Showing posts with label अभिनेते / Marathi Actors. Show all posts
Showing posts with label अभिनेते / Marathi Actors. Show all posts

Wednesday, 23 April 2014

पु.ल.देशपांडे


पु.ल.देशपांडे साहित्य, संगीत, नाटक, चित्रपट, वक्तृत्व आदी क्षेत्रांत ज्यांना अभिव्यक्तीची ‘अमृतसिद्धी’ साध्य झाली होती आणि ज्यांची ‘साठवण’ मराठीजनांनी अनंत काळासाठी मनामनात करून ठेवली आहे असे ‘आनंदयात्री’!
महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी मनाजवळचं व्यक्तिमत्त्व म्हणजे पु. ल. देशपांडे. सर्वसामान्य मराठी माणसाचं प्रेम, आपुलकी, आदर, त्यांच्याबद्दलचा अभिमान... आदी भावनांचं सर्वाधिक प्रकटीकरण ज्यांच्याबाबत महाराष्ट्रानं अनुभवलं ते व्यक्तिमत्त्व म्हणजे पुरूषोत्तम लक्ष्मण देशपांडे! त्यांच्याबद्दल लिहायला शब्द अपुरे पडतील. केवळ लेखक नव्हे तर बहुआयामी असणारं असं व्यक्तिमत्त्व. लेखनातही तोचतोचपणा नाही. निबंध, समीक्षण, नाटक, प्रहसन, एकांकिका, अनुवाद, पटकथा, व्यक्तिचित्रण, चिंतनात्मक लेखन अशा अनेक लेखनप्रकारात त्यांच्या लेखणीने हुकूमत गाजवली. गांधीजींचं चरित्रलेखन, बंगाली भाषेचा अभ्यास, रवींद्रनाथांच्या कवितांचा अनुवाद याही वेगळ्या प्रकारच्या लेखनातून पु. ल. आपल्याला भेटतात. साहित्य, संगीत, नाटक, वक्तृत्व, अभिनय.... कलेच्या ज्या ज्या प्रांतात पु.ल. वावरले त्या त्या प्रांताचे ते अनभिषिक्त सम्राट झाले. अभिनय, एकपात्री अभिनय, हार्मोनियम (संवादिनी) वादन, कथाकथन, स्वत:च्या लेखनाचे सादरीकरण, अभिवाचन, नाट्य व पटकथा लेखन, दिग्दर्शन, काव्यवाचन... या प्रत्येक क्षेत्रात पुलंनी अतिशय उच्च दर्जाचे यश प्राप्त केले, अफाट लोकप्रियता मिळवली, आपला श्रेष्ठ दर्जा सिद्ध केला.

वयाच्या १६ व्या वर्षी ‘आजोबा हरले’ या प्रहसनापासून पु. लं ची लेखनयात्रा चालू झाली. पुढे पूर्वरंग, अपूर्वाईतून त्यांनी प्रवास घडवला, कधी व्यक्ती आणि वल्लीतून अनेकांची भेट घालून दिली, कधी मर्ढेकर-आरती प्रभू-बोरकरांच्या कविता प्रभावी काव्यवाचनातून रसिकांपर्यंत समर्थपणे पोहोचवल्या, बटाट्याच्या चाळीचा फेंरफटका घडवला. असे हे ‘कोट्याधीश’ पु.ल. रसिकांच्या मनात घर करून राहिले.

पु. ल. नी एकूण १४ एकांकिका लिहिल्या. ती फुलराणी, तुज आहे तुजपाशी, सुंदर मी होणार अशी उत्तमोत्तम नाटकं लिहिली. नाट्यदिग्दर्शन, अभिनय या क्षेत्रांतही आपला ठसा उमटवला. ‘अंमलदार’ हे पु. लं. नी रूपांतरित केलेलं पहिलं नाटक. अनुवाद किंवा रूपांतर हा पु. लं. च्या विविध पैलूंमधला आणखी एक पैलू. इतर भाषिक नाटकांचं रूपांतर करताना त्याचं भारतीयीकरण, मराठीकरण मोठ्या कौशल्यानं पु. लं. नी केलं. १९४७ साली ‘कुबेर’ या चित्रपटातून पु. लं. चं पहिलं दर्शन झालं. संवादलेखक, दिग्दर्शक, पटकथाकार, गायक, नायक, गीतकार, संगीतकार अशा अनेक भूमिकांमधून चित्रपटक्षेत्रात पु. लं. वावरले. त्यांचा गुळाचा गणपती हा चित्रपट ‘सबकुछ पु.ल.’ म्हणूनच गाजला. ही त्यांची कारकीर्द १९९३ च्या ‘एक होता विदूषक’ इथवर बहरली. त्यातले त्यांचे संवाद प्रत्येकाला भावले, अभिजाततेचा अनुभव देऊन गेले.

भास्कर संगीतालयाच्या दत्तोपंत राज्योपाध्यांकडून घेतलेलं हार्मोनियमचं शास्त्रीय शिक्षण हा पु. लं. चा आणखी एक पैलू. पंडित भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, मिल्लिकार्जुन मन्सूर अशा दिग्गजांना त्यांनी हार्मोनियमवर समर्थ साथ केली. त्यांच्या हार्मोनियम वादनाच्या ध्वनिफितीही उपलब्ध आहेत.

सादरीकरणाचं विलक्षण व हमखास यशस्वी ठरणारं कर्तृत्व पु. लं. कडे होतं. त्यांचे हावभाव, शब्दफेक, देहबोली, आवाजावरचं नियंत्रण सगळंच विलक्षण आणि लक्ष वेधून घेणारं. बटाट्याची चाळ, वार्‍यावरची वरात, असा मी असा मी या प्रयोगांतून पु. लं. मधले ‘परफॉर्मर’ भेटतात. लेखन असो, वादन असो, गायन असो, नाटक किंवा वक्तृत्व सगळीकडे पु. लं. चं सादरीकरण थक्क करतं.

राजकारण हा पु. लं. चा प्रांत कधीच नव्हता. पण १९७५ च्या आणीबाणीच्या काळात त्यांच्या वक्तृत्वाला व विनोदाला उपहासाची धार आली. त्या काळात जयप्रकाश नारायणांच्या ‘प्रीझन डायरी’ चा त्यांनी मराठी अनुवाद करून लोकांपुढे साकार केला. आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत जनता पक्षासाठी पु. लं. नी अनेक भाषणं केली. राजकारणात त्या काळापुरता पु. लं. मधला कार्यकर्ता आणीबाणीविरुद्ध लढला.

पु. लं. च्या साहित्यातून त्यांची अचाट निरीक्षणशक्ती, अनलंकृत प्रवाही संवादात्मक भाषाशैली, मराठी व संस्कृतवरील प्रभुत्व, संदर्भ श्रीमंती, भाषेतली लवचीकता, नावीन्य, भावस्पर्शी लिखाण आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे निखळ, निर्व्याज विनोद, कोणालाही न बोचणारा, दुखणारा विनोद या सगळ्या गोष्टी प्रामुख्यानं दिसतात. त्यांच्या लेखनासह, वक्तृत्वातही संदर्भांची श्रीमंती जाणवते. संस्कृत सुभाषिते, वेद-पुराणे, संतसाहित्य, म्हणी-वाक्‌प्रचार, यांसह विविध संस्कृतींमधले, जीवनव्यवहारातले अनेक संदर्भ पु. लं. च्या समृद्ध लेखनात आढळतात. यामुळेच त्यांची निवेदन-शैलीही उठून दिसते!

साहित्य-नाटक-संगीत या क्षेत्रात प्रवेश करणार्‍या नवोदिताला शाबासकीची थाप द्यावी ती पु.लं. नीच. ‘ती फुलराणी’ करताना भक्ती बर्वे-इनामदारांना हाच अनुभव आला. ज्येष्ठ गायिका आशा खाडिलकर यांचं गायन ऐकून ते आवडल्याचं कळवणारा फोन रात्री ११:०० वाजता करून प्रोत्साहन देणारे पु. ल. वेगळेच. तरुण संगीतकार सलील कुलकर्णींच्या बालगीतांच्या ध्वनिमुद्रिकेचं भरभरून कौतुक करणारे पु. ल. च होते. मुस्लीम समाजात काम करणार्‍या हमीद दलवाईंबद्दल पहिल्यांदा पु. लंनीच लिहिलं. एका अनोळखी दिग्गजाची ओळख सामान्य वाचकांना करून दिली. समोरच्या व्यक्तीमधल्या चांगल्या गोष्टी ओळखून त्या इतरांना सांगण्याची क्षमता फार कमी लोकांकडे असते आणि त्यापैकी एक पु. ल. होते.

पु.लं. मधला दाता खूप जणांना अनोळखी असेल. सामाजिक बांधिलकी कृतीशीलतेने मानणार्‍या पु. ल. व सुनीताबाई या दांपत्याने बाबा आमटे, अनिल अवचट, बाबा आढाव, हमीद दलवाई आदी अनेक कार्यकर्त्यांना, सामाजिक संस्थांना, त्यांच्या विविध उपक्रमांना कोणताही गाजावाजा न करता, सहजपणे व सढळतेने सहकार्य केले. सुनिताबाईंसारख्या सहधर्मचारिणीच्या प्रयत्नातून पु. ल. देशपांडे फाउंडेशन उभं राहिलं. या फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी पुढील संस्था - व्यक्तींना मदत केली.

- अंध व्यक्तींसाठी देणगी - उत्तमोत्तम मराठी साहित्य ब्रेल लिपीत आणण्यासाठी आर्थिक मदत.
- वेश्यांच्या मुलांसाठी चालवल्या जाणार्‍या निहार या संस्थेला सहकार्य.
- कोयना भूकंपग्रस्त मुलांसाठी मदत.
- ग्रामीण स्तरावरील शास्त्र प्रयोगशाळेलाही मदत.
- मुंबई येथील एशियाटिक सोसायटी या संस्थेला सहकार्य.

कलाक्षेत्रातील त्यांच्या अभूतपूर्व योगदानामुळे पु. ल. देशपांडे पहिल्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे मानकरी ठरले. पु. लं. ना पुण्यभूषण, पद्मश्री, पद्मभूषण या पुरस्कारांसह संगीत नाटक अकादमी पुरस्कार व साहित्य अकादमीचा पुरस्कारही प्राप्त झाला. मध्य प्रदेश, कलकत्ता, गोवा या राज्यांतूनही पु. लं. ना पुरस्कार मिळाले आणि हा मराठी साहित्यिक भौगोलिक, भाषिक व सांस्कृतिक सीमा ओलांडून पार गेला.

‘जिवंत माणसाइतके जगात पाहण्यासारखे काही नाही’, अशी जीवनाकडं बघण्याची त्यांची वृत्ती आपले आयुष्य आणखी सुंदर बनवते. जीवन सुंदर करू पाहणार्‍या चार्ली चॅप्लीन आणि रवींद्रनाथ टागोर या दोन व्यक्तिमत्त्वांचा प्रभाव पु. ल. देशपांडे यांच्या जीवनातून व अभिव्यक्तीतूनही स्पष्टपणे जाणवतो. त्यांना ‘महाराष्ट्राचे वुडहाऊस’ ही म्हटले जाते. अवघ्या महाराष्ट्रावर प्रदीर्घ काळ आनंदाची उधळण करणारा हा आनंदयात्री १२ जून, २००० ला जग सोडून गेला खरा, पण त्यांचं अस्तित्व आजही मराठी मनात शाबूत आहे.

बालगंधर्व

बालगंधर्व / Balgandharv

आपले गायन व अभिनय यांच्या साहाय्याने मराठी रंगभूमी व नाट्यसंगीताच्या क्षेत्रात सुवर्णयुग निर्माण करणारे युगनिर्माते!
नारायण श्रीपाद राजहंस उर्फ बालगंधर्व यांचे नुसते नाव जरी उच्चारले, तरी मराठी मनाच्या तरफा एकदम झंकारू लागतात. अच्युत बळवंत कोल्हटकर ह्यांनी महाराष्ट्राच्या दैवतांची नावे घेताना छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक यांच्याबरोबर बालगंधर्वांचीही गणना केली आहे. ही तीन नावे जादूच्या मंत्रासारखी आहेत. पु.ल. देशपांडे म्हणतात, ‘‘बालगंधर्व या नावाचा उच्चार केला किंवा ते नाव नुसतं कानी पडलं, तरी क्षणार्धातच जादूचं झाड फुलून यावं, तसं मराठी मन फुलून येतं किंवा जे मन असं फुलून येतं, त्याला मराठी मन म्हणायला हरकत नाही. बालगंधर्वांसारखा लोकोत्तर कलाकार शंभर वर्षांतून एकदाच जन्माला येतो. या रंगभूमीच्या बादशाहाने सुमारे चार तपे मराठी मनावर राज्य केलं.’’



सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात नागठाणे या गावी जन्मलेल्या बालगंधर्वांनी मराठी रंगभूमीची मनोभावे सेवा केली. नाटकांतील नेपथ्य-सजावट, नाट्यसंगीत, नाट्याभिनय या क्षेत्रांत मनापासून उपासना करून स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण केली.

बालगंधर्वांच्या स्त्री भूमिका म्हणजे साक्षात ‘कायाप्रवेशच’. त्यांच्या नजरेत, मुद्रेत, हसण्यात, लाजण्यात, मुरकण्यात, चालण्यात, कपडे नेसण्यात साक्षात स्त्रीचा संचार झालेला आहे  असे वाटत असे.  ‘पुरुषाच्या देहातून स्त्रीचे सौंदर्य इतक्या मोहकतेने कधीच प्रकट झाले नसेल,’ असे आचार्य अत्रे यांनी बालगंधर्वांबाबत म्हटले आहे.

मराठी रंगभूमीला पडलेले सुंदर स्वप्न बालगंधर्वांच्या रूपाने सत्यात आले. सहजसुंदर अभिनय आणि केवळ गंधर्वांबरोबरच तुलना होऊ शकेल असा आवाज, म्हणूनच लोकमान्य टिळकांनी छोट्या नारायणाला ‘बालगंधर्व’ ही उपाधी दिली.बालगंधर्वांना सुंदर, मोहक आणि बोलका चेहरा लाभला होता. गोड गळ्याची देणगीही त्यांना जन्मजात लाभली होती. शास्त्रीय संगीताची बैठक उत्तम होती. भास्करबुवा बखले ह्यांच्याकडून त्यांनी गायनाचे धडे घेतले होते. नाट्यगीतांसह ख्याल, ठुमरी, गझल, दादरा, भक्तिगीते यांसारख्या गायन प्रकारांवरही त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते.

१९०५ मध्ये त्यांनी किर्लोस्कर नाटक मंडळीत प्रवेश केला. त्यांची शाकुंतल नाटकातील ‘शकुंतला’ व मानापमान नाटकातील ‘भामिनी’ या भूमिकांमुळे एक प्रतिभावंत कलाकार म्हणून त्यांचे नाव सर्वत्र झाले. स्त्री भूमिका करताना अभिनयक्षमता, अचूक निरीक्षण व  सौंदर्यदृष्टी असल्यामुळे स्त्री मनाचे सूक्ष्म भाव सहजपणे प्रकट करण्यात ते यशस्वी झाले. शकुंतला ते सिंधूपर्यंत त्यांच्या स्त्री भूमिकांमध्ये विविधता होती. त्यांच्या वेशभूषा व अलंकारांचे अनुकरण त्या काळातील स्त्रियाही करत असत.

१९१३ मध्ये त्यांनी गंधर्व नाटक मंडळी ही संस्था स्थापन केली. या संस्थेने संगीत रंगभूमीला सुवर्णकाळ दाखवला. संगीत सौभद्र, मृच्छकटिक, शाकुंतल, मानापमान, संशयकल्लोळ, शारदा, मूकनायक, स्वयंवर, विद्याहरण, एकच प्याला अशा अनेक संगीत नाटकांनी व त्यातील बालगंधर्वांच्या स्त्री भूमिकांनी रसिकांवर त्या काळी मोहिनी घातली होती. या नाटकांच्या प्रयोगांबाबत बालगंधर्वांच्या गीतांना २-३ वेळा वन्समोअर; सातत्याने ‘हाऊस फुल्ल’ होणारे प्रयोग आणि पहाटेपर्यंत चालणारे प्रयोग ह्या गोष्टी नित्याच्याच झाल्या होत्या. त्यांनी संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्याबरोबर केलेला ‘संयुक्त मानापमान’ या नाटकाचा प्रयोगही प्रचंड गाजला. त्यांनी एकूण २५ विविध नाटकांत भूमिका केल्या. साधारण १९१० ते १९३० हा कालखंड रंगभूमीचा, नाट्यसंगीताचा सुवर्णकाळ मानला जातो, तो प्रामुख्याने बालगंधर्वांच्या कर्तृत्वामुळेच.

१९३३ च्या सुमारास बोलपटांचे युग सुरू झाले. साहाजिकच रंगभूमीकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. बालगंधर्वांनीही प्रभातच्या ‘धर्मात्मा’ या चित्रपटात संत एकनाथांची भूमिका केली. बोलपटात त्यांचे मन रमेना. त्यांचा ओढा रंगभूमीकडेच राहिला. १९३९ च्या सुमारास त्यांनी रंगभूमीवर पुरुष भूमिका  साकारल्या. पण त्यांच्या स्त्री भूमिकाच प्रेक्षकांना जास्त प्रिय होत्या. १९५५ रोजी त्यांनी ‘एकच प्याला’ नाटकात साकार केलेली सिंधू ही त्यांची शेवटची भूमिका ठरली. त्यानंतर त्यांनी रंगभूमीवरून निवृत्ती घेतली. ह्या रसिकप्रिय कलावंताचा संगीत नाटक अकादमीने राष्ट्रपती पदक देऊन सन्मान केला. पुढे त्यांनापद्मभूषण ह्या पुरस्काराने गौरविले गेले. त्याआधी १९२९ सालच्या २४ व्या मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.

नाटकांमधील त्यांची अनेक पदे गाजली. शास्त्राचा बाज राखून, अभिनयाला अनुकूल असे गाणे त्यांनी गायले. त्यांची गाणी घरोघरी पोचली. नाट्यसंगीताच्या माध्यमातून बालगंधर्वांनी शास्त्रीय संगीताच्या प्रसाराला हातभार लावला. एका अर्थाने त्यांनी शास्त्रीय संगीत सोपे करून रसिकांसमोर मांडले. नाट्यसंगीताची अभिरूची सामान्य रसिकांमध्ये निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य बालगंधर्वांनी केले. आपल्या हयातीतच आख्यायिका बनून राहिलेल्या या असामान्य कलाकाराची स्मृती रसिकांनी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या रूपाने जतन करून ठेवली आहे.
( बालगंधर्वांच्या जीवनावर श्रीमती हेमंती बॅनर्जी यांनी माहितीपट बनवलेला आहे. या माहितीपटास राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे.)

राम गणेश गडकरी


नाट्य, काव्य व विनोदी लेखन या क्षेत्रांत अतिशय कमी कालावधीत अत्युत्कृष्ट, दिशादर्शक अभिव्यक्ती साधणारे प्रतिभासंपन्न साहित्यिक आणि आपल्याला ‘महाराष्ट्र गीता’ ची देणगी देणारे कवी!
मराठी साहित्यातील एक श्रेष्ठ नाटककार, विनोदकार आणि कवी. विशेषत: मराठी साहित्यात व रंगभूमीवर विनोद रुजवणारे व आपल्या प्रतिभेची छाप सोडणारे साहित्यिक म्हणून राम गणेश गडकरी अजरामर ठरले. बाळाराम या नावाने त्यांनी विनोदी लेखन केले, तर गोविंदाग्रज या टोपणनावाने त्यांनी काव्यलेखन केले. त्यांच्या कविता ‘वाग्वैजयंती’ (१९२१) या काव्यसंग्रहातून प्रसिद्ध झाल्या. ते स्वत:ला केशवसुतांचे सच्चे चेले म्हणवून घेत असत. पण तरीही गोविंदाग्रज केशवसुतांहून अनेक दृष्टींनी वेगळे होते.

गोविंदाग्रजांनी विपुल प्रमाणात प्रेमकविता लिहिली. त्यांना प्रेमाचे शाहीर असेच म्हटले जायचे. गुलाबी कोडे, गोड निराशा, पहिले चुंबन, मुरली, प्रेम आणि मरण, गोफ, ती कोण? अशा अनेक प्रेमकविता त्यांनी लिहिल्या.

क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव पडो मरणांचा,  मग पुढे...

यांसारख्या शब्दांतून त्यांची विलक्षण प्रतिभा प्रभाव पाडून जाते. प्रेमभंगाचे दु:ख व्यक्त करताना ते एका कवितेत म्हणतात,

जगावाचुनी लाभतीस तर जग मी केले असते, तुझ्यावाचुनी जग परि आता हो असत्याचे नसते...
डोळ्यांपुरते जग नच असते रुप जगाला पुरते, प्रेमळ हृदया  परि निर्दय जग दगडाखाली पुरते...
होईल होईल वाटत होते तेच अखेरीस झाले, नाव घेतल्यावाचुन आता मनात झुरणे आले...
या ओळींमधून व्यक्त झालेली प्रेम-निराशेची तडफड इतकी जिवंत आणि भेदक आहे की या अवस्थेतून गेलेल्या कुणालाही ती आपलीशी वाटेल. गोविंदाग्रज हे प्रेमाचे शाहीर होतेच, पण त्यांनी महाराष्ट्राला एक देणं देऊ केलं आहे, ते म्हणजे महाराष्ट्र गीताचं. त्यांच्या एका कवितेत त्यांनी महाराष्ट्राचे प्रेरणादायी, यथार्थ वर्णन केले आहे.

‘‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा।
नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा ।।
अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा ।
बकुळ फुलांच्या प्राजक्तांच्या दळदारी देशा।।
भावभक्तीच्या देशा, आणिक बुद्धीच्या देशा ।
शाहिरांच्या देशा, कर्त्या मर्दांच्या देशा ।।’’
काही काळ त्यांनी शिक्षक म्हणून काम केले, तसेच ‘ज्ञानप्रकाश’ मध्ये उपसंपादक म्हणूनही त्यांनी काम केले. त्यातूनच पुढे त्यांचा नाटक मंडळींशी, नाट्यलेखनाशी संपर्क आला. कल्पकता, बुद्धिमत्ता आणि भाषाप्रभुत्व या तीनही शक्ती गडकरी यांना प्रमाणाबाहेर लाभल्या होत्या. म्हणूनच ते नाटककार म्हणूनही विलक्षण यशस्वी ठरले. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या विनोदी लेखनाचा, नाट्याचा त्यांच्यावर प्रभाव होता. बालपणापासूनच साहित्याची ओढ लागल्याने वयाच्या सतराव्या वर्षीच ‘मित्रप्रिती’ नावाचे नाटक त्यांनी लिहिले. त्यानंतर १९१३ मध्ये रंगभूमीवर आलेले ‘प्रेमसंन्यास’ हे त्यांचे पहिले नाटक होय. नंतर अनुक्रमे पुण्यप्रभाव (१९१७), एकच प्याला (१९१९), भावबंधन (१९२०) ही नाटके रंगभूमीवर आली.  ‘राजसंन्यास’ हे त्यांचे अपूर्ण राहिलेले नाटक. त्यांच्या नाटकांबरोबरच त्यांच्या नाटकातील काही पात्रेही अजरामर ठरली. एकच प्याला या नाटकातील सिंधू, तळीराम, सुधाकर किंवा भावबंधनमधील घनश्याम, धुंडीराज, प्रेमसंन्यासमधील गोकूळ ही पात्रे आजही मराठी कलावंतांना आणि रसिकांना आनंद देतात. ‘वेड्यांचा बाजार’ हे त्यांचे अपूर्ण नाटक पुढे चिंतामणराव कोल्हटकर यांनी पूर्ण केले.

करुण आणि हास्य ह्या दोन्ही रसांची निर्मिती आपल्या लेखनातून सारख्याच परिणामकारकतेने त्यांनी साधलेली दिसते. त्यांच्या कथांतून निखळ विनोदाबरोबरच उपहासात्मक व्यंगही ठळकपणे आढळते. रिकामपणाची कामगिरी (१९२१), संपूर्ण बाळकराम (१९२५) यांतून त्यांचे विनोदी लेखन प्रसिद्ध झाले. याशिवाय गडकरी यांचं बरंचसं अप्रकाशित लेखन आचार्य अत्रे यांनी १९६२ मध्ये ‘अप्रकाशित गडकरी’ या नावाने प्रसिद्ध केले. नाट्यलेखन व विनोदी लेखन या क्षेत्रांत आचार्य अत्रे यांनी राम गणेशांची परंपरा पुढे समर्थपणे चालवली.

या सर्वच साहित्य प्रकारात यांच्या लेखणीने आपला स्वत:चा ठसा उमटवला. पण मराठी साहित्यक्षेत्रात अजरामर ठरलेल्या त्या लेखणीमागच्या कलावंताने- राम गणेश गडकरी यांनी -मात्र वयाच्या ३४ व्या वर्षीच या जगाचा निरोप घेतला.

रजनीकांत

शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत



 हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेता,मनोरंजन व्यवसायातील प्रसिद्ध व्यक्ती,चित्रपटातील एक मोठे व्यक्तीमत्त्व, आणि ख्यातनाम तमिळ चित्रपट अभिनेते व परोपकारी/लोककल्याणकारी व्यक्ती आहे.एम.जी.रामचंद्रन नंतरचे सर्वात यशस्वी कलाकार म्हणून त्यांची ख्याती आहे.ते गेल्या तीन हून अधिक दशकांपासून तमिळ चित्रपट सष्टीवर अधिराज्य गाजवत आहेत.तमिळ आणि एकंदरीतच दक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीचे अनभिक्षीत सम्राट ,प्रेक्षकांची गर्दी खेचून आणणारे,आपल्या संवादफेकी बद्दल प्रसिद्ध आणि आपल्या विशिष्ट अभिनय शैलीसाठी रजनीकांत जाणले जातात. हे तमिळ चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेते आहेत. दक्षिण भारतात त्यांच्या नावावर सर्वात जास्त यशस्वी चित्रपट आहेत. त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिळ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. त्यांची मातृभाषा मराठी असली, तरीही त्यांनी मराठी चित्रपटांत कधीही काम केले नाही. ते भारतातील व आशिया खंडातील ('शिवाजी द बॉस' या चित्रपटानंतर) सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. 'शिवाजी द बॉस' चित्रपटासाठी त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते.रजनीकांत हे भारताबाहेर अनेक देशात लोकप्रिय अभिनेते आहेत,तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे.जपान मध्ये त्यांचे चित्रपट अधिक लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे व त्यांचे फॅनक्लब्स देखील आहेत.
रजनीकांत ह्यांचा जन्म १२ डिसेंबर १९५० रोजी बंगळूर येथे एका महाराष्ट्रीयन मराठा हेन्द्रे पाटील (मराठी भाषक) कुटूंबात झाला.त्यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड असून वडिलांचे रामोजीराव आणि आईचे जीजाबाई गायकवाड असे आहे.गायकवाड कुंटुंबीयांच्या चार अपत्यांपैकी सर्वात लहान रजनीकांत आहेत.त्यांचे मुळ गाव पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील आहे असे सांगीतले जाते.तसेच जेजूरीचा खंडेराय त्यांचे कुलदैवत असल्याचे मध्यंतरी रजनीकांत ह्यांनी सकाळ ह्या वृत्तपत्रास दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते.रजनीकांत ह्यांना दोन मोठे भाऊ आणि एक बहिण देखील आहे.शाळेत असतांना गरिबीमुळे त्यांना खूप कठिण परिस्थितीत दिवस काढावे लागले.बंगळूर येथील आचार्य पाठशाळा ह्या शाळेत त्यांचे शालेय शिक्षण झाले व रामकृष्ण मिशनच्या बंगळूरमधील महाविद्यालयात त्यांचे उच्चशिक्षण पूर्ण झाले.१९६८-१९७३ दरम्यान रजनीकांत मद्रास आणि बंगळूर मध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळी कामं केली.त्यानंतर ते बंगळूर बस ट्रांस्पोर्ट सर्व्हिस मध्ये कंडक्टर (वाहक) म्हणून दाखल झाले.चित्रपट काम करण्याच्या जिद्दी मुळे आणि एका मित्राच्या मदतीने ते त्यानंतर चेन्नैला चित्रपटातील अभिनय शिकण्यासाठी गेले.मद्रास फिल्म इंस्टीट्यूट मध्ये अभिनयाचा अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांनी आपल्या अभिनयाची कारकिर्द १९७४-७५मध्ये सुरू केली.
२००० सालचा भारत सरकारतर्फे दिल्या जाणार्या पद्मभूषण ह्या नागरी गौरवाचे मानकरी.
जर्मनीतील सर्वोच्च नागरी सन्मान/पुरस्कार द फ्युरिअर ने सन्मानीत.
जपानचा एमटीव्ही सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार, जागतीक चित्रपटातील योगदानाबद्दल.
टाईम्स मॅगझीन ने रजनीकांत ह्यांना जगातील सर्वात प्रभावी १०० व्यक्तींच्या यादीत स्थान दिले आहे.
आशिया खंडातील चित्रपट उद्योगात जॅकी चॅन नंतरचे सर्वात अधिक मानधन मिळविणारे कलाकार.
आंतरराष्ट्रीय चित्रपट जगतात सर्वाधिक प्रसिद्धी बद्दल गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस मध्ये नोंद.(सर्वाधिक जागतिक चाहते असणारा कलाकार.)
६ वेळा (सर्वोत्कृष्ट अभिनेता) तमिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार विजेता तसेच अनेकदा नामांकन.
९ वेळा (सर्वोत्कृष्ट अभिनेता) सिनेमा एक्सप्रेस चित्रपट पुरस्कार विजेता तसेच अनेकदा नामांकन.
१० वेळा फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेता तसेच लेखक, निर्माता,सहकलाकार, अशा अनेक भूमिकांबद्दल अनेक नामांकन आणि पुरस्कार.
महाराष्ट्र शासनाचा २००७ चा सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार (राज कपूर पुरस्कार) विजेता.
१९९५ मध्ये आध्यात्मिकतेसाठी "ओशोबिस्मित" पुरस्काराने सन्मानीत.
भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोत्तम कामगिरीचा चेवलिर शिवाजी गणेशन पुरस्कार विजेता.

लक्ष्मीकांत बेर्डे

लक्ष्या
लक्ष्मीकांत बेर्डे
लक्ष्मीकांत बेर्डे या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत दीड ते दोन दशकं अक्षरश: धूमाकुळ घातला. विनोदाचे अत्यंत अचुक टायमिंग असणारा हा अभिनेता. पण केवळ विनोदी अभिनेता असे त्यांचे वर्णन करणे त्यांच्यावरचा अन्याय ठरेल. कसदार अभिनय करणाऱयाया या अभिनेत्याकडे त्यांच्या अभिनयक्षमतेला वाव मिळू शकतील असे चित्रपट अपवादानेच मिळाले.

वास्तविक अनेक गंभीर भूमिकांमधूनही त्यांनी आपली सशक्त अभिनयक्षमता दाखवून दिली. मात्र, एकूणच त्यांच्या विनोदी भूमिकांमुळे त्यांच्यावरचा विनोदी अभिनेत्याचाच शिक्का कायम राहिला. लक्ष्मीकांतला खरा 'ब्रेक थ्रू' मिळाला तो 'टुरटुर' या नाटकाने. हे पहिलेच नाटक जबरदस्त हीट ठरले. त्यानंतर शांतेचे कार्ट चालू आहे, बिघडले स्वर्गाचे द्वार, कार्टी चालू आहे ही नाटकेही यशस्वी ठरली.

मग लक्ष्मीकांतने मागे वळून पाहिलेच नाही. नाटके करता करता त्यांनी चित्रपटात प्रवेश केला. तेथेही ते प्रचंड यशस्वी ठरले. 'लक्ष्या' या नावाने अबालवृद्धांमध्ये त्याची लोकप्रिय पसरली. त्यांची जोडी जमली ती महेश कोठारे यांच्यासमवेत. कोठारेंचा चित्रपट अन लक्ष्या नाही असे सहसा घडलेच नाही.

कारण कोठारे व बेर्डे म्हणजे व्यावसायिक यशाची हमखास खात्री अशी ओळख निर्माण झाली होती. त्याचबरोबर या दोघांचा चित्रपट म्हणजे मनोरंजनाची शंभर टक्के हमी हे समीकरणही रूढ झाले होते. धुमधडाका, धडाकेबाज, थरथराट ते आताच्या 'झपाटलेला'पर्यंत ते कायम होते. सचिनबरोबरही 'बनवाबनवी'सह अनेक चित्रपट केले.

त्यांना अभिनयाची नैसर्गिक देणगी मिळाली होती. विनोदाचे त्यांचे टायमिंग अचुक होते. प्रेक्षकांच्या समोर आल्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन टाकण्याची त्यांची शैली अनोखी होती. त्यांच्या लोकप्रियतेला 'कॅश' करण्यासाठी 'चल रे लक्ष्या' मुंबईला सारखा चित्रपटही निघाला. शिवाय अनेक चित्रपट त्यांना समोर ठेवून काढण्यात आले.

त्यात अनेक पडेल चित्रपटही होते. अशोक सराफ व लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जोडीने याच काळात धुमाकूळ घातला. वास्तविक या दोन्ही कलाकारांचे ट्युनिंग अतिशय चांगले जमले होते. मात्र, त्याचा चांगला उपयोग फार कमी दिग्दर्शकांना करता आला. त्यांच्या चित्रपटांनी मराठी मनांचे मनोरंजन करीत अनेकांना आयूष्यातील तणाव, दुःख विसरायला लावून आनंदाचे कारंजे फूलविले.

मराठीत प्रसिध्दीच्या लाटेवर स्वार असतांनाच त्यांना हिंदी‍त चांगल्या निर्मिती संस्थांच्या ऑफर्स आल्या. राजश्री प्रॉडक्शनचा मैने प्यार किया हा त्यातीलच एक. यात लक्ष्मीकांतने सलमान खानच्या मित्राची भूमिका अगदी छान निभावली. याशिवाय अनेक हिंदी चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या. पण अभिनयाचा कस लागेल अशी भूमिका त्यांनी हिंदीत क्वचितच मिळाली.

मराठीत अशा भूमिका त्यांना मिळाल्या, पण त्याही अगदी थोड्याच. ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेल्या 'एक होता विदुषक' या गंभीर नाटकातील भूमिकेने कलक्ष्मीकांतच्या अभिनयक्षमतेवर शिक्कामोर्तब झाले. पण तशा भूमिका त्यांना फार काही मिळाल्या नाहीत.

अगदी अलीकडच्या काळात त्यांनी पुन्हा रंगभूमीवर लेले विरूद्ध लेले आणि सर आले धावून या नाटकाद्वारे बऱयाच वर्षांनी पाऊल ठेवले. पण ही नाटके फार चालली नाहीत. अनेक दूरचित्रवाणी मालिकांमधूनही त्यांनी एक काळ गाजवला.

असा हा हरहुन्नरी कलाकार चाहत्यांना शेवटपर्यंत हसवत राहिला. पण किडनीच्या आजाराची माहिती इतरांना न देता हलक्या पावलांनी १६ डिसेंबर २००४ रोजी या जगातून निघून गेला.


लक्ष्मीकांत बेर्डे यांचे चित्रपट
धडाकेबाज
दे दणादण
झपाटलेला
हमाल दे धमाल
अशी ही बनवाबनवी
चल रे लक्षा मुंबईला
हसली ती फसली
थरथराट
साजन
बेटा
मैने प्यार किया
हम आपके है कौन

रंगभूमी कारकीर्द-
एक होता विदूषक
लेले विरूध्द लेले
कार्टी प्रेमात पडली
बिघडले स्वर्गाचे दार
शांतेच कार्ट चालू आहे