Wednesday 23 April 2014

गोंदवलेकर महाराज

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज


एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धांत जे विख्यात महाराष्ट्रीय संत होऊन गेले त्यांच्यापैकीं श्रीब्रह्मचैतन्य तथा गोंदवलेकर महाराज हे एक होत. त्यांचा जन्म माघ सुद्ध द्वादशी शके १७६६ (इ.स्. १८४५) या दिवशी गोंदवले बुद्रुक या गांवी झाला. हे गांव सातारा जिल्ह्यांतील माण तालुक्यांत असून ते सातारा-पंढरपूर रस्त्यावर सातार्‍यापासून चाळीस मैलावर आहे. त्यांचे घराण्यांत विठ्ठलभक्ति व पंढरीची वारी असून पूर्वज सदाचार संपन्न व लौकिकवान होते. ते घरी थोडी शेती करून कुलकर्णीपणाचें काम करीत. श्रीमहाराजांचे मूळ नांव गणेश रावजी घुगरदरे. स्मरणशक्ति, चलाख बुद्धि, पुढारीपणा, निर्भय वृत्ति, एकांतप्रियता, रामनामाची आवड ह्या गोष्टी श्रीमहाराजांमध्यें लहानपणापासूनच होत्या. ते नऊ वर्षांचे असतांना गुरु शोधार्थ घर सोडून गेले. पण त्यांच्या वडिलांनी ते कोल्हापुरास आहेत असे कळल्यावर त्यांनी श्रीमहाराजांना घरी परत आणले. त्यांचे वयाच्या अकराव्या वर्षीं लग्न करण्यांत आले, परंतु त्यांचे प्रपंचांत चित्त रमेना, आणि ते लवकरच गुरुशोधार्थ पुन्हां घर सोडून निघून गेले. त्यांनी तत्कालीन प्रसिद्ध व अप्रसिद्ध अशा सत्पुरुषांच्या भेटी भेतल्या. पण त्यांच्या मनाचें समाधान झाले नाही. ते विशेषतः उत्तर भारतात गुरुशोधार्थ हिंडले. शेवटी श्रीरामदासस्वामींच्या परंपरेंतील एक थोर सत्पुरुष श्रीरामकृष्ण यांनी श्रीमहाराजांना दर्शन दिले आणि त्यांना नांदेड जवळील येहळेगांव या गावी श्रीतुकारामचैतन्य यांचेकडे जाण्याचा आदेश दिला.

या आदेशानुसार श्रीमहाराज श्रीतुकामाईंकडे गेले. तेथे नऊ महिने राहून त्यांनी एकनिष्ठेनें गुरुसेवा केली, आणि ते देहबुद्धिविरहित व पूर्ण ज्ञानी झाले. श्रीतुकामाईंनी त्यांचे 'ब्रह्मचैतन्य' असे नांव ठेवलें, आणि गृहस्थाश्रमी राहून लोकांना भक्तिमार्गाला लावण्याची आज्ञा केली.

सद्‍गुरूंच्या आज्ञेप्रमाणे श्रीमहाराजांनी हजारों लोकांना रामभक्तीला लावलें. त्यांचे शिष्य-प्रशिष्य विशेषतः मध्यमवर्गीय असून ते महाराष्ट्र व कर्नाटकांत बहुसंख्य असून उत्तर हिंदुस्थानांतही आहेत. त्यांची प्रथम पत्‍नी वारल्यानंतर त्यांनी जन्मांध मुलीशी लग्न केलें. त्यांनी आपल्या घरीं आणि इतरत्र अनेक ठिकाणीं श्रीराममंदिरांची स्थापना करून उपासनेची केंद्रें निर्माण केली.

त्यांनी असंख्य लोकांना व्यसनें, दुराचरण, दुरभिमान, संसारचिंता यांपासून सोडविले. कौटुंबिक कलह मिटवून अनेकांचे संसार सुखाचे केले. यासाठी त्यांनी व्यक्तिगत उपदेश, प्रवचनें व भजनकीर्तनें यांचा उपयोग केला. त्यांचा लोकसंग्रह फार मोठा होता. त्यांनी गोरगरीबांना आधार दिला. दुष्काळग्रस्तांना काम पुरवून अन्न दिले. गोरक्षण, अन्नदान, भावी काळांत मार्गदर्शक ठरतील असे उद्योग, वैदिक अनुष्ठानें, नामजप, भजनसप्ताह, तीर्थयात्रा करून प्रापंचिकांना परमार्थाला लावलें. आधुनिक सुशिक्षितांमधील अश्रद्धा घालवून त्यांच्यामध्येंही धर्माबद्दल व भक्तीबद्दल आदर उत्पन्न केला. अशा रीतीनें लोकांमध्यें धर्मजागृति केली. नामस्मरण हें सर्वश्रेष्ठ साधन आहे असें त्यांनी कळकळीनें व बुद्धीला पटेल अशा रीतीनें सांगितलें. वासनारहित झालेल्या त्यांच्याकडून अनेक चमत्कार घडले हें जरी खरें, तथापि पापी लोकांना त्यांनी सन्मार्गाला लावलें हा त्यांचा सर्वांत मोठा चमत्कार म्हणतां येईल. लोकांना नामस्मरणाच्या मार्गाला लावून प्रपंच व परमार्थ यांचे मधुर मीलन कसें करावें हें शिकविण्यासाठीं त्यांनी आमरण खटाटोप केला, आणि मार्गशीर्ष वद्य दशमी शके १८३५ (२२ डिसेंबर १९१३) या दिवशीं गोंदवलें मुक्कामी त्यांनी देह ठेवला.

[ श्रीब्रह्मचैतन्य महाराज कृत ॥ अमृतघुटका ॥ या पुस्तिकेवरून ]

No comments:

Post a Comment