Wednesday, 23 April 2014

संत नामदेव

॥ भक्तश्रेष्ठ संत नामदेव ॥

येत्या सोमवारी संत नामदेवांची पुण्यतिथी. पंजाबात विठ्ठलभक्ती रुजवणारे नामदेव महाराज हे संतपुरुषांमधले फार मोठे आश्‍चर्य होते. श्रीविठ्ठलाच्या जोडीला रामनामाचे महत्त्वही महाराजांनी आपल्या हिंदी अभंगांमधून सहजपणे ओवले.


 भक्तशिरोमणी संत नामदेव महाराज हे नामवेदाचे साक्षात प्रकट रूप होते. मराठी भाषेतील ते पहिले चरित्रकार होते. ज्ञानदेवांचे समकालीन असणार्‍या नामदेवांनी ज्ञानदेवांचे चरित्र दोनशे पंचवीस अभंगांतून फुलातल्या गंधासारखे उलगडले, म्हणून ज्ञानदेवांचे अलौकिक आयुष्य ज्ञात झाले. ज्ञानदेवादी चारही भावंडांच्या समाधीचे वर्णन नामदेव महाराजांनी केले आणि या लोकोत्तर भावंडांचे आयुष्य किती विलक्षण होते हे केवळ नामदेव महाराजांमुळे कळले. नामदेवांनी आत्मपर अभंगातून आपल्या प्रदीर्घ आयुष्याचा पट उलगडला. पांडुरंगाला प्रत्यक्ष घास भरवणारे नामदेव महाराज हे भक्ती क्षेत्रातील अलौकिक कोडे होते. भागवत धर्माची पताका गंगा आणि सिंधूच्या प्रदेशात फडकवत ठेवणारे नामदेव महाराज पंजाबी आणि शीख समाजाच्या गळ्यातले ताईत झाले. कारण त्यांनी हिंदी भाषेत अभंग लिहिले. हिंदी भाषेत अभंग लिहिणारे ते पहिले मराठी संत होते. पंजाबी लोकांच्या हृदयगाभार्‍यात श्रीविठ्ठलाचे चरण उमटवणारे नामदेव महाराज म्हणजे आश्चर्यालाच आश्‍चर्य वाटावे असे लोकोत्तर संत होते.
श्रीविठ्ठलाच्या सगुण भक्तीत आयुष्यभर रममाण झालेल्या नामदेव महाराजांचा कालखंड आहे १२७०-१३५०. नामदेवांचा जन्म कार्तिक शुद्ध एकादशी शके ११९२ म्हणजेच २६ ऑक्टोबर १२७० रोजी झाला आणि आषाढ त्रयोदशी शके १२७२ म्हणजेच ३ जुलै १३५० मध्ये पंढरपुरात समाधीस्थ झाले. नामदेव महाराज म्हणतात,
मरोनि जन्मावें पंढरीचें पारी ।
व्हावें महाद्वारीं कृमिकीटक ॥
संतचरणरज लागे येतां जातां ।
नामा म्हणे आतां हेचि व्हावे ॥
नामदेव महाराजांच्या मनातला हा विचार त्यांच्या सर्वच भक्तांनी त्यांच्या अस्थी राऊळाच्या महाद्वाराशी पुरून तिथेच ‘पायरी’रूपाने महाराजांची समाधी चिरंतन केली. विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी ‘नामदेवांची पायरी’ आजही वारकरी मंडळी अत्यंत आदराने आणि भक्तिप्रेमाने पुजतात. ऐंशी वर्षांचे प्रदीर्घ आयुष्य महाराजांना लाभले.
नामप्रेमाचा जिव्हाळा हाच विठ्ठलभक्तीचा गाभा आहे. ‘एका नामे हरिजोडे’ ही महाराजांची भूमिका होती. नाम हेच कर्म आहे आणि नाम हेच ब्रह्म आहे हे नामदेव महाराजांचे सर्वांना स्वानुभवाधिष्ठित सांगणे होते. वारकरी संप्रदायाचा श्रीविठ्ठलभक्तीचा प्रसार नामदेव महाराजांनी अथकपणे केला. उत्तरेच्या दिशेने झेपावलेले नामदेव हे खरे तर भक्तिविश्‍वातले फार मोठे कोडे होते. आपल्या आयुष्यातली शेवटची वीस वर्षे नामदेव महाराजांनी उत्तरेकडील पंजाबात काढली आणि विठ्ठलभक्तीच्या सतारी हिंदी अभंगातून झंकारत ठेवल्या. नामदेव गाथेत महाराजांच्या दोनशे तीस हिंदी अभंगांचा समावेश केलेला आहे. शिखांच्या आदिग्रंथात म्हणजेच ‘गुरुग्रंथसाहेबा’त एकसष्ट अभंग समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यासंबंधीची तपशीलवार माहिती गुरुमुखीत प्रसिद्ध झालेल्या पुरणदासकृत ‘जनमसाखी’त पाहायला मिळते. ग्रंथसाहेबातील हे एकसष्ट अभंग ‘संत नामदेव की गुरुबानी’ म्हणून प्रसिद्ध तर आहेच, परंतु त्याहून महत्त्वाचे म्हणजे शीख धर्मीयांच्या नित्य पठणात ही पदे आहेत. शिखांच्या अंत:करणात नामदेवांविषयी विलक्षण आदर आहे. पंजाबमधील घुमान गावी नामदेव महाराजांचे मंदिर जे आहे ते पंजाबी आणि शिखांच्या नामदेवप्रेमाचे मूर्त साकार रूप आहे. मुसलमानांचे आक्रमण झालेले असताना शेकडो कोस दूर असणार्‍या पंजाबात वयाच्या साठीनंतर नामदेव महाराज गेले कसे? हेच सर्वात मोठे आश्‍चर्य आहे. विशेष म्हणजे उत्तरेकडील भाषा वेगळी, संस्कृती वेगळी. परंतु महाराजांनी ती आत्मसात केली. हिंदी भाषेवर वर्चस्व मिळवून अभंगरचना हिंदीमधून केली. त्याचा प्रभाव एवढा जबरदस्त झाला की, पंजाबी संस्कृतीने महाराजांची ‘मुखबानी’ आपल्या हृदयात नंदादीपासारखी शांत तेवत ठेवली. संत कबीराने महाराजांविषयी म्हटले की,
दख्खन म्याने नामा दरजी उनोका बंदा विठ्ठल है।
और सेवा कछु नहि जाने अंदर बाहर केशव है ॥
तेराव्या - चौदाव्या शतकात दळणवळणाची कोणतीही साधने उपलब्ध नसताना नामदेव महाराज चालत चालत उत्तरेकडे गेले ती खांद्यावर विठ्ठलभक्तीची पताका घेऊनच. भक्तिप्रसादाचे कार्य करताना विठ्ठलाच्या नामात महाराज तर आपले संपूर्ण अस्तित्व पार विसरूनच गेले होते. पंजाबात विठ्ठलभक्ती रुजवणारे नामदेव महाराज हे संतपुरुषांमधले फार मोठे आश्‍चर्य होते. श्रीविठ्ठलाच्या जोडीला रामनामाचे महत्त्वही महाराजांनी आपल्या हिंदी अभंगांमधून सहजपणे ओवले. आपले सद्गुरू श्री विसोबा खेचर यांच्याकडून नामदेव महाराजांना अद्वैतबोधाची दीक्षा मिळाली आणि महाराजांच्या आयुष्याला सर्वांभूती श्रीविठ्ठल दर्शनाचे अप्रतिम वळण मिळाले. ज्ञानदेवांच्या सहवासात तर ज्ञानोत्तर भक्तीची अपूर्व अमृतचव महाराजांनी प्रत्यक्ष चाखली. त्याचा परिणाम म्हणजे महाराज म्हणू लागले-
घालीन लोटांगण वंदीन चरण,
डोळ्यांनी पाहीन रूप तुझे ।
प्रेमे आलिंगीन आनंदें पुजीन,
भावे ओवाळीन म्हणे नामा ॥
ऐंशी वर्षांचे प्रदीर्घ आयुष्य लाभलेल्या नामदेव महाराजांनी विठ्ठलनामाची शाश्वत सुगंध लाभलेली अमृतफुले आयुष्यभर पांडुरंगावर उधळली आणि आषाढ वद्य त्रयोदशी, शके १२७२ या दिवशी पंढरपुरातल्या विठ्ठल राऊळाच्या महाद्वाराशीच विठुरायाच्या गजरात आपला शेवटचा भारलेला श्वास सोडला.


- वामन देशपांडे

No comments:

Post a Comment