प्रल्हाद केशव अत्रे
आचार्य अत्रे किंवा प्र. के. अत्रे या नावाने ओळखले जाणारे हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. त्यांची टोकदार लेखणी, बोचरा विनोद आणि दिलदार वृत्ती याला उभा महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाही.
त्यांच्या लेखणीने साहित्यातील बहुतांश सर्व प्रकारांना आपलेसे केले होते, तर त्यांच्या वाणीने महाराष्ट्रातील सर्व जनतेला आपलेसे केले होते. साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, वृत्तपत्रकार, वक्ते आणि नेते असे त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व. या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपल्या क्षमतांसह असामान्य उंची गाठली हे विशेष!
शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असताना विद्यार्थ्यांमधे मराठी भाषेची गोडी निर्माण करण्यासाठी मराठीतील अद्ययावत, जिवंत वाङ्मयाचा व विचारांचा परिचय करून देण्याचा प्रयोग राबवणे हे त्यांचे महत्त्वाचे शैक्षणिक कार्य ठरले. साहित्यिक क्षेत्रातही त्यांच्या कर्तृत्वाने मोठा दबदबा निर्माण झाला. आचार्य अत्रे यांनी प्रथम मकरंद व नंतर केशवकुमार या टोपणनावांनी काव्यलेखन केले. झेंडूची फुले (१९२५) हा त्यांचा विनोदी व विडंबन कवितांचा संग्रह खूप गाजला.
अत्रे यांच्या नाटकांनी मराठी रंगभूमीला आलेली मरगळ दूर करून प्रेक्षकांना रंगभूमीकडे खेचून आणले. त्यांच्या साष्टांग नमस्कार (१९३३),भ्रमाचा भोपळा (१९३५), लग्नाची बेडी (१९३६), घराबाहेर (१९३४), उद्याचा संसार (१९३६) या नाटकांना अलोट गर्दी व्हायची. हाऊसफुल्ल हा शब्द ‘घराबाहेर’ या नाटकामुळे रूढ झाला. तो मी नव्हेच (१९६०) या समकालीन सत्य घटनेवर आधारीत असलेल्या नाटकाने तर इतिहास घडवला. अजूनही हे नाटक लोकप्रिय आहे.
राम गणेश गडकरी यांना अत्रे गुरुस्थानी मानत. त्यांच्या नाटकांवर गडकर्यांच्या नाटकांचा काहीसा प्रभाव आढळतो. अत्र्यांच्या बहुतांश नाटकांमधून सामाजिक दोषदर्शन व दंभस्फोट आहेत, पण ते उपरोध, उपहास, विडंबन, अतिशयोक्ती या विनोदी माध्यमातून व्यक्त झाल्यामुळे प्रेक्षकांना चटकन आकृष्ट करतात.
शामची आई (१९५४) या त्यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटास राष्ट्रपती सुवर्ण पदक व महात्मा फुले (१९५५) या चित्रपटास रौप्यपदक प्राप्त झाले. धर्मवीर, प्रेमवीर, ब्रह्मचारी, ब्रँडीची बाटली हे त्यांचे पटकथा लेखन केलेले आणखी काही लोकप्रिय चित्रपट होत.
‘मी कसा झालो’ (१९५६) ह्या अत्रे यांच्या वाङ्मयीन आत्मशोधनातून व ‘कर्हेचे पाणी - १ ते ५ खंड’ या विस्तृत आत्मचरित्रातून आपणास अत्रे उलगडत जातात.
संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात त्यांनी आपल्या वाणी व लेखणीद्वारे भरीव असे कार्य केले, लोकांना योग्य मार्गदर्शन केले. त्यांच्या राजकीय कर्तृत्वाचा विकास संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या काळातच झाला. वक्तृत्व व वृत्तपत्र (मराठा, नवयुग) ही त्यांची प्रभावी साधने होती. मृत्युलेख (श्रद्धांजलीपर लेख) व अग्रलेख ही त्यांची खासियत होती. लोकप्रिय वक्ते म्हणूनही त्यांचा मोठा लौकिक होता. अत्र्यांचे भाषण म्हणजे त्यांचे हशा व टाळ्यांच्या माध्यमातून परखड विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे हुकमी साधन होते. आचार्य अत्रे यांच्याच शब्दांत त्यांच्याबद्दल सांगायचे झाले, तर ‘गेल्या दहा हजार वर्षांत असा माणूस झाला नाही, पुढच्या दहा हजार वर्षांत असा माणूस होणार नाही.’
No comments:
Post a Comment