणि वल्लीतून अनेकांची भेट घालून दिली, कधी मर्ढेकर-आरती प्रभू-बोरकरांच्या कविता प्रभावी काव्यवाचनातून रसिकांपर्यंत समर्थपणे पोहोचवल्या, बटाट्याच्या चाळीचा फेंरफटका घडवला. असे हे ‘कोट्याधीश’ पु.ल. रसिकांच्या मनात घर करून राहिले.

पु. ल. नी एकूण १४ एकांकिका लिहिल्या. ती फुलराणी, तुज आहे तुजपाशी, सुंदर मी होणार अशी उत्तमोत्तम नाटकं लिहिली. नाट्यदिग्दर्शन, अभिनय या क्षेत्रांतही आपला ठसा उमटवला. ‘अंमलदार’ हे पु. लं. नी रूपांतरित केलेलं पहिलं नाटक. अनुवाद किंवा रूपांतर हा पु. लं. च्या विविध पैलूंमधला आणखी एक पैलू. इतर भाषिक नाटकांचं रूपांतर करताना त्याचं भारतीयीकरण, मराठीकरण मोठ्या कौशल्यानं पु. लं. नी केलं. १९४७ साली ‘कुबेर’ या चित्रपटातून पु. लं. चं पहिलं दर्शन झालं. संवादलेखक, दिग्दर्शक, पटकथाकार, गायक, नायक, गीतकार, संगीतकार अशा अनेक भूमिकांमधून चित्रपटक्षेत्रात पु. लं. वावरले. त्यांचा गुळाचा गणपती हा चित्रपट ‘सबकुछ पु.ल.’ म्हणूनच गाजला. ही त्यांची कारकीर्द १९९३ च्या ‘एक होता विदूषक’ इथवर बहरली. त्यातले त्यांचे संवाद प्रत्येकाला भावले, अभिजाततेचा अनुभव देऊन गेले.

भास्कर संगीतालयाच्या दत्तोपंत राज्योपाध्यांकडून घेतलेलं हार्मोनियमचं शास्त्रीय शिक्षण हा पु. लं. चा आणखी एक पैलू. पंडित भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, मिल्लिकार्जुन मन्सूर अशा दिग्गजांना त्यांनी हार्मोनियमवर समर्थ साथ केली. त्यांच्या हार्मोनियम वादनाच्या ध्वनिफितीही उपलब्ध आहेत.

सादरीकरणाचं विलक्षण व हमखास यशस्वी ठरणारं कर्तृत्व पु. लं. कडे होतं. त्यांचे हावभाव, शब्दफेक, देहबोली, आवाजावरचं नियंत्रण सगळंच विलक्षण आणि लक्ष वेधून घेणारं. बटाट्याची चाळ, वार्‍यावरची वरात, असा मी असा मी या प्रयोगांतून पु. लं. मधले ‘परफॉर्मर’ भेटतात. लेखन असो, वादन असो, गायन असो, नाटक किंवा वक्तृत्व सगळीकडे पु. लं. चं सादरीकरण थक्क करतं.

राजकारण हा पु. लं. चा प्रांत कधीच नव्हता. पण १९७५ च्या आणीबाणीच्या काळात त्यांच्या वक्तृत्वाला व विनोदाला उपहासाची धार आली. त्या काळात जयप्रकाश नारायणांच्या ‘प्रीझन डायरी’ चा त्यांनी मराठी अनुवाद करून लोकांपुढे साकार केला. आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत जनता पक्षासाठी पु. लं. नी अनेक भाषणं केली. राजकारणात त्या काळापुरता पु. लं. मधला कार्यकर्ता आणीबाणीविरुद्ध लढला.

पु. लं. च्या साहित्यातून त्यांची अचाट निरीक्षणशक्ती, अनलंकृत प्रवाही संवादात्मक भाषाशैली, मराठी व संस्कृतवरील प्रभुत्व, संदर्भ श्रीमंती, भाषेतली लवचीकता, नावीन्य, भावस्पर्शी लिखाण आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे निखळ, निर्व्याज विनोद, कोणालाही न बोचणारा, दुखणारा विनोद या सगळ्या गोष्टी प्रामुख्यानं दिसतात. त्यांच्या लेखनासह, वक्तृत्वातही संदर्भांची श्रीमंती जाणवते. संस्कृत सुभाषिते, वेद-पुराणे, संतसाहित्य, म्हणी-वाक्‌प्रचार, यांसह विविध संस्कृतींमधले, जीवनव्यवहारातले अनेक संदर्भ पु. लं. च्या समृद्ध लेखनात आढळतात. यामुळेच त्यांची निवेदन-शैलीही उठून दिसते!

साहित्य-नाटक-संगीत या क्षेत्रात प्रवेश करणार्‍या नवोदिताला शाबासकीची थाप द्यावी ती पु.लं. नीच. ‘ती फुलराणी’ करताना भक्ती बर्वे-इनामदारांना हाच अनुभव आला. ज्येष्ठ गायिका आशा खाडिलकर यांचं गायन ऐकून ते आवडल्याचं कळवणारा फोन रात्री ११:०० वाजता करून प्रोत्साहन देणारे पु. ल. वेगळेच. तरुण संगीतकार सलील कुलकर्णींच्या बालगीतांच्या ध्वनिमुद्रिकेचं भरभरून कौतुक करणारे पु. ल. च होते. मुस्लीम समाजात काम करणार्‍या हमीद दलवाईंबद्दल पहिल्यांदा पु. लंनीच लिहिलं. एका अनोळखी दिग्गजाची ओळख सामान्य वाचकांना करून दिली. समोरच्या व्यक्तीमधल्या चांगल्या गोष्टी ओळखून त्या इतरांना सांगण्याची क्षमता फार कमी लोकांकडे असते आणि त्यापैकी एक पु. ल. होते.

पु.लं. मधला दाता खूप जणांना अनोळखी असेल. सामाजिक बांधिलकी कृतीशीलतेने मानणार्‍या पु. ल. व सुनीताबाई या दांपत्याने बाबा आमटे, अनिल अवचट, बाबा आढाव, हमीद दलवाई आदी अनेक कार्यकर्त्यांना, सामाजिक संस्थांना, त्यांच्या विविध उपक्रमांना कोणताही गाजावाजा न करता, सहजपणे व सढळतेने सहकार्य केले. सुनिताबाईंसारख्या सहधर्मचारिणीच्या प्रयत्नातून पु. ल. देशपांडे फाउंडेशन उभं राहिलं. या फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी पुढील संस्था - व्यक्तींना मदत केली.

- अंध व्यक्तींसाठी देणगी - उत्तमोत्तम मराठी साहित्य ब्रेल लिपीत आणण्यासाठी आर्थिक मदत.
- वेश्यांच्या मुलांसाठी चालवल्या जाणार्‍या निहार या संस्थेला सहकार्य.
- कोयना भूकंपग्रस्त मुलांसाठी मदत.
- ग्रामीण स्तरावरील शास्त्र प्रयोगशाळेलाही मदत.
- मुंबई येथील एशियाटिक सोसायटी या संस्थेला सहकार्य.

कलाक्षेत्रातील त्यांच्या अभूतपूर्व योगदानामुळे पु. ल. देशपांडे पहिल्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे मानकरी ठरले. पु. लं. ना पुण्यभूषण, पद्मश्री, पद्मभूषण या पुरस्कारांसह संगीत नाटक अकादमी पुरस्कार व साहित्य अकादमीचा पुरस्कारही प्राप्त झाला. मध्य प्रदेश, कलकत्ता, गोवा या राज्यांतूनही पु. लं. ना पुरस्कार मिळाले आणि हा मराठी साहित्यिक भौगोलिक, भाषिक व सांस्कृतिक सीमा ओलांडून पार गेला.

‘जिवंत माणसाइतके जगात पाहण्यासारखे काही नाही’, अशी जीवनाकडं बघण्याची त्यांची वृत्ती आपले आयुष्य आणखी सुंदर बनवते. जीवन सुंदर करू पाहणार्‍या चार्ली चॅप्लीन आणि रवींद्रनाथ टागोर या दोन व्यक्तिमत्त्वांचा प्रभाव पु. ल. देशपांडे यांच्या जीवनातून व अभिव्यक्तीतूनही स्पष्टपणे जाणवतो. त्यांना ‘महाराष्ट्राचे वुडहाऊस’ ही म्हटले जाते. अवघ्या महाराष्ट्रावर प्रदीर्घ काळ आनंदाची उधळण करणारा हा आनंदयात्री १२ जून, २००० ला जग सोडून गेला खरा, पण त्यांचं अस्तित्व आजही मराठी मनात शाबूत आहे.

सचिन तेंडुलकर


तन-मनाने, सातत्याने मैदानावर १००% योगदान देणारा परिपूर्ण खेळाडू; शालीन, विनम्र ‘मराठी माणूस’ आणि
भारतीयांचा क्रिकेटमधील ‘देव’!


गोर्‍या सायबाचा खेळ म्हणून ओळखल्या जाणार्‍या क्रिकेटवर गेली वीस वर्षे आपल्या असामान्य खेळाने, अनेक विक्रम करत अधिराज्य गाजवणारा खेळाडू म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. यांचे वडील प्रा. रमेश तेंडुलकर हे मराठीचे प्राध्यापक आणि प्रसिद्ध साहित्यिक. मध्यमवर्गीय, सुसंस्कृत मराठी कुटुंबातून आलेल्या सचिनला क्रिकेटमध्ये करिअर करायची संधी मिळणे, घरातून तसे प्रोत्साहन मिळणे हे सचिनचे नव्हे तर आपणा सर्व भारतीय क्रिकेट रसिकांचे भाग्यच म्हणायला हवे. सचिन यांचा जन्म मुंबई येथे झाला. घरात लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच क्रिकेटची आवड असल्यामुळे क्रिकेटविषयक अनेक गोष्टी लहानपणीच त्यांच्या कानावरून गेल्या होत्या. त्यांच्या भावाने - अजितने - त्यांच्यातील क्रिकेटचे कौशल्य ओळखून त्यांना योग्य वयात रमाकांत आचरेकर यांच्याकडे क्रिकेटचे शास्त्रशुद्ध तंत्र शिकवण्यास पाठवले आणि त्यांच्यातील सुप्त खेळाला योग्य प्रशिक्षणाची जोड मिळाल्यावर त्यांचा खेळ लहान वयातच अधिक परिपक्व बनत गेला. शारदाश्रम विद्यालयाचा, छोट्या चणीचा हा मुंबईकर खेळाडू लहानपणापासूनच मुंबई गाजवू लागला.

सचिन यांनी आपल्या आंतरशालेय क्रिडाजीवनापासूनच विश्वविक्रम करण्यास सुरुवात केली. १९८५-८६ ला आंतरशालेय हॅरिस शिल्ड स्पर्धेमध्ये वयाच्या १२ व्या वर्षी त्यांनी मित्र विनोद कांबळी यांच्यासह ६६४ धावांचा पर्वत रचला. त्यापैकी ३२६ धावा त्यांनी स्वत: काढल्या होत्या. सचिन १५ व्या वर्षीच रणजीमध्ये पदार्पण करणारे पहिले खेळाडू होत. सचिन हे एकमेव असे क्रिकेटपटू आहेत की ज्यांनी रणजी, दुलीप आणि इराणी या तिन्ही राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदार्पणाच्या सामन्यातच शतकी खेळी केली आहे.

सचिन तेंडुलकर यांनी वयाच्या १६ व्या वर्षी - १९८९ साली - आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात (कराची येथे) पदार्पण केले. सचिन यांची एकदिवसीय कारकीर्द १९८९ मध्येच पाकिस्ताविरुद्धच सुरू झाली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या विक्रमवीराला एकदिवसीय सामन्यातील आपले १ ले शतक नोंदवण्यासाठी तब्बल ७८ सामने खेळावे लागले. १९९४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात त्यांनी प्रथम शतकी खेळी केली. त्यानंतर एकदिवसीय शतकांच्या विक्रमाकडे होणारा त्यांचा वेगवान प्रवास खरोखरच थक्क करून सोडणारा आहे.

आपले पहिले तब्बल ३५ कसोटी सामने विदेशातील मैदानावर खेळणार्‍या सचिन यांनी १९९३ मध्ये इंग्लंडविरुद्ध कोलकता येथे भारतीय मैदानावरील पहिली कसोटी खेळली. या मालिकेतील दुसर्‍या सामन्यात (चेन्नई येथे) १६५ धावा काढून मायभूमीतील आपले १ ले कसोटी शतक त्यांनी झळकावले. त्याआधी त्यांनी १९९० मध्येच इंग्लंडविरुद्ध मँचेस्टर येथे पहिले कसोटी शतक झळकावून धावांचा - शतकांचा रतीब घालण्यास सुरुवात केलीच होती.

सचिन यांनी आपल्या झंझावाती, वेगवान खेळीने अनेक वेळेला आपल्या संघाला पराभवापासून सावरले आहे, असंख्य वेळा विजयी केले आहे. भारतीय क्रिकेट रसिकांच्या मनाला सर्वाधिक भिडलेली त्यांची खेळी म्हणजे ‘डेझर्ट स्टॉर्म’ म्हणून प्रसिद्ध असलेली, शारजा येथील कोकाकोला कपच्या उपान्त्य सामन्यातील खेळी होय. ऑस्ट्रेलियाच्या २८४ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची अवस्था ४ बाद १४३ अशी झाली होती. त्याच वेळी भरीस भर म्हणून मैदानावर तुफान वादळ सुटले होते. या वादळाला सचिन ‘वादळ’ होऊनच सामोरे गेले. सचिन यांनी ५ षटकार आणि ९ चौकार फटकावून १३१ चेंडूत १४२ धावांची खेळी करून संघाला अंतिम फेरीपर्यंत नेले. एवढेच नव्हे तर त्यानंतर दोन दिवसातच अंतिम सामन्यातील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या त्यांच्या १३१ चेंडूतील १३४ धावांनी भारताला विजय प्राप्त झाला. ऑस्ट्रेलिया संघात मॅकग्रा, शेन वॉर्न हे जगप्रसिद्ध, अचूक गोलंदाजी करणारे गोलंदाज असताना सचिन यांनी या धावा केल्या. त्यामुळे या त्यांच्या खेळींचे महत्त्व अधोरेखित होते.

१९९४ ला न्यूझीलंड विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात त्यांनी आघाडीचा फलंदाज म्हणून कामगिरी करण्यास सुरुवात केली आणि जगाला एक उत्तम, आक्रमक आघाडीचा फलंदाज अनुभवण्यास मिळू लागला. सौरव गांगुली व वीरेंद्र सेहवाग या त्यांच्या जोडीदारांचा खेळ बहरण्यामध्ये सचिन यांच्या ‘समोर’ असण्याचा मोठा वाटा आहे.

कोणत्याही परिस्थितीत आपल्या देशाशी आणि खेळाशी बांधिलकी मानणारे सचिन व्यक्तिगत विक्रमापेक्षा संघाला, सांघिक कामगिरीला, देशाच्या विजयाला अधिक महत्त्व देतात. एका विश्र्वचषक स्पर्धेच्या वेळी त्यांचे वडील प्रा. रमेश तेंडुलकर यांचे निधन झाले. त्या वेळी फक्त एका सामन्यात सचिन अनुपस्थित राहिले. संघाला असणारी आपली गरज आणि खेळाबद्दलची बांधिलकी यांचा विचार करून पुढील केनियाविरुद्धच्या सामन्यात ते लगेचच सहभागी झाले. या सामन्यात त्यांनी शतकही झळकावले. तसेच त्यांना सामनावीर म्हणून पुरस्कारही मिळाला. २००३ मध्ये झालेल्या विश्र्वचषक स्पर्धेत सचिन यांनी विविध सामन्यांत मिळून ६७३ धावा काढल्या व भारताला अंतिम सामन्यात पोहोचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या स्पर्धेत त्यांना सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळाला.

सचिन यांच्या प्रत्येक खेळीवर प्रतिस्पर्धी, आकडेवारी तज्ज्ञ, समालोचक, क्रीडा समीक्षक आणि जगभरातील क्रीडारसिक यांचे बारीक लक्ष असते. असंख्य लोकांची त्यांच्या धावा, बळी, त्यांचे विक्रम याबाबतची आकडेवारी तोंडपाठ असते.

- आत्तापर्यंतची २० वर्षांची कारकीर्द; अजूनही खेळण्याची क्षमता;
- आंतरराष्ट्रीय कसोटी व एकदिवसीय सामने मिळून सुमारे ५८० सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व, या सामन्यांतून एकूण सुमारे १२०० दिवस मैदानावरील चैतन्यदायी उपस्थिती, (प्रथम श्रेणीचे २५८ सामने आणखी वेगळेच),
- कसोटी व एकदिवसीय या दोन्ही प्रकारांत मिळून काढलेल्या एकूण २९००० धावा (प्रथम श्रेणीतील २१००० धावा वेगळ्याच), या दोन्ही प्रकारांत धावांच्या बाबतीत जगात प्रथम क्रमांक;
- दोन्ही प्रकारात सर्वाधिक शतके (जानेवारी, २००९ पर्यंत एकूण ८३ शतके), (प्रथम श्रेणीतील ६८ शतके निराळीच); (स्वत:च्या एकूण कसोटी व एकदिवसीय शतकांपैकी सर्वात जास्त शतके सर्वोत्कृष्ट अशा ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झळकावलेली आहेत हे विशेष महत्त्वाचे), सर्वाधिक एकदिवसीय अर्धशतके;
- सर्व विश्र्वचषक स्पर्धांचा विचार करता एकाच स्पर्धेत सर्वाधिक धावांचा विक्रम (२००३ साल - ६७३ धावा), तसेच सर्व विश्र्वचषक स्पर्धांमध्ये मिळून एकूण १७९६ धावांसह सर्वाधिक धावांचा विक्रम, एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक वेळा (५६) सामनावीर पुरस्कार व सर्वाधिक वेळा (१४) मालिकावीर पुरस्कार, एकदिवसीय सामन्यांत कॅलेंडर वर्षात १००० पेक्षा जास्त धावा काढण्याची सर्वाधिक वेळा केलेली कामगिरी...

ही विक्रमांची यादी भारतीय व मराठी माणसाला अभिमान वाटावी अशी आहे आणि प्रतिस्पर्ध्यांच्या मनात धडकी भरवणारी आहे. या आकड्यांच्या व विक्रमांच्या जोडीला कसोटी व एकदिवसीय सामन्यांतील सचिन यांचे एकूण १९६ बळी व एकूण २२८ झेल आहेतच. त्यांच्या ४२ एकदिवसीय शतकांच्या सामन्यांपैकी एकूण ३० सामने भारताने जिंकलेले आहेत, तसेच त्यांनी सुमारे ५६ वेळा मिळवलेल्या सामनावीर पुरस्कारांच्या सामन्यांपैकी एकूण ५१ सामने भारताने जिंकले आहेत. यावरूनच त्यांची वैयक्तिक कामगिरी आणि भारताची विजयी कामगिरी यांमधील संबंध स्पष्ट होतात. खरे तर आता सचिन यांची महानता या सर्व आकडेवारीच्या पलीकडे पोहोचलेली आहे.

सर डॉन ब्रॅडमन यांच्या स्वप्नातील विश्र्व संघामधील या पिढीतील एकमेव नाव म्हणजे सचिन तेंडुलकर. एका क्रिकेटपटूसाठी यापेक्षा दुसरा बहुमान कोणता असू शकतो. कोणत्याही परिस्थितीत न डळमळता शांत आणि संयमी खेळी खेळणे हे सचिन यांचे वैशिष्ट्य. वर्तमानपत्रांतून त्यांच्याविरुद्ध काही छापून आले, कोणी काही टीका केली, प्रतिस्पर्ध्यांनी कितीही डिवचले, तरी कोणतीही प्रतिक्रिया न देणारे सचिन टीकाकारांना नेहमीच आपल्या फलंदाजीने उत्तर देतात. याचेच एक उदाहरण म्हणजे मोहाली येथील सामन्यात त्यांनी साकारलेला विश्र्वविक्रम. ऑस्ट्रेलियन खेळाडू त्यांच्या नेहमीच्या संकुचित वृत्तीने ‘सचिनला वर्ल्ड रेकॉर्ड करूच देणार नाही’, अशा वल्गना करत होते. सचिन यांनी त्या वेळी कोणतेही प्रत्युत्तर न देता शांतपणे १११ चेंडूत ८८ धावा काढल्या आणि ब्रायन लाराचा सर्वाधिक कसोटी धावांचा विक्रम मोडला.

भारतीय कप्तानांना आणिबाणीच्या प्रसंगी निर्णय घेताना सचिन यांचे मार्गदर्शन नेहमीच उपयोगी पडले आहे. अत्यंत नम्र‘, निगर्वी, शांत, संयमी असा हा खेळाडू आपल्यापेक्षा कनिष्ठ असणार्‍या खेळाडूंच्या नेतृत्वाखाली खेळतानाही तेवढ्याच निगर्वीपणे व सहकार्याने खेळत असतो. भारतीय संघाकडून खेळणार्‍या प्रत्येक नव्या खेळाडूला सांभाळून घेणे, प्रसंगी मार्गदर्शन करणे व प्रोत्साहन देणे - कौतुक करणे या सचिन यांच्या कृतींतून त्यांच्या व्यक्तित्वाचा वेगळाच पैलू समोर येतो. आपल्या अनुभवाचा उपयोग सगळ्यांना व्हावा याकडे त्यांचे लक्ष असते.

हे झाले त्याच्या स्वभावगुणांविषयी. एक परिपूर्ण फलंदाज म्हणून त्यांच्याकडे स्वत:ची एक खास शैली आहे. स्ट्रेट ड्राईव्ह, स्क्वेअर ड्राईव्ह, स्क्वेअर कट हे त्यांचे विशेष प्रेक्षणीय फटके होत. शिवाय उपखंडातील फलंदाजांमध्ये ‘ऑन साईडला’ फटकेबाजी करण्याचे तंत्र असते, ते त्यांच्याकडे विशेष कौशल्यासह आहेच. तंत्रशुद्धता आणि आक्रमण यांचे अतिशय सुरेख संतुलन हे सचिन यांचे प्रमुख वैशिष्ट्य होय. यांच्या जोडीला परिस्थितीचे आकलन, संयम, कल्पकता, सर्जनशीलता... इत्यादी गुण त्यांच्याकडे आहेतच. त्यांच्या कल्पकतेचे व सर्जनशीलतेचे उदाहरण म्हणजे पॅडल स्वीपचा फटका आणि शोएब अखतर, ब्रेट ली, मायकेल जॉन्सन या जलदगती गोलंदाजांनी उसळता चेंडू (बाऊन्सर) टाकल्यास बॅट उंचावून, चेंडूच्या वेगाचा फायदा घेत, थर्डमॅनच्या डोक्यावरून ठोकलेला षटकार होय. या फटक्यांमुळे अनेक जगप्रसिद्ध गोलंदाज निष्प्रभ व निरुत्तर ठरत आहेत. खेळपट्टीचा पटकन येणारा अंदाज, गोलंदाजाच्या हाताच्या हालचालीवरून चेंडूचा क्षणार्धात अंदाज घेण्याची क्षमता, उत्तम पदलालित्य, भेदक नजर, प्रतिस्पर्धी-प्रेक्षक-एकूण परिस्थिती यांचा दबाव पेलण्याची ताकद... आदी सर्व गुणधर्म व कौशल्यांमुळेच सचिन हे क्रिकेटविश्र्वातील सार्वकालिक सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटुंपैकी एक ठरतात. मैदानावर १००% एकाग्रता व उत्तम खेळाचे सातत्य आणि अविश्वसनीय शारीरिक क्षमता (फिटनेस) या त्यांच्या आणखी काही वैशिष्ट्यांमुळेच ते एक आदर्श मानले जातात.

सचिन तेंडुलकर हे जगातील काही अष्टपैलू खेळाडूंमध्येही गणले जातात. त्यांच्या उत्कृष्ट फलंदाजीबरोबरच त्यांचे गोलंदाजी व क्षेत्ररक्षणातील कौशल्यही वाखणण्याजोगे आहे. कोणत्याही प्रकारच्या खेळपट्टीवर ते दोन्ही बाजूंना सहजतेने चेंडू वळवून गोलंदाजी करू शकतात. भल्याभल्या फलंदाजांचा गोंधळ उडविण्याची क्षमता त्यांच्या गोलंदाजीत आहे. ज्या वेळी संघाला एखादा बळी अत्यावश्यक असतो, त्या वेळी सचिन यांच्याकडे अपेक्षेने गोलंदाजी सोपवली जाते व ते त्यात यशस्वी होतात. या सर्व गुणांमुळेच सचिन यांच्याकडे नेहमीच संघाचा ‘आधारस्तंभ’ म्हणून पाहिले जाते. त्यांचे मैदानावर केवळ ‘असणे ’च भारतीय खेळाडूंचे मनोधैर्य वाढवते.

जगातील जवळजवळ सर्व मैदानांवर (सुमारे ९०) आपल्या सर्वोत्तम व परिपूर्ण खेळाचे प्रदर्शन करणार्‍या सचिन तेंडुलकर यांना अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सुमारे १० वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या क्रमवारीत पहिल्या १० खेळाडूंत स्थान मिळविण्याची कामगिरी त्यांनी केली आहे. विस्डेनचा क्रिकेटर ऑफ दी इयर पुरस्कार, भारतातील पद्मविभूषण, पद्मश्री, अर्जुन व राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आणि महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार.... ही बहुमानांची यादीही त्यांच्या विक्रमांइतकीच मोठी आहे. पण सर डॉन ब्रॅडमन यांच्या पत्नीने, ‘मला सचिनच्या खेळात ब्रॅडमन यांचा भास होतो’, अशी दिलेली प्रतिक्रिया आणि स्वत: सर ब्रॅडमन यांनी प्रत्यक्ष भेटीत केलेले कौतुक हाच सचिन यांच्यासाठीचा सर्वोच्च पुरस्कार आहे असे म्हणता येईल.

गेली २० वर्षे क्रिकेट विश्वात सातत्याने आपला ठसा उमटवणे ही काही साधी गोष्ट नव्हे. तसेच करोडो भारतीय क्रिडा रसिकांच्या अपेक्षांचे ओझे पेलत सातत्यपूर्ण कामगिरी करणे म्हणजे एक अग्निदिव्यच! अनेक विक्रम करताना, अनेक पुरस्कार भूषवताना आणि स्लेजिंगचा जमाना असताना आपल्या विनम्र‘ वागणुकीने भारतातीलच नव्हे तर जगभरातील क्रिकेट रसिकांच्या मनामध्ये सचिन यांनी अढळ स्थान निर्माण केले आहे. सचिन तेंडुलकर हे आता केवळ एक क्रिकेट खेळाडू राहिले नसून ते भारताचे ‘क्रीडा राजदूत’ मानले जातात, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरचे ते एक ‘सुप्रसिद्ध क्रीडा आयकॉन (प्रतिमान)’ बनले आहेत. भारताला विजयाची सवय लावणार्‍या सचिन यांच्या पुढील कारकीर्दीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा!

बालगंधर्व

बालगंधर्व / Balgandharv

आपले गायन व अभिनय यांच्या साहाय्याने मराठी रंगभूमी व नाट्यसंगीताच्या क्षेत्रात सुवर्णयुग निर्माण करणारे युगनिर्माते!
नारायण श्रीपाद राजहंस उर्फ बालगंधर्व यांचे नुसते नाव जरी उच्चारले, तरी मराठी मनाच्या तरफा एकदम झंकारू लागतात. अच्युत बळवंत कोल्हटकर ह्यांनी महाराष्ट्राच्या दैवतांची नावे घेताना छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक यांच्याबरोबर बालगंधर्वांचीही गणना केली आहे. ही तीन नावे जादूच्या मंत्रासारखी आहेत. पु.ल. देशपांडे म्हणतात, ‘‘बालगंधर्व या नावाचा उच्चार केला किंवा ते नाव नुसतं कानी पडलं, तरी क्षणार्धातच जादूचं झाड फुलून यावं, तसं मराठी मन फुलून येतं किंवा जे मन असं फुलून येतं, त्याला मराठी मन म्हणायला हरकत नाही. बालगंधर्वांसारखा लोकोत्तर कलाकार शंभर वर्षांतून एकदाच जन्माला येतो. या रंगभूमीच्या बादशाहाने सुमारे चार तपे मराठी मनावर राज्य केलं.’’



सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात नागठाणे या गावी जन्मलेल्या बालगंधर्वांनी मराठी रंगभूमीची मनोभावे सेवा केली. नाटकांतील नेपथ्य-सजावट, नाट्यसंगीत, नाट्याभिनय या क्षेत्रांत मनापासून उपासना करून स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण केली.

बालगंधर्वांच्या स्त्री भूमिका म्हणजे साक्षात ‘कायाप्रवेशच’. त्यांच्या नजरेत, मुद्रेत, हसण्यात, लाजण्यात, मुरकण्यात, चालण्यात, कपडे नेसण्यात साक्षात स्त्रीचा संचार झालेला आहे  असे वाटत असे.  ‘पुरुषाच्या देहातून स्त्रीचे सौंदर्य इतक्या मोहकतेने कधीच प्रकट झाले नसेल,’ असे आचार्य अत्रे यांनी बालगंधर्वांबाबत म्हटले आहे.

मराठी रंगभूमीला पडलेले सुंदर स्वप्न बालगंधर्वांच्या रूपाने सत्यात आले. सहजसुंदर अभिनय आणि केवळ गंधर्वांबरोबरच तुलना होऊ शकेल असा आवाज, म्हणूनच लोकमान्य टिळकांनी छोट्या नारायणाला ‘बालगंधर्व’ ही उपाधी दिली.बालगंधर्वांना सुंदर, मोहक आणि बोलका चेहरा लाभला होता. गोड गळ्याची देणगीही त्यांना जन्मजात लाभली होती. शास्त्रीय संगीताची बैठक उत्तम होती. भास्करबुवा बखले ह्यांच्याकडून त्यांनी गायनाचे धडे घेतले होते. नाट्यगीतांसह ख्याल, ठुमरी, गझल, दादरा, भक्तिगीते यांसारख्या गायन प्रकारांवरही त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते.

१९०५ मध्ये त्यांनी किर्लोस्कर नाटक मंडळीत प्रवेश केला. त्यांची शाकुंतल नाटकातील ‘शकुंतला’ व मानापमान नाटकातील ‘भामिनी’ या भूमिकांमुळे एक प्रतिभावंत कलाकार म्हणून त्यांचे नाव सर्वत्र झाले. स्त्री भूमिका करताना अभिनयक्षमता, अचूक निरीक्षण व  सौंदर्यदृष्टी असल्यामुळे स्त्री मनाचे सूक्ष्म भाव सहजपणे प्रकट करण्यात ते यशस्वी झाले. शकुंतला ते सिंधूपर्यंत त्यांच्या स्त्री भूमिकांमध्ये विविधता होती. त्यांच्या वेशभूषा व अलंकारांचे अनुकरण त्या काळातील स्त्रियाही करत असत.

१९१३ मध्ये त्यांनी गंधर्व नाटक मंडळी ही संस्था स्थापन केली. या संस्थेने संगीत रंगभूमीला सुवर्णकाळ दाखवला. संगीत सौभद्र, मृच्छकटिक, शाकुंतल, मानापमान, संशयकल्लोळ, शारदा, मूकनायक, स्वयंवर, विद्याहरण, एकच प्याला अशा अनेक संगीत नाटकांनी व त्यातील बालगंधर्वांच्या स्त्री भूमिकांनी रसिकांवर त्या काळी मोहिनी घातली होती. या नाटकांच्या प्रयोगांबाबत बालगंधर्वांच्या गीतांना २-३ वेळा वन्समोअर; सातत्याने ‘हाऊस फुल्ल’ होणारे प्रयोग आणि पहाटेपर्यंत चालणारे प्रयोग ह्या गोष्टी नित्याच्याच झाल्या होत्या. त्यांनी संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्याबरोबर केलेला ‘संयुक्त मानापमान’ या नाटकाचा प्रयोगही प्रचंड गाजला. त्यांनी एकूण २५ विविध नाटकांत भूमिका केल्या. साधारण १९१० ते १९३० हा कालखंड रंगभूमीचा, नाट्यसंगीताचा सुवर्णकाळ मानला जातो, तो प्रामुख्याने बालगंधर्वांच्या कर्तृत्वामुळेच.

१९३३ च्या सुमारास बोलपटांचे युग सुरू झाले. साहाजिकच रंगभूमीकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. बालगंधर्वांनीही प्रभातच्या ‘धर्मात्मा’ या चित्रपटात संत एकनाथांची भूमिका केली. बोलपटात त्यांचे मन रमेना. त्यांचा ओढा रंगभूमीकडेच राहिला. १९३९ च्या सुमारास त्यांनी रंगभूमीवर पुरुष भूमिका  साकारल्या. पण त्यांच्या स्त्री भूमिकाच प्रेक्षकांना जास्त प्रिय होत्या. १९५५ रोजी त्यांनी ‘एकच प्याला’ नाटकात साकार केलेली सिंधू ही त्यांची शेवटची भूमिका ठरली. त्यानंतर त्यांनी रंगभूमीवरून निवृत्ती घेतली. ह्या रसिकप्रिय कलावंताचा संगीत नाटक अकादमीने राष्ट्रपती पदक देऊन सन्मान केला. पुढे त्यांनापद्मभूषण ह्या पुरस्काराने गौरविले गेले. त्याआधी १९२९ सालच्या २४ व्या मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.

नाटकांमधील त्यांची अनेक पदे गाजली. शास्त्राचा बाज राखून, अभिनयाला अनुकूल असे गाणे त्यांनी गायले. त्यांची गाणी घरोघरी पोचली. नाट्यसंगीताच्या माध्यमातून बालगंधर्वांनी शास्त्रीय संगीताच्या प्रसाराला हातभार लावला. एका अर्थाने त्यांनी शास्त्रीय संगीत सोपे करून रसिकांसमोर मांडले. नाट्यसंगीताची अभिरूची सामान्य रसिकांमध्ये निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य बालगंधर्वांनी केले. आपल्या हयातीतच आख्यायिका बनून राहिलेल्या या असामान्य कलाकाराची स्मृती रसिकांनी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या रूपाने जतन करून ठेवली आहे.
( बालगंधर्वांच्या जीवनावर श्रीमती हेमंती बॅनर्जी यांनी माहितीपट बनवलेला आहे. या माहितीपटास राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे.)

राम गणेश गडकरी


नाट्य, काव्य व विनोदी लेखन या क्षेत्रांत अतिशय कमी कालावधीत अत्युत्कृष्ट, दिशादर्शक अभिव्यक्ती साधणारे प्रतिभासंपन्न साहित्यिक आणि आपल्याला ‘महाराष्ट्र गीता’ ची देणगी देणारे कवी!
मराठी साहित्यातील एक श्रेष्ठ नाटककार, विनोदकार आणि कवी. विशेषत: मराठी साहित्यात व रंगभूमीवर विनोद रुजवणारे व आपल्या प्रतिभेची छाप सोडणारे साहित्यिक म्हणून राम गणेश गडकरी अजरामर ठरले. बाळाराम या नावाने त्यांनी विनोदी लेखन केले, तर गोविंदाग्रज या टोपणनावाने त्यांनी काव्यलेखन केले. त्यांच्या कविता ‘वाग्वैजयंती’ (१९२१) या काव्यसंग्रहातून प्रसिद्ध झाल्या. ते स्वत:ला केशवसुतांचे सच्चे चेले म्हणवून घेत असत. पण तरीही गोविंदाग्रज केशवसुतांहून अनेक दृष्टींनी वेगळे होते.

गोविंदाग्रजांनी विपुल प्रमाणात प्रेमकविता लिहिली. त्यांना प्रेमाचे शाहीर असेच म्हटले जायचे. गुलाबी कोडे, गोड निराशा, पहिले चुंबन, मुरली, प्रेम आणि मरण, गोफ, ती कोण? अशा अनेक प्रेमकविता त्यांनी लिहिल्या.

क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव पडो मरणांचा,  मग पुढे...

यांसारख्या शब्दांतून त्यांची विलक्षण प्रतिभा प्रभाव पाडून जाते. प्रेमभंगाचे दु:ख व्यक्त करताना ते एका कवितेत म्हणतात,

जगावाचुनी लाभतीस तर जग मी केले असते, तुझ्यावाचुनी जग परि आता हो असत्याचे नसते...
डोळ्यांपुरते जग नच असते रुप जगाला पुरते, प्रेमळ हृदया  परि निर्दय जग दगडाखाली पुरते...
होईल होईल वाटत होते तेच अखेरीस झाले, नाव घेतल्यावाचुन आता मनात झुरणे आले...
या ओळींमधून व्यक्त झालेली प्रेम-निराशेची तडफड इतकी जिवंत आणि भेदक आहे की या अवस्थेतून गेलेल्या कुणालाही ती आपलीशी वाटेल. गोविंदाग्रज हे प्रेमाचे शाहीर होतेच, पण त्यांनी महाराष्ट्राला एक देणं देऊ केलं आहे, ते म्हणजे महाराष्ट्र गीताचं. त्यांच्या एका कवितेत त्यांनी महाराष्ट्राचे प्रेरणादायी, यथार्थ वर्णन केले आहे.

‘‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा।
नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा ।।
अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा ।
बकुळ फुलांच्या प्राजक्तांच्या दळदारी देशा।।
भावभक्तीच्या देशा, आणिक बुद्धीच्या देशा ।
शाहिरांच्या देशा, कर्त्या मर्दांच्या देशा ।।’’
काही काळ त्यांनी शिक्षक म्हणून काम केले, तसेच ‘ज्ञानप्रकाश’ मध्ये उपसंपादक म्हणूनही त्यांनी काम केले. त्यातूनच पुढे त्यांचा नाटक मंडळींशी, नाट्यलेखनाशी संपर्क आला. कल्पकता, बुद्धिमत्ता आणि भाषाप्रभुत्व या तीनही शक्ती गडकरी यांना प्रमाणाबाहेर लाभल्या होत्या. म्हणूनच ते नाटककार म्हणूनही विलक्षण यशस्वी ठरले. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या विनोदी लेखनाचा, नाट्याचा त्यांच्यावर प्रभाव होता. बालपणापासूनच साहित्याची ओढ लागल्याने वयाच्या सतराव्या वर्षीच ‘मित्रप्रिती’ नावाचे नाटक त्यांनी लिहिले. त्यानंतर १९१३ मध्ये रंगभूमीवर आलेले ‘प्रेमसंन्यास’ हे त्यांचे पहिले नाटक होय. नंतर अनुक्रमे पुण्यप्रभाव (१९१७), एकच प्याला (१९१९), भावबंधन (१९२०) ही नाटके रंगभूमीवर आली.  ‘राजसंन्यास’ हे त्यांचे अपूर्ण राहिलेले नाटक. त्यांच्या नाटकांबरोबरच त्यांच्या नाटकातील काही पात्रेही अजरामर ठरली. एकच प्याला या नाटकातील सिंधू, तळीराम, सुधाकर किंवा भावबंधनमधील घनश्याम, धुंडीराज, प्रेमसंन्यासमधील गोकूळ ही पात्रे आजही मराठी कलावंतांना आणि रसिकांना आनंद देतात. ‘वेड्यांचा बाजार’ हे त्यांचे अपूर्ण नाटक पुढे चिंतामणराव कोल्हटकर यांनी पूर्ण केले.

करुण आणि हास्य ह्या दोन्ही रसांची निर्मिती आपल्या लेखनातून सारख्याच परिणामकारकतेने त्यांनी साधलेली दिसते. त्यांच्या कथांतून निखळ विनोदाबरोबरच उपहासात्मक व्यंगही ठळकपणे आढळते. रिकामपणाची कामगिरी (१९२१), संपूर्ण बाळकराम (१९२५) यांतून त्यांचे विनोदी लेखन प्रसिद्ध झाले. याशिवाय गडकरी यांचं बरंचसं अप्रकाशित लेखन आचार्य अत्रे यांनी १९६२ मध्ये ‘अप्रकाशित गडकरी’ या नावाने प्रसिद्ध केले. नाट्यलेखन व विनोदी लेखन या क्षेत्रांत आचार्य अत्रे यांनी राम गणेशांची परंपरा पुढे समर्थपणे चालवली.

या सर्वच साहित्य प्रकारात यांच्या लेखणीने आपला स्वत:चा ठसा उमटवला. पण मराठी साहित्यक्षेत्रात अजरामर ठरलेल्या त्या लेखणीमागच्या कलावंताने- राम गणेश गडकरी यांनी -मात्र वयाच्या ३४ व्या वर्षीच या जगाचा निरोप घेतला.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे / Shivshahir Babasahaeb Purandare


शिवचरित्र केवळ अभ्यासणारे नव्हे, तर ते जिव्हाळ्याने अनुभवणारे आणि जणू शिवकाळातच राहून शिवचरित्र अक्षरश: जगणारे शिवशाहीर !

सह्याद्रीचा एकेक कडा आणि एकेक शिखर हे ज्यांच्यासाठी चरित्रनायक आहेत. एकेक किल्ला हा ज्यांच्या महाकाव्याचा एक-एक अध्याय आहे, असे ज्येष्ठ इतिहासकार म्हणजे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे होत. ‘इतिहासातून राष्ट्राचे शील शोधायचे असते, केवळ तहांचा आणि लढायांचा तपशील नव्हे’ असा उदात्त दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून ज्यांनी शिवचरित्र हे एकमेव जीवितध्येय साकार केले अशी विभूती म्हणजेच मराठी इतिहासाचे भाष्यकार, शिवशाहीर बळवंत मोरेश्वर पुरंदरे होत. त्यांच्या लेखनातून व व्याख्यानांतून शिवकाळ महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पोहोचला आहे.

’इतिहास माजघरापर्यंत गेला पाहिजे, पाळणाघरापर्यंत गेला पाहिजे, इतकंच नव्हे तर आमच्या बहिणी, भावजया आणि लेकीसुना गरोदर असतील, तर त्यांच्या गर्भापर्यंत गेला पाहिजे,’ असे म्हणणारे बाबासाहेब हे एकमेवाद्वितीयच! त्यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील सासवड. पण तरुणपणापासूनच ते पुण्यातच स्थायिक झाले. पुढे भारत इतिहास संशोधन मंडळ या संस्थेत काम करू लागले. या ठिकाणीच इतिहाससंशोधक ग.ह. खरे हे बाबासाहेबांना गुरुस्थानी लाभले व इतिहास संशोधक म्हणून त्यांची वाटचाल सुरू झाली.

पुरंदर्‍यांची दौलत, पुरंदर्‍यांची नौबत, गड-किल्ल्यांची ऐतिहासिक माहिती देणारे साहित्य (गडसंच), शेलारखिंड, व राजा शिवछत्रपती हे बाबासाहेबांचे आजवर प्रकाशित झालेले साहित्य होय. शिवचरित्र हे घरोघरी पोहोचावे हे ध्येय ठेवून बाबासाहेबांनीअथक संशोधनातून व परिश्रमांतून राजा शिवछत्रपती हा ग्रंथ साकार केला. या ग्रंथाच्या १६ आवृत्ती आजपर्यंत सुमारे ५ लाख घरांमध्ये पोहोचल्या आहेत. याचबरोबर फुलवंती व जाणता राजा ही नाटके त्यांनी लिहिली, दिग्दर्शित केली. ‘जाणता राजा’ या महानाट्याचे गेल्या २३ वर्षांत ८०० हून अधिक प्रयोग झाले आहेत व या प्रयोगांच्या माध्यमातून लाखो रुपयांची मदत बाबासाहेबांनी अनेक संस्थांना केली आहे. हे नाटक ५ अन्य भाषांत भाषांतरित केले गेले आहे.

इतिहासाचा ध्यास घेतलेले बाबासाहेब हे तरुणपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळून संपर्कात होते. त्या काळातच ते आचार्य अत्रे यांच्या वृत्तपत्रात लेखन करीत. शिवाय आपले मेहूणे श्री. ग. माजगावकर यांच्याबरोबर ते ‘माणूस’ मध्येही काम करत होते. ज्येष्ठ इतिहासकार व कादंबरीकार गो. नी. दांडेकरांशी पुढे त्यांची भेट झाली. बाबासाहेब-गोनीदा ही जोडी म्हणजे शिवचरित्राचा वारसा आजच्या पिढीपर्यंत पोहोचवणारे दूतच झाले. ते नेहमी गडांवर एकत्र भटकंती करीत. महाराष्ट्रातील एकही असा किल्ला नाही, जिथे बाबासाहेब पोहोचले नाहीत आणि एकही असे सरदार घराणे नाही, ज्यांच्याशी त्यांचा संपर्क झालेला नाही! शिवचरित्र अभ्यासणारे अनेक अभ्यासक असतात परंतु शिवचरित्र अनुभवणारे, अक्षरश: जगणारे बाबासाहेब एकच! स्वातंत्र्यानंतर लढल्या गेलेल्या दादरा नगर हवेली मुक्ती संग्रामात बाबासाहेब सुधीर फडके यांच्याबरोबर हिरिरीने सहभागी होते.

आचार्य अत्रे, गो. नी. दांडेकर, पु.ल. देशपांडे, अटलबिहारी वाजपेयी, मंगेशकर कुटुंबीय, ठाकरे कुटुंबीय यांसारख्या दिग्गजांचा सहवास त्यांना लाभला, लाभतो आहे. या सर्वांच्या माध्यमातून,सहकार्यातून त्यांनी शिवचरित्रप्रसारासाठी अनेक उपक्रम चालवले. महाराष्ट्रात, भारतात आणि परदेशातही त्यांच्या व्याख्यानांतून, जाणता राजा या महानाट्यातून आजही शिवचरित्र जिवंत होते. ’शिवचरित्र हे व्यक्तिचारित्र्य निर्मितीचा अभ्यासक्रम आहे’ हे त्यांनी आपल्या व्याख्यानांमधून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातील अनेक पैलू उलगडून दाखवत पटवून दिले.

इतिहासाविषयी अभिमान, सत्यासत्यता तपासण्यासाठीची संशोधक वृत्ती, संयम, चिकाटी, एक प्रकारचा भारावलेपणा -वेडेपणा, स्मरणशक्ती आदी गुणांचा समुच्चय बाबासाहेब पुरंदरे यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये असल्याचे स्पष्टपणे जाणवते. या गुणांसह प्रखर बुद्धिमत्ता, विश्र्लेषण क्षमता आणि प्रेरक इतिहास अभिव्यक्त करण्यासाठीची विलक्षण लेखन-प्रतिभा व वक्तृत्वकला हे गुणविशेषही त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसतात. तसेच सखोल अभ्यासासह, शिस्तबद्धता, वक्तशीरपणा हे त्यांच्या स्वभावाचे खास गुणधर्म. या सर्व गुणांमुळेच ते आज संपूर्ण महाराष्ट्रातील व भारतातील शिवभक्तांच्या गुरुस्थानी आहेत. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक अभ्यासकांची शिवचरित्र अभ्यासाची वाटचाल सुरू झाली आहे.

भूतकाळाचा अर्थ उमगून इतिहासाच्या अभिमानासह आजच्या पिढीला वैभवशाली भविष्याकडे नेण्यासाठी बाबासाहेबांनी आपले आत्तापर्यंतचे आयुष्य वाहिले आहे असे म्हणणे गैर ठरणार नाही. आजही (वयाच्या ८६ व्या वर्षी) बाबासाहेब तितक्याच उत्साहाने, समरसतेने कार्यरत आहेत.

लोकमान्य टिळक

लोकमान्य टिळक / Lokmany TIlak


टिळक अत्यंत बुद्धिमान विद्यार्थी होते. त्यांची स्मरणशक्ती चांगलीच दांडगी होती. वडील गंगाधरपंतयांच्याकडून त्यांनी संस्कृतचे धडे घेतले. संस्कृतमधील एक श्लोक पाठ केल्यामुळे त्यांना एक पैमिळत असे. त्यांनी अशा किमान २०० पाया मिळवल्या. शाळेत जायला प्रारंभ होण्यापूर्वीच अनेकगोष्टी त्यांच्या तोंडपाठ असायच्या. त्यांचे पाठांतर पाहून त्यांच्या गुरुजींनाही फारच नवल वाटतअसे.


एके दिवशी वर्गात गुरुजींनी शुद्धलेखन घातले. त्यात 'संत' हा शद्ब एकापेक्षा अधिक वेळा आला होता.टिळकांनी तो तीन वेगवेगळया पद्धतीने लिहिला. संत, सन्त आणि सनत. गुरुजींनी पहिला शब्दयोग्य ठरवला आणि बाकी दोन चूक दिले. आपण लिहिलेले तीनही शब्द योग्य आहेत, असे त्यांनीगुरुजींना सांगितले. एवढेच नव्हे, तर ठामपणे आपले म्हणणे योग्य कसे आहे, ते उदाहरणासहितपटवून दिले. तेव्हा शिक्षकांनी त्यांचे म्हणणे योग्य असल्याचे सांगितले.
टिळकांनी महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षाला असतांना एक वर्ष परीक्षेला न बसता केवळ व्यायामाचासराव करून आपली शरीरयष्टी बळकट केली. ते उत्तम मल्ल आणि पट्टीचे पोहणारेही होते. शाळेतजात असल्यापासून आपल्या देशावर इंग्रजांचे राज्य आहे, आपले नव्हे, याची टिळकांना जाणीवहोती. शिक्षण पूर्ण झाल्यावर इंग्रजांना भारतातून बाहेर घालवण्यासाठी त्यांनी प्रभावी प्रयत्न चालूकेले. बालपणापासून त्यांच्या अंगी असलेले सारे गुण त्यांना इंग्रजांच्या विरोधात लढा देतांनाउपयोगी पडले. सुदृढ शरीरस्वास्थ्यामुळे पुढे कारागृहातील हालाखीच्या आणि राजकीयधकाधकीच्या आयुष्यातील कष्ट ते सोसू शकले. मंडालेच्या कारागृहात 'गीतारहस्य' या ग्रंथाचे लेखनकेले.
आपली सत्य बाजू पटवून देण्याच्या त्यांच्या विद्यार्थीदशेपासूनच्या बाणेदार वृत्तीमुळे ते हिंदुस्तानवरअन्याय करणाऱ्या इंग्रजांच्या विरोधात मोठे आंदोलन उभारू शकले. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकहे भारताचे एक आदर्श सुपुत्र म्हणून ओळखले गेले.

या गोष्टीतून आपल्याला टिळकांचा बाणेदारपणा दिसून येतो. तसेच कुठचेही कार्य करायचे म्हटलेकी, शरीरयष्टी चांगली हवी. त्यासाठी प्रतिदिन व्यायाम करायला पाहिजे. शरीर बलवान असेल,तरच आपण कुठलीही क्रांती करू शकतो. सध्या अपले राष्ट्र आणि धर्म यांची स्थिती चांगली नाही.तेव्हा इतरांशी लढा द्यायचा असेल, तर शारीरिक आणि त्यासह आध्यात्मिक बळही हवे. तेव्हानामजप, प्रार्थना, कृतज्ञता यांसह लढा द्यायला सिद्ध होऊया

स्वातंत्र्यवीर - सावरकर

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

vinayak damodar sawarkar


'स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर' हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी भाषेतील कवी व लेखक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एका क्रांतिकारक चळवळीचे धुरीण, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे राजकारणी, हिंदुसंघटक व हिंदुत्वाचे एक विशिष्ट तत्त्वज्ञान मांडणारे तत्त्वज्ञ, विज्ञानाचा पुरस्कार व जातिभेदाचा तिरस्कार करणारे समाजसुधारक, भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते, प्रतिभावंत साहित्यिक आणि प्रचारक असे अनेक पैलू सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाला होते. त्यांना स्वातंत्र्यवीर अशी उपाधी प्रसिद्ध मराठी लेखक, पत्रकार, शिक्षक, चित्रपट दिग्दर्शक/निर्माते 'आचार्य प्रह्लद केशव' अत्रे यांनी दिली.

सावरकरांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर ह्या गावी झाला. त्यांचे वडील दामोदरपंत सावरकरांच्या तीन अपत्यांपैकी हे दुसरे होते. वि.दा. सावरकरांना 'बाबाराव' हे मोठे आणि नारायणराव हे धाकडे भाऊ होते. सावरकरांची आई ते नऊ वर्षांचे असताना वारली. थोरल्या बंधूंच्या पत्नी येसूवहिनी यांनी त्यांचा सांभाळ केला. सावरकरांचे वडील १८९९ च्या प्लेगला बळी पडले.

सावरकरांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या शिवाजी विद्यालयामध्ये झाले. ते लहानपणापासूनच अत्यंत
बुद्धिमान होते. वक्तृत्व, काव्यरचना ह्यांवर त्यांचे प्रभुत्व होते. जिव्हा आणि लेखणी ते सारख्याच
ताकदीने चालवत. त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा फटका, स्वतंत्रतेचे स्तोत्र ह्या रचना त्यांच्या प्रतिभेची साक्ष देतात. चाफेकरबंधूंना फाशी दिल्याचे वृत्त समजताच लहानग्या सावरकरांनी आपली कुलदेवता भगवती हिच्यापुढे "देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा सेतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन" अशी शपथ घेतली.

मार्च, १९०१ मध्ये विनायकराव यमुनाबाई यांच्याशी विवाहबद्ध झाले. लग्नानंतर १९०२ साली फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला व १९०६ साली उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले. राष्ट्रभक्तसमूह ही गुप्त संघटना त्यांनी पागे आणि म्हसकर ह्या आपल्या साथीदारांच्या साहाय्याने स्थापन केली. मित्रमेळा ही संघटना ह्या गुप्त संस्थेची प्रकट शाखा होती. ह्याच संघटनेचे पुढे अभिनव भारत ह्या संघटनेत रूपांतर झाले.

इटालियन क्रांतिकारक आणि विचारवंत जोसेफ मॅझिनी ह्याच्या यंग इटली ह्या संस्थेच्या धर्तीवर हे नाव दिले गेले होते. अभिनव भारत व मित्रमेळा या गुप्त क्रांतिकारी संघटनांची स्थापना त्यांनी केली. पुण्यामध्ये विदेशी कापडाची होळी केली (१९०५). श्यामजी कृष्ण वर्मा ह्यांनी घोषित केलेली शिवाजी शिष्यवृत्ती मिळवून कायद्याच्या अभ्यासासाठी सावरकर लंडनला गेले. ही शिष्यवृत्ती त्यांना देण्यात यावी अशी सुचना स्वतः लोकमान्य टिळकांनी केली होती. लंडनमधील इंडिया-हाऊसमध्ये राहात असताना सावरकरांनी जोसेफ मॅझिनीच्या आत्मचरित्राचे मराठी भाषांतर केले. ह्या भाषांतराला जोडलेल्या प्रस्तावनेत सावकरांनी सशस्त्र क्रांतीचे तत्त्वज्ञान विषद केले होते.

त्या काळातील अनेक युवकांना ही प्रस्तावना मुखोद्गत होती. लंडनमध्ये ‘इंडिया हाउस’ मध्ये अभिनव
भारताचे क्रांतिपर्व सुरू झाले. मदनलाल धिंग्रा हा सावरकरांचा पहिला हुतात्मा शिष्य! मदनलालने कर्झन वायली या ब्रिटिश अधिकार्‍याचा वध करून, हसत-हसत फाशी स्वीकारली. त्याच काळात त्यांनी इतर देशांमधील क्रांतिकारक गटांशी संपर्क करून त्यांच्याकडून बॉंब तयार करण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले. ते बॉंम्बचे तंत्रज्ञान व २२ ब्राऊनिंग पिस्तुले त्यांनी भारतात पाठवली. त्यापैकीच एका पिस्तुलाने
नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध 'अनंत कान्हेरे' या १६ वर्षाच्या युवकाने केला. या प्रकरणात अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे व विनायक देशपांडे या अभिनव भारताच्या ३ सदस्यांना फाशी झाली. कलेक्टर जॅक्सनचे जनतेवरील अन्याय वाढत होते, तसेच तो बाबाराव सावरकर (स्वातंत्र्यवीरांचे बंधू) यांच्या तुरुंगवासाला कारणीभूत ठरला होता, म्हणूनच क्रांतिकारकांनी जॅक्सनला यमसदनास पाठवले.

१८५७ मध्ये इंग्रजांविरुद्ध भारतात झालेल्या उठावाचा साधार इतिहास सावरकरांनी लिहिला. 'अठराशे
सत्तावन्नचे स्वातंत्र्यसमर' हा तो ग्रंथ होय. हा उठाव म्हणजे केवळ एक बंड होय हा इंग्रज
इतिहासकारांचा निष्कर्ष सावरकरांनी साधार खोडून काढला. ब्रिटिश शासनाने हा ग्रंथ प्रकाशनापूर्वीच जप्त केला. पण सावरकरांच्या साथीदारांनी तो इंग्लंडच्या बाहेरून प्रसिद्ध करण्यात यश मिळवले. ही ह्या
ग्रंथाची इंग्रजी आवृत्ती होती. मूळ मराठी ग्रंथाचे हस्तलिखित सावरकरांचे मित्र कुटिन्हो ह्यांनी जपून
ठेवले होते. ते भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रसिद्ध झाले.

राजद्रोहपर लिखाण प्रसिद्ध केल्याचा आरोप ठेऊन सावरकरांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर यांना ब्रिटिश शासनाने जन्मठेपेची शिक्षा देऊन काळ्या पाण्यावर धाडले. ह्या घटनेचा प्रतिशोध म्हणून लंडनमध्ये मदनलाल धिंग्रा ह्यांनी कर्झन वायलीला गोळ्या घातल्या तर नाशिक येथे अनंत कान्हेरे ह्यांनी नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन ह्याला गोळ्या घालून ठार केले. नाशिकच्या ह्या प्रकरणात वापरण्यात आलेली ब्राउनिंग जातीची पिस्तुले सावरकरांनी चतुर्भुज अमीन ह्याच्याकरवी धाडली होती.

ब्रिटिश सरकारला याचा सुगावा लागताच त्यांनी सावरकरांना तात्काळ अटक केली. समुद्रमार्गाने त्यांना भारतात आणले जात असताना सावरकरांनी फ्रांन्सच्या मॉर्सेलिस बेटाजवळ बोटीतून उडी मारली(१९१०). ब्रिटिशांच्या कैदेतून सुटून त्यांनी पोहत फ्रांन्सचा समुद्रकिनारा गाठला. पण किनार्‍यावरील फ्रेंच रक्षकांना भाषेच्या समस्येमुळे सावरकरांचे म्हणणे कळले नाही, आणि ब्रिटिश सैनिकांनी त्यांना अटक करून भारतात आणले. त्यांच्यावर खटला भरण्यात आला. त्यांना दोन जन्मठेपांची-काळ्या पाण्याची-शिक्षा (सुमारे ५० वर्षे अंदमानच्या तुरुंगात) ठोठावण्यात आली (१९११).मॉर्सेलिस येथे उडी मारताना सावरकरांनी सखोल विचार केला होता. दोन देशांतील कैदी हस्तांतरण किंवा अन्य तत्सम करारांचा मुद्दा त्यांच्या मनात होता. फ्रांन्सच्या भूमीवरून (त्या शासनाच्या परवानगीशिवाय) ब्रिटिश पोलीस त्यांना पकडू शकणार नाहीत असा त्यांचा अंदाज होता. पण तसे घडले नाही.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा तेजोभंग करण्यासाठी ब्रिटिश सरकारने त्यांना अंदमानच्या काळकोठडीत ठेवले. हरप्रकारे छळले. खड्या बेडीत टांगले. तेलाच्या घाण्याला जुंपले. नारळाचा काथ्या कुटण्याचे कष्टप्रत काम दिले. या मरणप्राय वेदना सहन करीत असतानाही त्यांच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होते, मातृभूचे स्वातंत्र्य! तब्बल ११ वर्षे हा छळ सहन करत असतानाही सावरकरांचे सर्जनशील कवित्व आणि बंडखोर क्रांतिकारकत्व तसूभरही कमी झाले नव्हते. बाभळीच्या काट्यांनी त्यांनी तुरुंगाच्या भिंतीवर महाकाव्ये लिहिली.

अंदमानच्या काळकोठडीत सावरकरांना हिंदुस्थानचे बदलते राजकारण दिसत होते. ब्रिटिशांची बदललेली
नीती, मुस्लीम लीगचा वाढता मुजोरपणा सावरकरांना अस्वस्थ करत होता. आज ब्रिटिश हे मुख्य शत्रू
राहिलेले नाहीत. ते कधीतरी हा देश सोडून जाणारच आहेत. पण पुढे हिंदू संघटन करणे आवश्यक आहे हे सावरकरांनी ओळखले. विठ्ठलभाई पटेल, रंगस्वामी अय्यंगार यांसारख्या नेत्यांच्या प्रयत्नांमुळे व खुद्द सावरकरांनी मुत्सद्दीपणाने ब्रिटिश सरकारची काही बंधने मान्य केल्यामुळे त्यांची अंदमानातून सुटका झाली.

अंदमानाहून सुटकेच्या आधीचे जीवन व सुटकेनंतरचे त्यांचे जीवन, असे सावरकरांच्या जीवनाचे दोन
महत्त्वाचे भाग पडतात. पहिल्या भागात आक्रमक, क्रांतिकारी सावरकर, क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान
सावरकर, धगधगते लेखन करणारे सावरकर - असे त्यांचे रूप दिसते. तर त्यांच्या जीवनाच्या दुसर्‍या
भागात समाजसुधारक सावरकर, हिंदू संघटक सावरकर, भाषाशुद्धी चळवळ चालवणारे व श्रेष्ठ
साहित्यिक सावरकर, समाजात प्रेरणा निर्माण करणारे वक्ते सावरकर, विज्ञाननिष्ठेचा प्रचार करणारे आणि हिंदू धर्म आधुनिक स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करणारे तत्त्वज्ञ व विचारावंत सावरकर - अशा अनेक स्वरूपांत समाजासमोर आलेले दिसतात.

अंदमानातून सुटल्यानंतर सावरकरांना ब्रिटिशांनी रत्‍नागिरीत स्थानबद्द केले. हिंदू समाज एकजीव आणि संघटित करण्यासाठी सावरकरांनी जे काम रत्‍नागिरीत केले. हिंदू समाजाच्या अध:पतनाला
जातिव्यवस्था, चातुर्वर्ण आणि हिंदूंचा धर्मभोळेपणाच जबाबदार आहेत, हे सावरकरांनी ओळखले आणि
त्या विरोधात कार्य केले. सावरकरांनी असंख्य मंदिरे दलितांना उघडी करून दिली. जातिभेद तोडण्यासाठी सहभोजनाचा धडाका उडवून दिला. रत्‍नागिरी येथे त्यांनी पतितपावन मंदिर स्थापन केले, या मंदिरात सर्व जातींच्या लोकांना प्रवेश दिला. सुमारे १५ आंतरजातीय विवाहही त्यांनी लावून दिले.

हिंदू धर्मात जातिव्यवस्थेचे, विषमतेचे समर्थन आहे. त्यामुळेच हिंदूसंघटन करण्यासाठी सावरकरांनी धर्मचिकित्सेची तलवार उपसली. अंधश्रद्धा, जातिभेद यांवर त्यांनी कडाडून टीका केली. रत्‍नागिरीत सावरकर सुमारे १३ वर्षे स्थानबद्धतेत होते. १९३७ पासून सुमारे सात वर्षे, सावरकरांनी हिंदू महासभेचे अध्यक्षपद भूषविले. झंझावाती दौरे, मोठ्यामोठ्या सभा, हिंदूंची सैन्यभरती, रार्येंल क्लब्सची स्थापना अशा अनेक मार्गांनी त्यांनी हिंदू महासभेचे कार्य केले. त्यांनी आधुनिक विचारधारेप्रमाणे बुद्धिवाद व विज्ञाननिष्ठा याची कास धरून हिंदू धर्मात सुधारणा करण्यासाठी लढा दिला.

एक क्रांतिकारक, ज्वलंत साहित्यिक (महाकवी), समाजसुधारक, हिंदू संघटक या पैलुंसह स्वातंत्र्यवीर
सावरकरांनी भारतीय समाज ढवळून काढला, स्वातंत्र्यलढ्यात अभूतपूर्व योगदान दिले. फाळणीला व
तत्कालीन कॉंग्रेसच्या धोरणांना त्यांनी प्रखर विरोध केला. स्वातंत्र्यानंतरही त्यांनी सीमांची सुरक्षा,
सैनिकांची संख्या वाढवणे, शस्त्रसज्जता अश अनेक विषयांचा आग्रह त्यांनी धरला.सुमारे ६० वर्षे त्यांनी स्वातंत्र्य व सुराज्य यांसाठी अथक परिश्रम घेतले.

१९६६ मध्ये वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी प्रायोपवेशनाचा निर्णय घेतला. अन्नत्याग केल्यानंतर २२व्या दिवशी त्यांचे प्राण पंचतत्त्वात विलीन झाले.

सावरकर साहित्य :
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व त्यांच्या भाषाशैलीत प्रतिबिंबित झाले आहे. कवी, निबंधकार,
जीवनदर्शन घडविणारा नाटककार, राजकीय व सामाजिक पार्श्वभूमीवर आधारित कादंब-र्‍यांचा
लेखक,ग्रंथकार, इतिहासकार, भाषाशास्त्रज्ञ ही साहित्यिक सावरकरांची अनेकविध रूपे आहेत.
सावरकरांचे पहिले काम म्हणजे वयाच्या अकराव्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा फटका. सावरकरांनी
त्यांच्या कविता महाविद्यालयात, लंडनच्या वास्तव्यात, अंदमानच्या काळकोठडीत आणि रत्‍नागिरीत
रचल्या. कोठडीच्या भिंतींवर काट्याकुट्यांनी महाकाव्य लिहिणारा हा जगातील एकमेव महाकवी.
शब्दलालित्य, भावोत्कटता, विलक्षण मार्दव व माधुर्य ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. सुस्पष्ट
विचार, तर्कसंगत मांडणी आणि विचारांच्या अभिव्यक्तीचे सामर्थ्य ही त्यांच्या निबंधांची बलस्थाने
आहेत.सावरकर हे इतिहास घडविणारे इतिहासकार होते. त्यांचा शिखांचा इतिहास अप्रकाशित राहिला.
सावरकरांनी विचारप्रवर्तनाबरोबरच भाषाशुद्धीचे प्रत्यक्ष कार्य केले. क्रमांक, चित्रपट, बोलपट, नेपथ्य,
वेशभूषा, दिग्दर्शक, प्राचार्य, प्राध्यापक, मुख्याध्यापक, शस्त्रसंधी, टपाल, दूरध्वनी, नभोवाणी, ध्वनिक्षेपक, अर्थसंकल्प, विधिमंडळ, परीक्षक, तारण, संचलन, गतिमान नेतृत्व, क्रीडांगण,
सेवानिवृत्तीवेतन, महापौर, हुतात्मा, उपस्थित असे शतावधी समर्पक शब्द सावरकरांनी सुचविलेले आहेत.


ग्रंथ आणि पुस्तके :
वीर सावरकरांनी ६,००० पेक्षा जास्त पाने मराठी भाषेत तर १५०० हून जास्त पाने इंग्रजी भाषेत लिहिली आहेत. फारच थोड्या मराठी लेखकांनी इतके मौलिक लिखाण केले असेल. त्यांच्या "सागरा प्राण तळमळला", "हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजी राजा", "जयोस्तुते", "तानाजीचा पोवाडा" ह्या कविता प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यांच्याच कमला या काव्यसंग्रहातील खालील ओळी त्यांचा कडवा राष्ट्रवाद दर्शवितात
-
अनेक फुले फुलती फुलोनिया सुकून जाती
त्याची महती गणती कोणी ठेवली असेल का?
परी गजेंद्र शुंडे उपटीले, श्रीहरिसाठी नेले,
फूल ते अमर ठेले मोक्षदाते पावन.
अमर ती वंशवेला निर्वंश जिचा देशाकरिता,
दिगंती पसरेल सुगंधिता, लोकहीत परिमलाची.


इतिहास : 
१८५७ चे स्वातंत्र्यसमर या ग्रंथाद्वारे, (इ.स. १८५७च्या युद्धाचा पहिले स्वातंत्र्यसमर असा उल्लेख करून
तो लढा त्यांनी पहिल्यांदा भारतीय स्वातंत्र्यलढ्याला जोडला)भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने
हिंदुपदपादशाही


कथा : 
सावरकरांच्या गोष्टी भाग - १
सावरकरांच्या गोष्टी भाग - २

नाटके : 
संगीत उ:शाप
संगीत संन्यस्त खड्‌ग
संगीत उत्तरक्रिया
बोधिसत्व- (अपूर्ण)

कविता :

महाकाव्ये : 
कमला
गोमांतक
विरहोच्छ्वास
सप्तर्षी
स्फुट काव्य
सावरकरांच्या कविता

जन्म: -       मे २८, १८८३ 
जन्म स्थळ -  भगूर, नाशिक जिल्हा, महाराष्ट्र, भारत
मृत्यू: -       फेब्रुवारी २६, १९६६ भारत
चळवळ:     भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना:     अभिनव भारत हिंदू महासभा
धर्म:           हिंदू
वडील:        दामोदर सावरकर
पत्नी:         यमुनाबाई विनायक सावरकर

समर्थ रामदास स्वामी

समर्थ रामदास स्वामी / Samarth Ramdas Swami


समर्थ रामदास (एप्रिल, इ.स. १६०८, जांब, महाराष्ट्र - इ.स. १६८२, सज्जनगड, महाराष्ट्र) हे महाराष्ट्रातील महान संत, कवी व समर्थ संप्रदायाचे उद्गाते होते. रामाला व हनुमंताला उपास्य मानणार्‍या समर्थ रामदासांनी परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम यांच्या प्रसारार्थ महाराष्ट्रात प्रबोधन व संघटन केले. ते संत तुकारामांचे समकालीन होते. हिंदवी स्वराज्य स्थापन करणा~या शिवाजी महाराजांनी अनेक साधू-संतांचे उपदेश घेतले असे म्हटले जात असले तरी समर्थ रामदास व शिवाजी महाराज यांचे गुरु-शिष्य नाते वेगळेच मानावे लागेल.

जीवन

बालपण
श्री समर्थ रामदासस्वामी यांचा जन्म जांब या गावी (जि. जालना) शके १५३० (सन १६०८) मध्ये रामनवमीच्यादिवशी म्हणजे चैत्र शुध्द नवमीस, रामजन्माच्याच शुभमुहुर्तावर, म्हणजे माध्याह्नी झाला. ठोसरांचे घराणे सूर्योपासक होते. नारायण सात वर्षाचा असतांनाच वडील सूर्याजिपंतांचे निधन झाले. घरची सांपत्तिक स्थिती चांगली होती. पण नारायण लहानपणापासूनच विरक्त होते. इतरांहून वेगळे होता. अतिशय बुध्दिमान,निश्चयी तसेच खोडकरही होता. हाती घेतलेले काम तडीस न्यावयाचे असा त्याचा बाणा होता. याच्या बाळपणाची एक गोष्ट प्रसिध्द आहे. एकदां हा लपून बसला, कांही केल्या सापडेना. अखेर एका फडताळांत सांपडला. "काय करीत होतास" असे विचारल्यावर "आई, चिंता करितो विश्वाची" असे उत्तर याने दिले होते..
अशा या विलक्षण मुलाला संसारांत अडकविले, तर तो ताळ्यावर येइल या कल्पनेने १२ व्या वर्षी याचे लग्न ठरविण्यात आले. लग्न-समारंभात पुरोहितांनी "सावधान" हा शब्द उच्चारतांच तो एकून, नेसलेले एक अंगावरील पांघरलेले दुसरे, अशा दोन वस्त्रानिशी हा मंडपातून पळाला. लोकांनी पाठलाग केला. पण याने तांतडी करून गांवाबाहेरची नदी गांठली आणि नदीच्या खोल डोहांत उडी मारली.
[]तपश्चर्या आणि साधना
पुढे तेथून पायी चालत चालत पंचवटीस येऊन याने रामाचे दर्शन घेतले, आणि टाकळीस दीर्घ तपश्चर्या केली. सूर्योदयापासून माध्याह्नापर्यंत नदीच्या डोहांत छातीइतक्या पाण्यांत उभे राहून गायत्री पुरश्चरण केले. रामनामाचे १२ कोटी वेळा नामस्मरण करून अवतार कार्याला आरंभ केला. साक्षात प्रभू श्रीराम हेच त्यांचे सद्‌गुरू झाले. १२ वर्षाच्या तीव्र तपश्चर्येनंतर यांना आत्म-साक्षात्कार झाला. त्यावेळी समर्थांचे वय २४ वर्षाचे होते.
पुढील १२ वर्षे समर्थांनी तीर्थयात्रा केली. सारा हिंदुस्थान पायांखाली घातला. प्रत्येक ठिकाणच्या लोक-स्थितीचे सूक्ष्म निरीक्षण केले. भारत-भ्रमण करीत असतां पंजाबांत शीखांचे सहावे गुरू हरगोविंद यांच्याशी समर्थांची भेट झाली होती. समाजाच्या दुर्धर स्थितीसंबंधी दोघांची चर्चा/बातचीतही झाली होती. 'समान-शिले-व्यसनेषु सख्यम्' या न्यायाने दोघांत सख्य झाले होते. याच वेळी प्रचलित सर्व शास्त्रांचा अभ्यासही केला, आणि वयाच्या ३६ व्या वर्षी ते महाराष्ट्रात परत आले.
[]जीवनकार्य
आत्म-साक्षात्कार झाल्यानंतर प्रथमत: सामान्य लोकांनाही पारमार्थिक मार्गास लावावे, अशी इच्छा त्यांना साहजिकच झाली. पण पुढील १२ वर्षाच्या प्रवासांत त्यांनी जे पाहीले, जे भयंकर विदारक अनुभव घेतले, त्याने त्यांच्या चरित्र्यास एक वेगळीच कलाटणी मिळाली. त्या काळी भारतांतील जनता कमालीच्या हीन, दीन, त्रस्त आणि अपमानित अवस्थेत काळ कंठीत होती. यावनी सत्तेच्या अमानुष जुलुमाखाली भरडली जात होती. लोकांची मालमत्ता, बायका-मुले, आया-बहिणी, देव, धर्म, संस्कृती, कांहीच सुरक्षित नव्हते. जनतेची ही ह्र्दय-द्रायक अवस्था पाहून समर्थ अत्यंत अस्वस्थ झाले, उद्विग्न झाले.
सर्वस्वी निसत्व आणि दुर्बल झालेल्या आपल्या समाजास परमार्थाचा उपदेश हानिकारकच ठरण्याचा संभव आहे, समाजाला प्रथम संघटित आणि शक्ति-संपन्न बनविले पाहीजे, समाजाचा लुप्त झालेला आत्म-विश्वास पुन: जागृत केला पाहिजे, अशी त्यांची खात्री झाली.
मसूरास रामनवमीचा उत्सव करून समर्थांनी आपल्या लोकोध्दाराच्या कार्याला पाया घातला. शके १५७० मध्ये त्यांनी चाफळास राम-मंदिराची स्थापना केली. निरनिराळ्या गांवी अकरा मारूतींच्या मंदिराची स्थापना केली. ‘मराठा तितुका मेळवावा। महाराष्ट्र धर्म वाढवावा।’ यासाठी त्यांनी काया झिजविली. हरिकथा निरूपण, राजकारण; सावधपण व साक्षेप या तत्त्वांच्या आधारे कार्य करणारा ‘रामदासी’ संप्रदाय त्यांनी निर्माण केला. या माध्यमातून संघटना बांधत, त्यांनी कार्य सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार लोक-संग्राहाचा अचाट उद्योग त्यांनी मांडला.
समर्थ रामदासांच्या ‘जय जय रघुवीर समर्थ’ या गर्जनेने मरगळलेला महाराष्ट्र जागा झाला. दर्‍या-खोर्‍यातून; डोंगर कपारीतून एकच नाद घुमला. सह्याद्रीच नव्हे तर गंगा-यमुना आणि कावेरीची खोरीही या घोषणेने दणाणून टाकली. आसेतुहिमाचल मठ-महंत निर्माण करून, नि:स्पृह नेतृत्व समाजात निर्माण करून त्यांनी राष्ट्र उभारणीच्या कार्याला पूरक असे कार्य साधले. धर्मसत्ता व राजसत्ता यांचा अपूर्व समन्वय साधून सशक्त तरुणांची मने राष्ट्रवादाने भारून टाकली. प्रभू श्रीरामचंद्र, आदिशक्ती तुळजाभवानी आणि शक्ती उपासनेसाठी मारुतीराया या तीन देवतांचा जागर त्यांनी समाजात मांडला. अक्षरश: शेकडो मारूती मंदिरांची स्थापना त्यांनी केली. स्वत: डोंगरदर्‍यात, घळीत राहून समाजाचे व देशाच्या कल्याणाचेच चिंतन केले. समाजातील प्रत्येक घटकाला, अनेक अनाथ, निराधार बालकांना, स्त्रियांना सन्मार्गाचा, आत्मोद्धाराचा मार्ग दाखविला. प्रपंच आणि परमार्थ नेटका करण्यासाठी विवेकसंपन्न व्हा, असा उपदेश केला. आनंदवनभुवनाचे स्वप्न पाहिले. हिंदुस्थान बलसंपन्न व्हावा यासाठीच क्षात्रतेज व ब्राह्मतेज जागविले.
‘सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे। परंतु, तेथे अधिष्ठान पाहिजे। भगवंताचे।’ या त्यांच्याच सूत्रानूसार भगवंताचे अधिष्ठान असलेली चळवळ निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकोत्तर कार्याचे महत्त्व लक्षात घेऊन स्वराज्य बलशाली व्हावे म्हणून समाजसंघटन करून राष्ट्रउभारणीच्या कार्याला मोलाची मदत केली. सहिष्णू व जयिष्णू धर्माचा समन्वय साधून रामराज्याचा मंत्र जागविला.शिवाजीमहाराज आग्य्राहून सुटुन महाराष्ट्रांत परत आले, तेव्हां त्या जोखमीच्या परतीच्या प्रवासांत या मठांचा त्यांना उपयोग झाला होता.
विविध विषयांतून लीलया समाजप्रबोधन करणार्‍या समर्थांचे हे सर्व करीत असताना मुख्य उद्दिष्ट होते हिंदवी स्वराज्य! त्यासाठीच त्यांनी देशात हलकल्लोळ माजवला. शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीचा पाया भक्कम करण्याचे काम समर्थांमुळे सोपे झाले आणि या महाराष्ट्राच्या भुवनी आनंदवन उदयास आले.
सातारा, चाफळ, सज्जनगड या परिसरात समर्थांचे वास्तव्य अधिक काळ होते. समर्थ स्थापित राम मंदिर, अकरा मारूतींची मंदिरे याच परिसरात आहेत. ती पुढीलप्रमाणे: (१) दास मारुती, चाफळ (राम मंदिरासमोर) (२) वीर मारुती, चाफळ (राम मंदिरामागे) (३) खडीचा मारुती, शिंगणवाडी, चाफळ (डोंगरावर) (४) प्रताप मारुती, माजगांव, चाफळ (५) उंब्रज मारुती (ता. कराड) (६) शहापूर मारुती (उंब्रज जवळ) (७) मसुर मारुती (ता. कराड) (८)बहे-बोरगांव (क्रुष्णामाई) मारुती (जि. सांगली) (९) शिराळा मारुती (बत्तीस शिराळा, जि. सांगली) (१०) मनपाडळे मारुती (जि. कोल्हापूर) (११) पारगांव मारुती (जि.कोल्हापूर).
दासबोधाचे लेखन त्यांनी रायगडाजवळील शिवथरघळीत बसून केले. चाफळ परिसरात समर्थांची व छत्रपती शिवाजी महाराजांची भेट झाल्याचे उल्लेख इतिहासात आढळतात. परमार्थ, अध्यात्म, श्रीराम व श्रीहनुमान भक्ती आणि संपूर्ण समाजाचा ‘नेटका प्रपंच’ या सर्वच बाबतीत स्वत: अत्युच्च स्थान गाठून समाजाला मार्गदर्शन करणार्‍या (आजही मार्गदर्शक ठरणार्‍या) समर्थांनी शके १५७१ च्या वैशाखांत समर्थांनी शिवाजीमहाराजांना अनुग्रह दिला. महाराजांच्याच विनंतीवरून त्यांनी पुढेसज्जनगडावर वास्तव्य केले. शके १६०२ (सन १६८०) मध्ये शिवाजीमहाराज कैलासवासी झाल्यानंतर पुढच्याच वर्षी माघ वद्य नवमी शके १६०३ (सन १६८१) समर्थांनीही सज्जनगडावर देह ठेवला. हीच दासनवमी होय.
[]व्यक्तिमत्व

मध्यम उंची, मजबूत बांधा, गौर वर्ण, तेजस्वी कांति, कपाळावर लहानसे टेंगुळ, असे समर्थांचे स्वरूप होते. कमरेस लंगोटी, किंवा कधी कफनी, पायांत खडावा. लांब दाढी, जटा, गळ्यांत जपायची माळ, यज्ञोपवीत, हातांत कुबडी, कांखेस झोळी, अशा थाटांत समर्थांची रूबाबदार आणि दुस-यावर छाप पाडणारी मूर्ति संचार करीत असे. समर्थ अतिशय चपळ होते. ते भरभर चालत. एका ठिकाणी फारसे रहात नसत. स्नान-संध्या एके ठिकाणी, भोजन दुसरे ठिकाणी. तर विश्रांती तिसरीकडे असा त्यांचा खाक्या होता. ते मितभाषी आणि शिस्तीचे होते. त्यांना मनुष्याची उत्तम पारख होती. ते स्वत:उद्योगी असल्यामुळे आळशी मनुष्य त्यांना आवडत नसे. आळशी मनुष्यास ते करंटा म्हणत. त्यांना लोक-स्थितीचे उत्तम ज्ञान होत, अनेक भाषा अवगत होत्या. मराठी, संस्कृत, हिंदी व उर्दू यांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांच्या मठाधिपतींच्या नियमित गुप्त बैठकी होत असत. अशा बैठकांसाठी ठिकठिकाणी गुप्त गुहा, विवरे त्यांनी शोधून ठेवली होती.
बहुतेक संतांना मानवी गुरू आहेत. समर्थांना मानवी गुरू नाही. स्वतः श्रीरामाने त्यांना राममंत्राचा अनुग्रह दिला अशी श्रद्धा आहे. ते स्वयं-प्रज्ञ होते. आपल्या आयुष्याचे ध्येय त्यांनी स्वत:च ठरविले, आणि ते साध्य करण्यासाठी मार्गही स्वत:च शोधला. समाजाविषयी अपार तळमळ, करूणा, हीच त्यांची प्रेरणा होती. धर्म-संस्थापना हेच त्यांचे कार्य होते.
“शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे। वसिष्ठापरि ज्ञान योगेश्र्वराचे। कवि वाल्मिकासारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरू रामदासा।।”
हा त्याच्याबद्द्लचा श्लोक सार्थच आहे.
साहित्य व काव्यनिर्मिती

समाजाविषयीच्या अपार तळमळीतून समर्थांनी विपुल वाङमय निर्मिति केली. रोखठोक विचार, साधी सरळ भाषा आणि स्पष्ट निर्भीड मांडणी ही त्यांची वैशिष्टये होती.दासबोध, मनाचे श्लोक, करुणाष्टके, भीमरूपी स्तोत्र, 'सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची' ही गणपतीची आरती, 'लवथवती विक्राळ ब्रम्हांडी माळा' ही शंकराची आरती, कांही पदे इत्यादि त्यांच्या कृति प्रसिध्द आहेत. `श्रीमत्‌ ग्रंथराज दासबोध’ या पारमार्थिक ग्रंथाची रचना शिवथरघळ (महाडजवळील) येथे केली.
या शिवाय, दासबोध, रामायणांतील किष्किंधा, सुंदर व युध्द ही कांडे, कित्येक अभंग, आरत्या, भूपाळ्या, पदे, स्तोत्रे, राज-धर्म, क्षात्र-धर्म, शिवाजीमहाराज, संभाजीमहाराज यांस पत्रे, आपल्या शिष्यांना मार्गदर्शन, मठ आणि त्यांतील उत्सव यांसंबंधी मार्गदर्शन, आत्माराम, अन्वय-व्यतिरेक, वैराग्य-शतक, ज्ञान-शतक, उपदेश-शतक, षडरिपु-विवेक इत्यादि विपुल लेखन समर्थांनी केले आहे.
समर्थांची शिकवण कशी व्यावहारिक शहाणपणाची, सावधानतेची, आत्म-विश्वास उत्पन्न करणारी, रोखठोक आणि राजकारणी स्वरूपाचीही होती, हे त्यांच्या पुढील कांही वचनांवरून दिसून येइल.
समर्थ म्हणतात -
१. आधी संसार करावा नेटका | मग घ्यावें परमार्थ-विवेका ||
२. मराठा तितुका मेळवावा | आपुला महारष्ट्रधर्म वाढवावा ||
३. जो दुस-यावरी विश्वासला | त्याचा कार्यभाग बुडाला ||
४. आहे तितुकें जतन करावे | पुढें आणिक मिळवावें ||
५. धटासी आणावा धट | उत्धटासी पाहिजे उत्धट | खटनटासी खटनट | अगत्य करी" ||
६. धर्मासाठी मरावें | मरोनी अवघ्यांसी मारावें | मारितां मारितां घ्यांवें | राज्य आपुलें ||
७. केल्याने होते आहे रे आधी केलेंचि पाहिजें ||
८. आधी केलें | मग सांगितलें ||
९. सामर्थ्य आहे चळवळेचें | जो जो करील तयाचें | परंतु तेथे भगवंताचें | आधिष्ठान पाहिजे ||
१०. देव मस्तकीं धरावा | अवघा हलकल्लोळ करावा | मुलुख बडवा कां बडवावा | धर्मसंस्थापनेसाठी ||
एका दृष्टीने समर्थांच्या शिकवणुकीचे सार केवळ दोन शव्दांत सांगतां येते - प्रयत्न व सावधानता.
समर्थांनी राष्ट्रउभारणीसाठी जसे बहुमोल मार्गदर्शन केले तसेच लोकशिक्षण, प्रपंच, परमार्थ, विवेक या गोष्टींवरही भर दिला कारण यातूनच राष्ट्र उभे राहते, स्वराज्य स्थापन होते. लोकांनी साक्षर व्हावे यासाठी त्यांनी लिहिण्याची , वाचण्याची मोहीम काढली. आपल्या वचनात ते म्हणतात- ‘दिसा माजी काही तरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचीत जावे’ त्याचबरोबर त्यांनी असेही सांगितले - जे जे आपणासि ठावे। ते ते इतरांसि शिकवावे। शहाणे करून सोडावे सकळ जन।।
प्रपंच सोडून जर परमार्थ केला, तर केवळ आत्मोन्नती होईल परंतु प्रपंच करून परमार्थ केला, तर राष्ट्रोन्नती होईल म्हणून ते म्हणतात की - प्रपंची जे सावधन। तोचि परमार्थ करील जाण। प्रपंची जो अप्रमाण। तो परमार्थी खोटा।। समर्थांनी साहित्य, कला, आरोग्य, जीवनशैली, निसर्ग, बांधकाम, उद्योग या विषयांवरही लिहिले आहे. जीवनाचे कोणतेही अंग समर्थांनी सोडलेले नाही. सर्वच क्षेत्रांत उच्च ध्येय गाठण्यासाठी, यश मिळवण्यासाठी काय करावे, याचे तपशीलवार मार्गदर्शन समर्थ करतात. परळी येथे मठस्थापना करताना मठाच्या परिसरात बाग करण्यात येत होती त्या वेळी त्यांनी बागेवरती एक अखंड प्रकरणच लिहीले. तसेच सामानगडावर किल्ले बांधताना लिहिलेल्या ‘कारखाने’ या प्रकरणाच्या पहिल्या समासात विटा कशा कराव्यात, बांधकाम या प्रकरणात मजुरांना कशी , किती कामे द्यावीत यासारखी सर्व माहिती त्यांनी दिली आहे.
याशिवाय गाणे कसे असावे हे सांगताना समर्थ लिहितात, बाळके श्वापदे पक्षी। लोभती वेधती मनी। चित्त निश्चिंत होतही। धन्य ते गायनी कळा।। मराठी (प्राकृत) भाषेचा अभिमानही समर्थ व्यक्त करतात. समर्थ लिहितात,
‘येक म्हणजी मर्‍हाठी काय। हे तो भल्यासी ऐको नये। ती मूर्ख नेणती सोय। अर्थान्वयाची।। लोहाची मांदूस केली। नाना रत्ने साठविली। ती अभाग्याने त्यागिली। लोखंड म्हणोनी। तैसी भाषा प्राकृत।।’
असे अनेक विषय त्यांच्या साहित्यात आहेत. समर्थांची मराठी भाषा ही मोजक्याच पण ठसठशीत शब्दांत सर्व काही सांगणारी भाषा आहे. समृद्ध शब्दरचना, मराठी शब्दांची वैभवशाली उधळण, तर्कशुद्ध विचारांची रेखीव, नेटकी मांडणी आणि माणसाच्या जीवनाचे, अगदी छोट्या-छोट्या व्यवहारांचे सूक्ष्म निरीक्षण (अन्‌ त्याचे प्रकटीकरण) ही समर्थांच्या साहित्याची आणखी काही वैशिष्ट्ये. विशिष्ट लय, गेयता हीदेखील त्यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये होत. समर्थांची काव्यरचना आणि तिचे साहित्यगुण हा स्वतंत्र अभ्यासाचाच विषय आहे.


                  बोधामृत
मनाचे श्लोक- एकूण २०५ मनाचे श्लोक आहेत.
दासबोध
छत्रपती शिवाजी महाराजांना लिहिलेले पत्र
मारुति स्तोत्र
करुणाष्टके

समर्थसंप्रदाय

समर्थसंप्रदाय हा महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचा संप्रदाय. समर्थ रामदास स्वामी यांनी तो शिवकालात स्थापन केला. संत रामदास स्वामींप्रमाणेच या संप्रदायाच्या संतकवींनी व संतकवयित्रींनी विपुल लेखन केलं आहे. या संप्रदायाची हस्तलिखितं मुख्यत्वेकरून धुळ्याच्या समर्थ वाग्देवता मंदिरात उपलब्ध होतात. ती मिळविण्यासाठी समर्थ भक्त शंकरराव देव यांनी अपार परिश्रम केले. त्यामुळे हा मौलिक संग्रह आजवर टिकून राहिला.
शिष्यमंडळ
कल्याण स्वामी.
उध्दव स्वामी
भीम स्वामी
दिनकर स्वामी
केशव स्वामी
हणमंत स्वामी
रघुनाथ स्वामी
रंगनाथ स्वामी
भोळाराम
वेणा बाई
आक्का बाई
दिवाकर स्वामी
गिरिधर स्वामी

संत ज्ञानेश्वर


संत श्री ज्ञानेश्वर
‘नमितो योगी, थोर विरागी तत्त्वज्ञानी संत। तो सत् कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत।।’
                                                                           - श्रीस्वरूपानंद स्वामी

संत ज्ञानेश्वर म्हणजे सुमारे ७२५ वर्षांपूर्वी महाराष्ट्राला पडलेले सुंदर आध्यात्मिक स्वप्न!  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातील, परमार्थाच्या क्षेत्रातील ‘न भूतो न भविष्यति’ असे अजोड व्यक्तिमत्त्व व अलौकिक चरित्र म्हणजे संत ज्ञानेश्वर!  गेली सुमारे ७२५ वर्षे महाराष्ट्रातील सर्व पिढ्यांतील, सर्व स्तरांतील समाजाने जे व्यक्तिमत्त्व आपल्या मनोमंदिरात एक अढळ श्रद्धास्थान म्हणून जपले आहे; आणि जे श्रद्धास्थान पुढील असंख्य पिढ्यांतही कायमच अढळ व उच्चस्थानी राहणार आहे; असे एकमेवाद्वितीय व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री संत ज्ञानेश्वर!


ब्रम्ह साम्राज्य चक्रवर्ती, मती गुंग करून टाकणारी अलौकिक काव्य प्रतिभा लाभलेला रससिद्ध महाकवी, महान तत्त्वज्ञ, श्रेष्ठ संत, सकल विश्र्वाचे कल्याण चिंतणारा भूतदयावादी परमेश्वरभक्त, पूर्ण ज्ञानाचे मूर्तिमंत प्रतीक, श्रीविठ्ठलाचा प्राणसखा - अशा शब्दांत त्यांचे वर्णन केले जाते. परंतु त्यांचे परिपूर्ण वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडल्याचेही जाणवते. संत चोखामेळा पुढील शब्दांत त्यांना वंदन करतात.
‘कर जोडोनिया दोन्ही। चोखा जातो लोटांगणी।।
महाविष्णूचा अवतार। प्राणसखा ज्ञानेश्वर।।’
`प्राणसखा' हा अतिशय वेगळा, सुंदर व समर्पक शब्द चोखोबांनी (तेराव्या शतकात) संत ज्ञानेश्वरांबद्दल वापरला आहे.

‘शूचीनाम श्रीमतां गेहे, योगभ्रष्टोऽभिजायते’ (भगवद् गीता ६.४१) अशा पवित्र कुळात त्यांचा जन्म आपेगाव येथे तेराव्या शतकात, मध्यरात्री श्रावण कृष्ण अष्टमी, शके ११९७ (इ.स. १२७५) रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी व त्यांच्या आई रुक्मिणीबाई या होत. गोविंदपंत व मीराबाई हे त्यांचे आजोबा-आजी होत. निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू. निवृत्ती, सोपान व मुक्ताबाई या त्यांच्या भावंडांचा जन्म अनुक्रमे शके ११९५, ११९९ व १२०१ मध्ये झाला. (काही अभ्यासकांच्या मते निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई या सर्व भावंडांचा जन्म आळंदी येथेच अनुक्रमे शके ११९०, ११९३, ११९६ व ११९९ मध्ये झाला.) आपेगाव हे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणजवळ गोदावरी नदीच्या काठावर वसलेले छोटे गाव आहे. श्री विठ्ठलपंत हे मुळात विरक्त संन्यासी होते. त्यांनी संन्यास घेतल्यानंतर गुरुच्या आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केला. त्यांना चार अपत्ये झाली. श्री निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई अशी त्यांची नावे होत. विठ्ठलपंत तीर्थयात्रा करत करत श्री क्षेत्र आळंदी मुक्कामी येऊन स्थायिक झाले. अलंकापुरी (आळंदी) हे सिद्धपीठ होते. त्या काळी संन्यासाची मुले म्हणून सर्व समाज या चौघा भावंडांची हेटाळणी करीत असे. परित्यक्त ब्राह्मण म्हणून त्यांना काळ कंठावा लागला. श्रीज्ञानेश्र्वरांच्या आई-वडिलांनी देहांत प्रायश्र्चित घेतले. त्यांचे वडीलबंधू कृपासिंधू निवृत्तीनाथ हे भावंडांचे सर्वेसर्वा होते.

श्री निवृत्तीनाथ हेच संत ज्ञानेश्र्वरांचे सद्गुरू होते. नेवासा क्षेत्रात आपल्या सदगुरूंच्या कृपाशीर्वादाने भगवद् गीतेवर त्यांनी प्रख्यात टीका लिहिली. (संत ज्ञानेश्र्वरांनी ही टीका सांगितली व सच्चिदानंद बाबा यांनी लिहिली.) या ग्रंथास ‘ज्ञानेश्वरी’ किंवा ‘भावार्थदीपिका’ असे म्हणतात. हे मराठी वाङ्मयाचे देशीकार लेणे झाले आहे. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृत भाषेतील ‘ज्ञान’, श्री संत ज्ञानेश्वरांनी प्राकृत भाषेत आणले.
माझा मराठाचि बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।। (ज्ञाने - ६.१४)

असे म्हणत त्यांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान, मराठीची महती व्यक्त केली आहे.  सर्व स्तरांतील लोकांना ही ‘ज्ञानेश्वरी’ भुरळ घालते. मराठी भाषेतील हा अद्वितीय ग्रंथ आहे. विचार, भावना, आशयाची खोली, अलंकाराचे श्रेष्ठत्व, अद्वैतानुभूती, भक्तीचा ओलावा, रससंपन्नता या सर्वच बाबतीत ज्ञानेश्वरीने उंची गाठलेली आहे. ‘पसायदान’ ही विश्वकल्याणाची प्रार्थना म्हणजे संत ज्ञानेश्वरांच्या वैश्विक सद्भावनेचा, तसेच प्रतिभेचा परमोच्च साक्षात्कार आहे. कर्मयोग, ज्ञानयोग व भक्तियोग सांगणार्‍या ग्रंथराज ज्ञानेश्वरीत सुमारे ९००० ओव्या आहेत. हा ग्रंथ इ.स. १२९० मध्ये लिहिला गेल्याचे मानले जाते. ज्ञानेश्वरीबद्दल आचार्य विनोबा भावे म्हणतात, ‘मराठी साहित्य वजा (-) ज्ञानेश्वरी बरोबर (=) शून्य’. तर संत नामदेव महाराज म्हणतात,
‘नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी।   एक तरी ओवी अनुभवावी।।’

त्यांचा दुसरा ग्रंथ ‘अनुभवामृत’ किंवा ‘अमृतानुभव’ होय. हा विशुद्ध तत्त्वज्ञानाचा, जीव-ब‘ह्म ऐक्याचा ग्रंथ आहे. सुमारे ८०० ओव्या (दहा प्रकरणे) या ग्रंथात आहेत. तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने हा श्रेष्ठ ग्रंथ आहे.
‘चांगदेव पासष्टी’ या ग्रंथाद्वारे त्यांनी चांगदेवांचे गर्वहरण करून त्यांना उपदेश केला. चांगदेव हे महान योगी १४०० वर्षे जगले असे मानले जाते. पण यांचा अहंकार गेला नव्हता. यासाठी संत ज्ञानेश्र्वरांनी उपदेशपर लिहिलेले ६५ ओव्यांचे पत्र म्हणजे चांगदेव पासष्टी हा ग्रंथ होय.यात अद्वैताचे अप्रतिम दर्शन आहे. संत ज्ञानेश्वरांचा ‘हरिपाठ’ (अभंगात्मक,२८ अभंग) हा नामपाठ आहे. यात हरिनामाचे महत्त्व सांगितले आहे. ही वारकर्‍यांची त्रिकाल संध्याच होय. हे अभंग आशयसंपन्न तर आहेतच परंतु प्रत्यक्ष अनुभूतिसंपन्न आहेत. हरिप्राप्तीचे सोपे सुलभ साधन म्हणजे नामस्मरण होय, असेच हरिपाठ सांगतो. भक्तीला ज्ञानेश्वरांनी पंचम पुरुषार्थ मानले आहे. ‘कर्मे ईशु भजावा’ हाच त्यांचा कर्मयोग व भक्तियोग आहे. त्यांच्या वाङ्मयाला परतत्त्वाचा स्पर्श झालेला आहे. वाङमयीन सौंदर्य व गुणविशेषांबरोबरच मराठीचा अभिमान, संयम, उदात्तता, नम्रता, त्यांचे निर्मळ चारित्र्य, सर्वसमावेशकता, वात्सल्य, भक्तिपरता आणि कालातीतता - असे अनेक गुणविशेष त्यांच्या साहित्यातून आपल्याला अनुभवण्यास मिळतात. ज्ञानदेवांसह सर्व भावंडांवर तत्कालीन समाजाने प्रचंड अन्याय केला, पण त्या अन्यायाबद्दलची पुसटशी प्रतिक्रियादेखील त्यांच्या साहित्यात आढळत नाही, हे विशेष!

`ज्ञानदेव म्हणजे माय मराठीचे हृदय! निसर्ग हाच श्रीकृष्ण, जाणीव हाच अर्जुन, यांच्या संवादातला मर्माभ्यास ही ज्ञानेश्वरी. जाणिवेच्या पातळीवरील सखोल चिंतन ही चांगदेव पासष्टी. मननाचा मन:पूत महोत्सव हाच अमृतानुभव. मानसिक शुद्ध स्नान म्हणजे हरिपाठ. सगुण अनुभवाची कोजागिरी म्हणजे ज्ञानदेवांची भजने होत', अशा समृद्ध शब्दांत ज्येष्ठ अभ्यासक यशवंत पाठक संत ज्ञानेश्वरांचे व त्यांच्या साहित्याचे वर्णन करतात.

‘जो जे वांछिल, तो ते लाहो’ असे म्हणत अखिल विश्वाची जणू काळजी वाहणार्‍या संत ज्ञानेश्वरांना वारकरी संप्रदायासह सर्वच भक्त प्रेमाने ‘माउली’ म्हणतात. त्यांनी धर्मातील क्लिष्ट अवडंबरे काढून धर्माला कर्तव्याचा वेगळा अर्थ दिला. वाङ्मय निर्मितीबरोबरच त्यांनी आध्यात्मिक लोकशाहीचे बीज रोवण्याचा यशस्वी प्रयत्न चंद्रभागेच्या वाळवंटात केला. भागवत धर्माचा तथा वारकरी संप्रदायाचा पाया रचण्याचे अभूतपूर्व कार्य त्यांनी केले. संत नामदेव, संत गोरोबा कुंभार, संत सावतामाळी, संत नरहरी सोनार, संत चोखामेळा या समकालीन संत प्रभावळीचे अनौपचारीक नेतृत्व करत, संत ज्ञानेश्वरांनी अध्यात्माच्या क्षेत्रात समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला.

‘अमृतानुभव’ या ग्रंथाच्या लेखनानंतर संत ज्ञानेश्वरांनी तीर्थयात्रा केली. संत नामदेव महाराजांच्या ‘तीर्थावली’ मध्ये या तीर्थयात्रेचा उल्लेख आढळतो. या यात्रेनंतर माउलींनी समाधी घेण्याचा निर्णय घेतला. संत नामदेवांच्या ‘समाधीच्या अभंगां’मध्ये तत्कालीन संदर्भ सापडतात. अन्य संतांची मानसिक स्थिती, त्यांच्यासह समाजाला झालेले दु:ख, खुद्द नामदेव महाराजांच्या वेदना, ज्ञानेश्वरांचा संयम आणि निग्रह - या सर्व गोष्टींचे प्रतिबिंब समाधीच्या अभंगांत आढळते.
संतवर्य ज्ञानदेवांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी, आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या पावन तीरावर संजीवन समाधी घेतली  (कार्तिक वद्य त्रयोदशी, शके १२१८, दूर्मुखनाम संवत्सर, इ.स.१२९६, गुरुवार). हा ‘ज्ञानसूर्य’ मावळल्यानंतर अवघ्या वर्षभरात निवृत्ती, सोपान व मुक्ताबाई या त्यांच्या भावंडांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली. ज्येष्ठ कवी बा. भ. बोरकर संजीवन समाधीनंतरच्या वातावरणाचे वर्णन पुढील यथार्थ शब्दांत करतात. -
                  ‘ज्ञानदेव गेले तेव्हा, कोसळली ‘भिंत’,
                   वेद झाले रानभरी, गोंधळले संत.’