Wednesday, 23 April 2014

संत मुक्ताबाई


मुक्ताबाई या ज्ञानेश्वरांच्या सर्वात धाकट्या होत्या. मुक्ताबाईंचे विचार अत्यंत साधे व परखड होते. त्यांना मराठीच्या पहिल्या कवयित्री समजले जाते. त्यांनी जवळपास ४० अभंग लिहीले. यात ’ताटीच्या अभंगांचा’ समावेश होतो. मुक्ताबाई संताची व्याख्या करताना म्हणतात "जेणे संत व्हावे तेणे लोक बोलने सोसावे" . योगी चांगदेवांनी मुक्ताबाईंना आपले गुरु स्विकारले होते. ज्ञानेश्वरांनी समाधी घेतल्यानंतर मुक्ताबाई व निवृत्तीनाथ हे तापी नदीच्या परिसरात धार्मिक स्थळांना भेट देण्यास गेले होते.तेथे विजेच्या कडकडात त्या लिन झाल्या.  जिच्यामुळे मराठी साहित्याचे दालन भावसंपन्न झालेले असून, जिने मायमराठीच्या सारस्वतात भक्तीचा मला फुलविलेला आहे. अशा ज्ञानदेवाच्या भगिनी मुक्ताबाई हिचा जन्म इंद्रायणीतीरी वसलेल्या आळंदीच्या गावाजवळील सिद्धबेटावर अश्विन शुद्ध प्रतिपदा शुक्रवार शके १२०१ म्हणजेच इ. सन. १२७९ मध्ये झाला. त्यांच्या आई-वडिलांचे मूळ गाव औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील आपेगाव हे होय.


मात्यापित्यांच्या या देहत्यागानंतर या अनन्य साधारण कुटुंबाच्या गृहिणीपदाची नाजूक जबाबदारी मुक्ताबाईंवर  पडली. ती तितक्याच समर्थपणे तिने उचलली आणि पेलली. त्यामुळे खेळण्या-बागडण्याच्या बालवयातच मुक्ताई प्रौढ गंभीर, सोशिक समंजस बनली. हळव्या निरागस वयात जीवनाच्या वास्तव सत्याकडे आणि कठोर स्वरूपाकडे निर्लीप्तपणे पाहण्याचे प्रगल्भ प्रौढत्व तिच्यात आलेले होते. मुक्ताबाईंनी आपल्यापेक्षा मोठ्या भावंडांना मायेची पाखर दिली. वात्सल्याने सावरले व प्रसंगी जागरूक करण्यासाठी आत्मीयतेने फटकारले देखील. सर्व तत्कालीन संतांनी एकमुखाने मुक्ताबाईचा ज्ञानाधिकार मान्य केला. तिचा आदेश स्वीकारला. मुक्ताबाईचे गुरु म्हणजे तिचेच मोठे बंधू संत निवृत्तीनाथ ज्यांना मुक्ताबाईंनी गुरुमंत्र दिला ते म्हणजे विसोबा खेचर आणि हठयोगी चांगदेव हे होत.

मुक्ताबाईंनी बालपणीच त्यांच्या समकालीन समाजाचे उग्र कठोर वास्तव अनुभवले आणि ते पचवून लौकिक जीवनसंघर्षाकडे पाठही फिरविली. त्यांच्या वाणीत सांसारिक सुखदुःखाचा वा क्लेश पीडांचा प्रतिसाद नाही. सारे जीवनच त्यांनी अलौकिक रंगात रमवून टाकले आहे. मुक्ताबाईंनी ज्ञानदेवांच्या संत मंडळीतील श्रेष्ठांनादेखील आपल्या आध्यात्मिक अधिकार बळावर स्पष्टोक्तीच्या सुरात जागविले आहे.  मुक्ताबाईंनी रचलेल्या अभंगाची संख्या जरी मोजकीच असली तरी त्यांच्या अभंगवाणीतूनही त्यांच्या प्रद्नेची, विचाराची भव्यता आणि उत्तुंग कल्पनेची दिव्यता अनुभवायला मिळते. त्यांच्या अभंगाच्या ओळी ओळीतून, शब्दाशब्दातून त्यांचा परिपूर्ण अध्यात्माधिकार, योगसामर्थ्य, प्रौढ प्रगल्भ जाण, अविचल आत्मविश्वास यांचे सुशांत दर्शन घडत राहते. मुक्ताबाईंनी ताटीचे अकरा अभंग लिहिले आहेत. तसेच हरिपाठाचे अभंगही लिहिले आहेत. हरिपाठ म्हणजे मुक्ताबाईचे अनुभवकणच आहेत. आत्मरुपाचा साक्षात्कार शब्दात व्यक्त करण्याचा हा त्यांचा एक अविष्कार आहे.


संत मुक्ताबाई यांचे अभंग
मुक्तपणे अखंड त्यासी पै फावले l
मुक्तची घडले हरीच्या पाठी l
रामकृष्णे मुक्त जाले पै अनंता l
तरले पतीत युगायुगी l
कृष्णनामे जीव सदा झाले शिव l
वैकुंठ राणिव मुक्त सदा l
मुक्ताई संजीवन मुक्तमुक्ती कोठे l
जाल पै निवाडे हरिरूप l
२)अखंड जयाला देवाचा शेजार l
कारे अहंकार नाही गेला ll
मान अपमान वाढविसी हेवा l
दिवस असता दिवा हाती घेसी l
परब्रह्मासंगे नित्य तुझा खेळ l
आंधळ्याचे डोहाळे का बा झाले l
कल्पतरू तळवटी इच्छिती ते गोष्टी l
अद्यापि नरोटी राहिली का l
घरी कामधेनु ताक मागू जाय l
ऐसा द्वाड आहे जगा माजी l
म्हणे मुक्ताबाई जाई ना दर्शना l
आधी अभिमाना दूर करा ll

No comments:

Post a Comment