Wednesday 23 April 2014

संत नरहरी सोनार

संत नरहरी सोनार / Sant Narhari Sonar


श्री संत नरहरी सोनार यांचा जन्‍म देवगिरी येथे झाला. त्‍यांचे वडिल दिनानाथ परंपरागत सोनार काम करीत ते श्रीमंत होते. पुढे ते पंढरीस येवून स्‍थायिक झाले. संत नरहरी सोनार कट्टर शिवोपासक होते. ते पंढरीत असून कधीही पांडुरंगाच्‍या दर्शनास गेले नाहीत. एकदा एका सावकाराने पांडुरंगासाठी सोन्याचा करदोडा करण्‍यास सांगितला. त्‍यांनी तो सुंदर बनवून दिला. सावकाराने तो करदोडा पांडुरंगाच्‍या कमरेस बांधण्‍याचा प्रयत्‍न केला तेंव्‍हा तो खूपच मोठा झाला तेव्‍हां सावकाराने प्रत्‍यक्ष पांडुरंगाचे कमरेचे माप घेण्‍यासाठी संत नरहरी सोनार यांना आग्रह धरला. ते कट्टर शिवोपासक असल्‍याने पांडुरंगाचे दर्शन नको म्‍हणून त्‍यांनी डोळयास पट्टी बांधून कमरेचे माप घेण्‍याचा प्रयत्‍न केला असता त्‍यांच्‍या हातास स्‍पर्श झाला त्‍यावेळी त्‍यांना हातास पिंडीचा स्‍पर्श झाला व पट्टी काढून पहातात तर श्री पांडुरंगाची स्मित हास्‍य करणारी मूर्ती दिसली. असा बर्‍याचवेळा त्‍यांना अनुभव आल्‍यानंतर शिव व विष्‍णु दोघे एकच; दोघात व्‍दैत नाही याची साक्ष पटली. पुढे ते पांडुरंगाचे निस्सीम भक्‍त झाले.

रामचंद्रदास कृष्णदास हरिप्रसाद मुकुंदराज मुरारी अच्यूत आणि नरहरी अशी त्यांची वंशपरंपरा सांगण्यात येते. नरहरीच्या पत्नीचे नाव गंगा व मुलांची नावे नारायण व मालू अशी होती.
नरहरी सोनाराच्या नावावर फार थोडे अभंग उपलब्ध आहेत. 'सवंगडे निवृत्ती सोपान मुक्ताई' 'शिव आणि विष्णू एकचि प्रतिमा' माझे प्रेम तुझे पायी' आणि देवा तुझा मी सोनार | तुझे नामाचा व्यवहार' अभंग प्रसिद्ध आहेत.
नरहरी सोनार म्हणतात, 'देवा, मी तुझा सोनार आहे, आणि मी नेहमी तुझ्या नामाचाच व्यवहार करीत असतो. फुललेल्या निखाऱ्यांची शेगडी-बागेसरी म्हणजे माझा देह आहे. त्यात जीवाशिवाचं सोनं घातलेलं आहे. सत्त्व, रज, तम या तीन गुणांची मूस मी तयार केली आहे आणि त्यात ब्रह्मारस ओतला आहे. जीवाशिवाच्या फुंकणीनं मी या धगधगत्या आगीत, ती शिलगावण्यासाठी, फुंक मारतो आहे. म्हणून त्यात माझ्या अंतरात्म्याचं सोनं तावून-सुलाखून निघतं आहे. त्या तप्त झालेल्या सुवर्णाला रात्रं-दिवस, ठोकाठोकी करून मी आकार द्यायचा प्रयत्न करतो आहे.'

नरहरी सोनार म्हणतात, 'देवा, मी तुझा सोनार आहे, आणि मी नेहमी तुझ्या नामाचाच व्यवहार करीत असतो. फुललेल्या निखाऱ्यांची शेगडी-बागेसरी म्हणजे माझा देह आहे. त्यात जीवाशिवाचं सोनं घातलेलं आहे. सत्त्व, रज, तम या तीन गुणांची मूस मी तयार केली आहे आणि त्यात ब्रह्मारस ओतला आहे. जीवाशिवाच्या फुंकणीनं मी या धगधगत्या आगीत, ती शिलगावण्यासाठी, फुंक मारतो आहे. म्हणून त्यात माझ्या अंतरात्म्याचं सोनं तावून-सुलाखून निघतं आहे. त्या तप्त झालेल्या सुवर्णाला रात्रं-दिवस, ठोकाठोकी करून मी आकार द्यायचा प्रयत्न करतो आहे.'

आपल्या सर्व शक्ती, कौशल्य आणि तन-मन-धन अर्पून आपण स्वीकारलेले काम निष्ठापूर्वक केले, तर यश, कीतीर्, वैभव आपल्या पायाशी लोळण घेणारच आहे. म्हणूनच 'यात अर्थ नाही, त्यात अर्थ नाही' असे म्हणत बसण्यापेक्षा जे काम स्वीकारले आहे, त्यालाच दिव्यत्वापर्यंत नेण्याचा चंग बांधला, आणि सर्व शक्ती व मन एकवटून त्यावरच लक्ष केंदित केले, तर कोणत्याही व्यवसायातून अद्भुत वाटावे असे चमत्कार घडू शकतात, हे आपण आज जगात पाहतो आहोत. हे आपणही करू शकतो, ही भावना मनात जागी झाली, तर स्वकर्मात रत राहूनही दिव्यत्वाची प्रचिती येऊ शकते.

यादवकालीन संत मंडळात विविध जातीजमातीचे संत आहेत. व्यवसाय करणारेही संत आहेत. गोरोबा (गोरा कुंभार), सावतोबा (सावता माळी) यांच्या नावातच त्यांचा व्यवसायही दडला आहे. नरहरी महाराज हे सुवर्णकार जातीतले होते. विविध वाड्.मयेतिहासात त्यांचा 'नरहरी सोनार' असा उल्लेख केला जातो.

वारकरी संप्रदायाच्या संत नामावलीतील बहुतेक संत प्रपंच करीत परमार्थ साधनाही करीत होते. ते विविध व्यवसाय करीत असल्यानं त्यांच्या लेखनात विविध व्यवसायांतील शब्द आले व त्यामुळंही मराठी भाषा समृद्ध व संपन्न झाली. (तिचा शब्दकोशही समृद्ध व संपन्न झाला.)

यादवकालात शिवांचे (शंकराचे) उपासक 'शैव' आणि विष्णूचे (विठ्ठलाचे) उपासक 'वैष्णव' या दोन्ही संप्रदायांचा विशेष प्रभाव होता. या दोन्ही संप्रदायांतील जे समताभिमानी होते, त्यांच्यापैकी काही जणांमध्ये अन्य मतांबद्दल व संप्रदायाबद्दल दुरावाही होतो. ज्ञानदेवांनी शिव आणि विष्णू ही एकाच परमेश्वराची नावं आहेत, अशी 'हरिहरैक्यां'ची समन्वयवादी भूमिका घेतली. त्यामुळं या दोन्ही संप्रदायांतील दुरावा व एकमेकांविषयीचा भेदभाव नाहीसा झाला. त्याचं एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणून नरहरी महाराजांच्या जीवनाचा उल्लेख करायला हवा
ज्ञानदेवांनी जी शैव आणि वैष्णव यांच्यामधील एकात्मतेची अपेक्षा केली, ती नरहरी महाराजांनी प्रत्यक्ष आपल्या आचरणाद्वारे पूर्ण केली. ते प्रारंभी नाथ संप्रदायिक (शिवोपासक) होते. 'कटिसूत्र' प्रसंगानंतर ते वारकरी (विठ्ठलोपासक) झाले, कारण त्यांना शिव आणि विष्णू यांच्यामधील अभेद जाणवला. ज्ञानदेवांचे वडील बंधू निवृत्तिनाथ हे नाथसंप्रदायिक होते व तेच ज्ञानदेवांचे गुरुही होते. त्यामुळं ज्ञानदेव गुरुपरंपरेनं नाथसंप्रदायिक होते. त्यांचे वडील विठ्ठलपंत हे विठ्ठलोपासक असल्यानं वैष्णव होते. म्हणजे ज्ञानदेव घराण्याच्या परंपरेनं वैष्णव होते, वारकरी होते.

No comments:

Post a Comment