Wednesday, 23 April 2014

संत तुकाराम


संत तुकाराम हे इ.स.च्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते. पंढरपूरचा विठ्ठल वा विठोबा हा तुकारामांचा आराध्यदेव होता. तुकारामांना वारकरी 'जगद्‌गुरु ' म्हणून ओळखतात. वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी - ' पुंडलीक वरदे हरी विठ्ठल , श्री ज्ञानदेव तुकाराम , पंढरीनाथ महाराज की जय , जगदगुरु तुकाराम महाराज की जय' असा जयघोष करतात.


तुकाराम महाराज हे साक्षात्कारी, निर्भीड व एका अर्थाने बंडखोर संत कवी होते. विशिष्ट वर्गाची पारंपरिक मक्तेदारी असलेला वेदान्त तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला. ‘अभंग म्हटला की तो फक्त तुकोबांचाच’ (अभंग तुकयाचा) एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली. संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. वारकरी, ईश्र्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात. त्यांचे अभंग खेड्यांतील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठांत आहेत. आजही ही लोकप्रियता ‘अभंग’ आहे, वाढतेच आहे.
‘वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा। इतरांनी वहावा भार माथा।।’ असे परखड वक्तव्य तुकोबाराय अभिमानाने व्यक्त करतात. ‘तुका तरी सहज बोले वाणी। त्याचे घरी वेदान्त वाहे पाणी।।’ भक्ती -ज्ञान-वैराग्य याने ओथंबलेली संत तुकारामांची अभंगवाणी परब्रह्माच्या अद्वैताची मनोमन पूजा बांधते. विठ्ठलाचे ते विटेवरचे सावळे परब्रह्म, सगुण साकार होऊन, स्वतःला तुकोबांच्या ‘अभंग-भक्तिरसात’ बुडवून घेण्यात धन्यता मानत असले पाहिजे असे वाटावे, इतके तुकारामाचे अभंग रसाळ आहेत.
‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे यत्न करूं।।’ असे म्हणत, शब्दांवर प्रभुत्व राखत त्यांनी तत्कालीन समाजाला मार्गदर्शन केले, जातिभेदावर टीका केली, श्रीविठ्ठलावरची भक्ती प्रकट केली, अध्यात्माचे सार सांगितले. देश-काळ-लिंग भेदाच्या पलीकडे त्यांची काव्य प्रतिभा झेपावलेली आपल्याला दिसते. ‘विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म। भेदाभेद-भ्रम अमंगळ।।’ या भूमिकेचा त्यांनी १७ व्या शतकात प्रसार केला. सांप्रदायिक आभिनिवेश बाजूला ठेवून ऐक्यभाव, समता प्रस्थापित केली.
भागवत धर्माचा कळस होण्याचे महद्‌भाग्य त्यांना लाभले. महाराष्ट्राच्या हृदयात अभंग रूपाने ते स्थिरावले आहेत. त्यांच्या अभंगांत परतत्त्वाचा स्पर्श आहे. मंत्रांचे पावित्र्य यांच्या शब्दकळेत पाझरते. त्यांचे अभंग म्हणजे ‘अक्षर वाङ्‌मय’ आहे. त्यांची प्रत्यक्षानुभूती त्यांच्या भावकाव्यात आहे. त्यांच्या काव्यातील गोडवा व भाषेची रसाळता अतुलनीय आहे.

No comments:

Post a Comment