Showing posts with label साहित्यिक. Show all posts
Showing posts with label साहित्यिक. Show all posts

Wednesday, 23 April 2014

पु.ल.देशपांडे


पु.ल.देशपांडे साहित्य, संगीत, नाटक, चित्रपट, वक्तृत्व आदी क्षेत्रांत ज्यांना अभिव्यक्तीची ‘अमृतसिद्धी’ साध्य झाली होती आणि ज्यांची ‘साठवण’ मराठीजनांनी अनंत काळासाठी मनामनात करून ठेवली आहे असे ‘आनंदयात्री’!
महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी मनाजवळचं व्यक्तिमत्त्व म्हणजे पु. ल. देशपांडे. सर्वसामान्य मराठी माणसाचं प्रेम, आपुलकी, आदर, त्यांच्याबद्दलचा अभिमान... आदी भावनांचं सर्वाधिक प्रकटीकरण ज्यांच्याबाबत महाराष्ट्रानं अनुभवलं ते व्यक्तिमत्त्व म्हणजे पुरूषोत्तम लक्ष्मण देशपांडे! त्यांच्याबद्दल लिहायला शब्द अपुरे पडतील. केवळ लेखक नव्हे तर बहुआयामी असणारं असं व्यक्तिमत्त्व. लेखनातही तोचतोचपणा नाही. निबंध, समीक्षण, नाटक, प्रहसन, एकांकिका, अनुवाद, पटकथा, व्यक्तिचित्रण, चिंतनात्मक लेखन अशा अनेक लेखनप्रकारात त्यांच्या लेखणीने हुकूमत गाजवली. गांधीजींचं चरित्रलेखन, बंगाली भाषेचा अभ्यास, रवींद्रनाथांच्या कवितांचा अनुवाद याही वेगळ्या प्रकारच्या लेखनातून पु. ल. आपल्याला भेटतात. साहित्य, संगीत, नाटक, वक्तृत्व, अभिनय.... कलेच्या ज्या ज्या प्रांतात पु.ल. वावरले त्या त्या प्रांताचे ते अनभिषिक्त सम्राट झाले. अभिनय, एकपात्री अभिनय, हार्मोनियम (संवादिनी) वादन, कथाकथन, स्वत:च्या लेखनाचे सादरीकरण, अभिवाचन, नाट्य व पटकथा लेखन, दिग्दर्शन, काव्यवाचन... या प्रत्येक क्षेत्रात पुलंनी अतिशय उच्च दर्जाचे यश प्राप्त केले, अफाट लोकप्रियता मिळवली, आपला श्रेष्ठ दर्जा सिद्ध केला.

वयाच्या १६ व्या वर्षी ‘आजोबा हरले’ या प्रहसनापासून पु. लं ची लेखनयात्रा चालू झाली. पुढे पूर्वरंग, अपूर्वाईतून त्यांनी प्रवास घडवला, कधी व्यक्ती आणि वल्लीतून अनेकांची भेट घालून दिली, कधी मर्ढेकर-आरती प्रभू-बोरकरांच्या कविता प्रभावी काव्यवाचनातून रसिकांपर्यंत समर्थपणे पोहोचवल्या, बटाट्याच्या चाळीचा फेंरफटका घडवला. असे हे ‘कोट्याधीश’ पु.ल. रसिकांच्या मनात घर करून राहिले.

पु. ल. नी एकूण १४ एकांकिका लिहिल्या. ती फुलराणी, तुज आहे तुजपाशी, सुंदर मी होणार अशी उत्तमोत्तम नाटकं लिहिली. नाट्यदिग्दर्शन, अभिनय या क्षेत्रांतही आपला ठसा उमटवला. ‘अंमलदार’ हे पु. लं. नी रूपांतरित केलेलं पहिलं नाटक. अनुवाद किंवा रूपांतर हा पु. लं. च्या विविध पैलूंमधला आणखी एक पैलू. इतर भाषिक नाटकांचं रूपांतर करताना त्याचं भारतीयीकरण, मराठीकरण मोठ्या कौशल्यानं पु. लं. नी केलं. १९४७ साली ‘कुबेर’ या चित्रपटातून पु. लं. चं पहिलं दर्शन झालं. संवादलेखक, दिग्दर्शक, पटकथाकार, गायक, नायक, गीतकार, संगीतकार अशा अनेक भूमिकांमधून चित्रपटक्षेत्रात पु. लं. वावरले. त्यांचा गुळाचा गणपती हा चित्रपट ‘सबकुछ पु.ल.’ म्हणूनच गाजला. ही त्यांची कारकीर्द १९९३ च्या ‘एक होता विदूषक’ इथवर बहरली. त्यातले त्यांचे संवाद प्रत्येकाला भावले, अभिजाततेचा अनुभव देऊन गेले.

भास्कर संगीतालयाच्या दत्तोपंत राज्योपाध्यांकडून घेतलेलं हार्मोनियमचं शास्त्रीय शिक्षण हा पु. लं. चा आणखी एक पैलू. पंडित भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, मिल्लिकार्जुन मन्सूर अशा दिग्गजांना त्यांनी हार्मोनियमवर समर्थ साथ केली. त्यांच्या हार्मोनियम वादनाच्या ध्वनिफितीही उपलब्ध आहेत.

सादरीकरणाचं विलक्षण व हमखास यशस्वी ठरणारं कर्तृत्व पु. लं. कडे होतं. त्यांचे हावभाव, शब्दफेक, देहबोली, आवाजावरचं नियंत्रण सगळंच विलक्षण आणि लक्ष वेधून घेणारं. बटाट्याची चाळ, वार्‍यावरची वरात, असा मी असा मी या प्रयोगांतून पु. लं. मधले ‘परफॉर्मर’ भेटतात. लेखन असो, वादन असो, गायन असो, नाटक किंवा वक्तृत्व सगळीकडे पु. लं. चं सादरीकरण थक्क करतं.

राजकारण हा पु. लं. चा प्रांत कधीच नव्हता. पण १९७५ च्या आणीबाणीच्या काळात त्यांच्या वक्तृत्वाला व विनोदाला उपहासाची धार आली. त्या काळात जयप्रकाश नारायणांच्या ‘प्रीझन डायरी’ चा त्यांनी मराठी अनुवाद करून लोकांपुढे साकार केला. आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत जनता पक्षासाठी पु. लं. नी अनेक भाषणं केली. राजकारणात त्या काळापुरता पु. लं. मधला कार्यकर्ता आणीबाणीविरुद्ध लढला.

पु. लं. च्या साहित्यातून त्यांची अचाट निरीक्षणशक्ती, अनलंकृत प्रवाही संवादात्मक भाषाशैली, मराठी व संस्कृतवरील प्रभुत्व, संदर्भ श्रीमंती, भाषेतली लवचीकता, नावीन्य, भावस्पर्शी लिखाण आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे निखळ, निर्व्याज विनोद, कोणालाही न बोचणारा, दुखणारा विनोद या सगळ्या गोष्टी प्रामुख्यानं दिसतात. त्यांच्या लेखनासह, वक्तृत्वातही संदर्भांची श्रीमंती जाणवते. संस्कृत सुभाषिते, वेद-पुराणे, संतसाहित्य, म्हणी-वाक्‌प्रचार, यांसह विविध संस्कृतींमधले, जीवनव्यवहारातले अनेक संदर्भ पु. लं. च्या समृद्ध लेखनात आढळतात. यामुळेच त्यांची निवेदन-शैलीही उठून दिसते!

साहित्य-नाटक-संगीत या क्षेत्रात प्रवेश करणार्‍या नवोदिताला शाबासकीची थाप द्यावी ती पु.लं. नीच. ‘ती फुलराणी’ करताना भक्ती बर्वे-इनामदारांना हाच अनुभव आला. ज्येष्ठ गायिका आशा खाडिलकर यांचं गायन ऐकून ते आवडल्याचं कळवणारा फोन रात्री ११:०० वाजता करून प्रोत्साहन देणारे पु. ल. वेगळेच. तरुण संगीतकार सलील कुलकर्णींच्या बालगीतांच्या ध्वनिमुद्रिकेचं भरभरून कौतुक करणारे पु. ल. च होते. मुस्लीम समाजात काम करणार्‍या हमीद दलवाईंबद्दल पहिल्यांदा पु. लंनीच लिहिलं. एका अनोळखी दिग्गजाची ओळख सामान्य वाचकांना करून दिली. समोरच्या व्यक्तीमधल्या चांगल्या गोष्टी ओळखून त्या इतरांना सांगण्याची क्षमता फार कमी लोकांकडे असते आणि त्यापैकी एक पु. ल. होते.

पु.लं. मधला दाता खूप जणांना अनोळखी असेल. सामाजिक बांधिलकी कृतीशीलतेने मानणार्‍या पु. ल. व सुनीताबाई या दांपत्याने बाबा आमटे, अनिल अवचट, बाबा आढाव, हमीद दलवाई आदी अनेक कार्यकर्त्यांना, सामाजिक संस्थांना, त्यांच्या विविध उपक्रमांना कोणताही गाजावाजा न करता, सहजपणे व सढळतेने सहकार्य केले. सुनिताबाईंसारख्या सहधर्मचारिणीच्या प्रयत्नातून पु. ल. देशपांडे फाउंडेशन उभं राहिलं. या फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी पुढील संस्था - व्यक्तींना मदत केली.

- अंध व्यक्तींसाठी देणगी - उत्तमोत्तम मराठी साहित्य ब्रेल लिपीत आणण्यासाठी आर्थिक मदत.
- वेश्यांच्या मुलांसाठी चालवल्या जाणार्‍या निहार या संस्थेला सहकार्य.
- कोयना भूकंपग्रस्त मुलांसाठी मदत.
- ग्रामीण स्तरावरील शास्त्र प्रयोगशाळेलाही मदत.
- मुंबई येथील एशियाटिक सोसायटी या संस्थेला सहकार्य.

कलाक्षेत्रातील त्यांच्या अभूतपूर्व योगदानामुळे पु. ल. देशपांडे पहिल्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे मानकरी ठरले. पु. लं. ना पुण्यभूषण, पद्मश्री, पद्मभूषण या पुरस्कारांसह संगीत नाटक अकादमी पुरस्कार व साहित्य अकादमीचा पुरस्कारही प्राप्त झाला. मध्य प्रदेश, कलकत्ता, गोवा या राज्यांतूनही पु. लं. ना पुरस्कार मिळाले आणि हा मराठी साहित्यिक भौगोलिक, भाषिक व सांस्कृतिक सीमा ओलांडून पार गेला.

‘जिवंत माणसाइतके जगात पाहण्यासारखे काही नाही’, अशी जीवनाकडं बघण्याची त्यांची वृत्ती आपले आयुष्य आणखी सुंदर बनवते. जीवन सुंदर करू पाहणार्‍या चार्ली चॅप्लीन आणि रवींद्रनाथ टागोर या दोन व्यक्तिमत्त्वांचा प्रभाव पु. ल. देशपांडे यांच्या जीवनातून व अभिव्यक्तीतूनही स्पष्टपणे जाणवतो. त्यांना ‘महाराष्ट्राचे वुडहाऊस’ ही म्हटले जाते. अवघ्या महाराष्ट्रावर प्रदीर्घ काळ आनंदाची उधळण करणारा हा आनंदयात्री १२ जून, २००० ला जग सोडून गेला खरा, पण त्यांचं अस्तित्व आजही मराठी मनात शाबूत आहे.

राम गणेश गडकरी


नाट्य, काव्य व विनोदी लेखन या क्षेत्रांत अतिशय कमी कालावधीत अत्युत्कृष्ट, दिशादर्शक अभिव्यक्ती साधणारे प्रतिभासंपन्न साहित्यिक आणि आपल्याला ‘महाराष्ट्र गीता’ ची देणगी देणारे कवी!
मराठी साहित्यातील एक श्रेष्ठ नाटककार, विनोदकार आणि कवी. विशेषत: मराठी साहित्यात व रंगभूमीवर विनोद रुजवणारे व आपल्या प्रतिभेची छाप सोडणारे साहित्यिक म्हणून राम गणेश गडकरी अजरामर ठरले. बाळाराम या नावाने त्यांनी विनोदी लेखन केले, तर गोविंदाग्रज या टोपणनावाने त्यांनी काव्यलेखन केले. त्यांच्या कविता ‘वाग्वैजयंती’ (१९२१) या काव्यसंग्रहातून प्रसिद्ध झाल्या. ते स्वत:ला केशवसुतांचे सच्चे चेले म्हणवून घेत असत. पण तरीही गोविंदाग्रज केशवसुतांहून अनेक दृष्टींनी वेगळे होते.

गोविंदाग्रजांनी विपुल प्रमाणात प्रेमकविता लिहिली. त्यांना प्रेमाचे शाहीर असेच म्हटले जायचे. गुलाबी कोडे, गोड निराशा, पहिले चुंबन, मुरली, प्रेम आणि मरण, गोफ, ती कोण? अशा अनेक प्रेमकविता त्यांनी लिहिल्या.

क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव पडो मरणांचा,  मग पुढे...

यांसारख्या शब्दांतून त्यांची विलक्षण प्रतिभा प्रभाव पाडून जाते. प्रेमभंगाचे दु:ख व्यक्त करताना ते एका कवितेत म्हणतात,

जगावाचुनी लाभतीस तर जग मी केले असते, तुझ्यावाचुनी जग परि आता हो असत्याचे नसते...
डोळ्यांपुरते जग नच असते रुप जगाला पुरते, प्रेमळ हृदया  परि निर्दय जग दगडाखाली पुरते...
होईल होईल वाटत होते तेच अखेरीस झाले, नाव घेतल्यावाचुन आता मनात झुरणे आले...
या ओळींमधून व्यक्त झालेली प्रेम-निराशेची तडफड इतकी जिवंत आणि भेदक आहे की या अवस्थेतून गेलेल्या कुणालाही ती आपलीशी वाटेल. गोविंदाग्रज हे प्रेमाचे शाहीर होतेच, पण त्यांनी महाराष्ट्राला एक देणं देऊ केलं आहे, ते म्हणजे महाराष्ट्र गीताचं. त्यांच्या एका कवितेत त्यांनी महाराष्ट्राचे प्रेरणादायी, यथार्थ वर्णन केले आहे.

‘‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा।
नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा ।।
अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा ।
बकुळ फुलांच्या प्राजक्तांच्या दळदारी देशा।।
भावभक्तीच्या देशा, आणिक बुद्धीच्या देशा ।
शाहिरांच्या देशा, कर्त्या मर्दांच्या देशा ।।’’
काही काळ त्यांनी शिक्षक म्हणून काम केले, तसेच ‘ज्ञानप्रकाश’ मध्ये उपसंपादक म्हणूनही त्यांनी काम केले. त्यातूनच पुढे त्यांचा नाटक मंडळींशी, नाट्यलेखनाशी संपर्क आला. कल्पकता, बुद्धिमत्ता आणि भाषाप्रभुत्व या तीनही शक्ती गडकरी यांना प्रमाणाबाहेर लाभल्या होत्या. म्हणूनच ते नाटककार म्हणूनही विलक्षण यशस्वी ठरले. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या विनोदी लेखनाचा, नाट्याचा त्यांच्यावर प्रभाव होता. बालपणापासूनच साहित्याची ओढ लागल्याने वयाच्या सतराव्या वर्षीच ‘मित्रप्रिती’ नावाचे नाटक त्यांनी लिहिले. त्यानंतर १९१३ मध्ये रंगभूमीवर आलेले ‘प्रेमसंन्यास’ हे त्यांचे पहिले नाटक होय. नंतर अनुक्रमे पुण्यप्रभाव (१९१७), एकच प्याला (१९१९), भावबंधन (१९२०) ही नाटके रंगभूमीवर आली.  ‘राजसंन्यास’ हे त्यांचे अपूर्ण राहिलेले नाटक. त्यांच्या नाटकांबरोबरच त्यांच्या नाटकातील काही पात्रेही अजरामर ठरली. एकच प्याला या नाटकातील सिंधू, तळीराम, सुधाकर किंवा भावबंधनमधील घनश्याम, धुंडीराज, प्रेमसंन्यासमधील गोकूळ ही पात्रे आजही मराठी कलावंतांना आणि रसिकांना आनंद देतात. ‘वेड्यांचा बाजार’ हे त्यांचे अपूर्ण नाटक पुढे चिंतामणराव कोल्हटकर यांनी पूर्ण केले.

करुण आणि हास्य ह्या दोन्ही रसांची निर्मिती आपल्या लेखनातून सारख्याच परिणामकारकतेने त्यांनी साधलेली दिसते. त्यांच्या कथांतून निखळ विनोदाबरोबरच उपहासात्मक व्यंगही ठळकपणे आढळते. रिकामपणाची कामगिरी (१९२१), संपूर्ण बाळकराम (१९२५) यांतून त्यांचे विनोदी लेखन प्रसिद्ध झाले. याशिवाय गडकरी यांचं बरंचसं अप्रकाशित लेखन आचार्य अत्रे यांनी १९६२ मध्ये ‘अप्रकाशित गडकरी’ या नावाने प्रसिद्ध केले. नाट्यलेखन व विनोदी लेखन या क्षेत्रांत आचार्य अत्रे यांनी राम गणेशांची परंपरा पुढे समर्थपणे चालवली.

या सर्वच साहित्य प्रकारात यांच्या लेखणीने आपला स्वत:चा ठसा उमटवला. पण मराठी साहित्यक्षेत्रात अजरामर ठरलेल्या त्या लेखणीमागच्या कलावंताने- राम गणेश गडकरी यांनी -मात्र वयाच्या ३४ व्या वर्षीच या जगाचा निरोप घेतला.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे / Shivshahir Babasahaeb Purandare


शिवचरित्र केवळ अभ्यासणारे नव्हे, तर ते जिव्हाळ्याने अनुभवणारे आणि जणू शिवकाळातच राहून शिवचरित्र अक्षरश: जगणारे शिवशाहीर !

सह्याद्रीचा एकेक कडा आणि एकेक शिखर हे ज्यांच्यासाठी चरित्रनायक आहेत. एकेक किल्ला हा ज्यांच्या महाकाव्याचा एक-एक अध्याय आहे, असे ज्येष्ठ इतिहासकार म्हणजे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे होत. ‘इतिहासातून राष्ट्राचे शील शोधायचे असते, केवळ तहांचा आणि लढायांचा तपशील नव्हे’ असा उदात्त दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून ज्यांनी शिवचरित्र हे एकमेव जीवितध्येय साकार केले अशी विभूती म्हणजेच मराठी इतिहासाचे भाष्यकार, शिवशाहीर बळवंत मोरेश्वर पुरंदरे होत. त्यांच्या लेखनातून व व्याख्यानांतून शिवकाळ महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पोहोचला आहे.

’इतिहास माजघरापर्यंत गेला पाहिजे, पाळणाघरापर्यंत गेला पाहिजे, इतकंच नव्हे तर आमच्या बहिणी, भावजया आणि लेकीसुना गरोदर असतील, तर त्यांच्या गर्भापर्यंत गेला पाहिजे,’ असे म्हणणारे बाबासाहेब हे एकमेवाद्वितीयच! त्यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील सासवड. पण तरुणपणापासूनच ते पुण्यातच स्थायिक झाले. पुढे भारत इतिहास संशोधन मंडळ या संस्थेत काम करू लागले. या ठिकाणीच इतिहाससंशोधक ग.ह. खरे हे बाबासाहेबांना गुरुस्थानी लाभले व इतिहास संशोधक म्हणून त्यांची वाटचाल सुरू झाली.

पुरंदर्‍यांची दौलत, पुरंदर्‍यांची नौबत, गड-किल्ल्यांची ऐतिहासिक माहिती देणारे साहित्य (गडसंच), शेलारखिंड, व राजा शिवछत्रपती हे बाबासाहेबांचे आजवर प्रकाशित झालेले साहित्य होय. शिवचरित्र हे घरोघरी पोहोचावे हे ध्येय ठेवून बाबासाहेबांनीअथक संशोधनातून व परिश्रमांतून राजा शिवछत्रपती हा ग्रंथ साकार केला. या ग्रंथाच्या १६ आवृत्ती आजपर्यंत सुमारे ५ लाख घरांमध्ये पोहोचल्या आहेत. याचबरोबर फुलवंती व जाणता राजा ही नाटके त्यांनी लिहिली, दिग्दर्शित केली. ‘जाणता राजा’ या महानाट्याचे गेल्या २३ वर्षांत ८०० हून अधिक प्रयोग झाले आहेत व या प्रयोगांच्या माध्यमातून लाखो रुपयांची मदत बाबासाहेबांनी अनेक संस्थांना केली आहे. हे नाटक ५ अन्य भाषांत भाषांतरित केले गेले आहे.

इतिहासाचा ध्यास घेतलेले बाबासाहेब हे तरुणपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळून संपर्कात होते. त्या काळातच ते आचार्य अत्रे यांच्या वृत्तपत्रात लेखन करीत. शिवाय आपले मेहूणे श्री. ग. माजगावकर यांच्याबरोबर ते ‘माणूस’ मध्येही काम करत होते. ज्येष्ठ इतिहासकार व कादंबरीकार गो. नी. दांडेकरांशी पुढे त्यांची भेट झाली. बाबासाहेब-गोनीदा ही जोडी म्हणजे शिवचरित्राचा वारसा आजच्या पिढीपर्यंत पोहोचवणारे दूतच झाले. ते नेहमी गडांवर एकत्र भटकंती करीत. महाराष्ट्रातील एकही असा किल्ला नाही, जिथे बाबासाहेब पोहोचले नाहीत आणि एकही असे सरदार घराणे नाही, ज्यांच्याशी त्यांचा संपर्क झालेला नाही! शिवचरित्र अभ्यासणारे अनेक अभ्यासक असतात परंतु शिवचरित्र अनुभवणारे, अक्षरश: जगणारे बाबासाहेब एकच! स्वातंत्र्यानंतर लढल्या गेलेल्या दादरा नगर हवेली मुक्ती संग्रामात बाबासाहेब सुधीर फडके यांच्याबरोबर हिरिरीने सहभागी होते.

आचार्य अत्रे, गो. नी. दांडेकर, पु.ल. देशपांडे, अटलबिहारी वाजपेयी, मंगेशकर कुटुंबीय, ठाकरे कुटुंबीय यांसारख्या दिग्गजांचा सहवास त्यांना लाभला, लाभतो आहे. या सर्वांच्या माध्यमातून,सहकार्यातून त्यांनी शिवचरित्रप्रसारासाठी अनेक उपक्रम चालवले. महाराष्ट्रात, भारतात आणि परदेशातही त्यांच्या व्याख्यानांतून, जाणता राजा या महानाट्यातून आजही शिवचरित्र जिवंत होते. ’शिवचरित्र हे व्यक्तिचारित्र्य निर्मितीचा अभ्यासक्रम आहे’ हे त्यांनी आपल्या व्याख्यानांमधून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातील अनेक पैलू उलगडून दाखवत पटवून दिले.

इतिहासाविषयी अभिमान, सत्यासत्यता तपासण्यासाठीची संशोधक वृत्ती, संयम, चिकाटी, एक प्रकारचा भारावलेपणा -वेडेपणा, स्मरणशक्ती आदी गुणांचा समुच्चय बाबासाहेब पुरंदरे यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये असल्याचे स्पष्टपणे जाणवते. या गुणांसह प्रखर बुद्धिमत्ता, विश्र्लेषण क्षमता आणि प्रेरक इतिहास अभिव्यक्त करण्यासाठीची विलक्षण लेखन-प्रतिभा व वक्तृत्वकला हे गुणविशेषही त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसतात. तसेच सखोल अभ्यासासह, शिस्तबद्धता, वक्तशीरपणा हे त्यांच्या स्वभावाचे खास गुणधर्म. या सर्व गुणांमुळेच ते आज संपूर्ण महाराष्ट्रातील व भारतातील शिवभक्तांच्या गुरुस्थानी आहेत. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक अभ्यासकांची शिवचरित्र अभ्यासाची वाटचाल सुरू झाली आहे.

भूतकाळाचा अर्थ उमगून इतिहासाच्या अभिमानासह आजच्या पिढीला वैभवशाली भविष्याकडे नेण्यासाठी बाबासाहेबांनी आपले आत्तापर्यंतचे आयुष्य वाहिले आहे असे म्हणणे गैर ठरणार नाही. आजही (वयाच्या ८६ व्या वर्षी) बाबासाहेब तितक्याच उत्साहाने, समरसतेने कार्यरत आहेत.

आचार्य अत्रे

प्रल्हाद केशव अत्रे


आचार्य अत्रे किंवा प्र. के. अत्रे या नावाने ओळखले जाणारे हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. त्यांची टोकदार लेखणी, बोचरा विनोद आणि दिलदार वृत्ती याला उभा महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाही.


त्यांच्या लेखणीने साहित्यातील बहुतांश सर्व प्रकारांना आपलेसे केले होते, तर त्यांच्या वाणीने महाराष्ट्रातील सर्व जनतेला आपलेसे केले होते. साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, वृत्तपत्रकार, वक्ते आणि नेते असे त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व. या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपल्या क्षमतांसह असामान्य उंची गाठली हे विशेष!

शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असताना विद्यार्थ्यांमधे मराठी भाषेची गोडी निर्माण करण्यासाठी मराठीतील अद्ययावत, जिवंत वाङ्‌मयाचा व विचारांचा परिचय करून देण्याचा प्रयोग राबवणे हे त्यांचे महत्त्वाचे शैक्षणिक कार्य ठरले. साहित्यिक क्षेत्रातही त्यांच्या कर्तृत्वाने मोठा दबदबा निर्माण झाला. आचार्य अत्रे यांनी प्रथम मकरंद व नंतर केशवकुमार या टोपणनावांनी काव्यलेखन केले. झेंडूची फुले (१९२५) हा त्यांचा विनोदी व विडंबन कवितांचा संग्रह खूप गाजला.

अत्रे यांच्या नाटकांनी मराठी रंगभूमीला आलेली मरगळ दूर करून प्रेक्षकांना रंगभूमीकडे खेचून आणले. त्यांच्या साष्टांग नमस्कार (१९३३),भ्रमाचा भोपळा (१९३५), लग्नाची बेडी (१९३६), घराबाहेर (१९३४), उद्याचा संसार (१९३६) या नाटकांना अलोट गर्दी व्हायची. हाऊसफुल्ल हा शब्द ‘घराबाहेर’ या नाटकामुळे रूढ झाला. तो मी नव्हेच (१९६०) या समकालीन सत्य घटनेवर आधारीत असलेल्या नाटकाने तर इतिहास घडवला. अजूनही हे नाटक लोकप्रिय आहे.

राम गणेश गडकरी यांना अत्रे गुरुस्थानी मानत. त्यांच्या नाटकांवर गडकर्‍यांच्या नाटकांचा काहीसा प्रभाव आढळतो. अत्र्यांच्या बहुतांश नाटकांमधून सामाजिक दोषदर्शन व दंभस्फोट आहेत, पण ते उपरोध, उपहास, विडंबन, अतिशयोक्ती या विनोदी माध्यमातून व्यक्त झाल्यामुळे प्रेक्षकांना चटकन आकृष्ट करतात.

शामची आई (१९५४) या त्यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटास राष्ट्रपती सुवर्ण पदक व महात्मा फुले (१९५५) या चित्रपटास रौप्यपदक प्राप्त झाले. धर्मवीर, प्रेमवीर, ब्रह्मचारी, ब्रँडीची बाटली हे त्यांचे पटकथा लेखन केलेले आणखी काही लोकप्रिय चित्रपट होत.

‘मी कसा झालो’ (१९५६) ह्या अत्रे यांच्या वाङ्‌मयीन आत्मशोधनातून व ‘कर्‍हेचे पाणी - १ ते ५ खंड’ या विस्तृत आत्मचरित्रातून आपणास अत्रे उलगडत जातात.

संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात त्यांनी आपल्या वाणी व लेखणीद्वारे भरीव असे कार्य केले, लोकांना योग्य मार्गदर्शन केले. त्यांच्या राजकीय कर्तृत्वाचा विकास संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या काळातच झाला. वक्तृत्व व वृत्तपत्र (मराठा, नवयुग) ही त्यांची प्रभावी साधने होती. मृत्युलेख (श्रद्धांजलीपर लेख) व अग्रलेख ही त्यांची खासियत होती. लोकप्रिय वक्ते म्हणूनही त्यांचा मोठा लौकिक होता. अत्र्यांचे भाषण म्हणजे त्यांचे हशा व टाळ्यांच्या माध्यमातून परखड विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे हुकमी साधन होते. आचार्य अत्रे यांच्याच शब्दांत त्यांच्याबद्दल सांगायचे झाले, तर ‘गेल्या दहा हजार वर्षांत असा माणूस झाला नाही, पुढच्या दहा हजार वर्षांत असा माणूस होणार नाही.’ 

विंदा करंदीकर

गोविंद विनायक करंदीकर उर्फ 'विंदा करंदीकर'


गोविंद विनायक करंदीकर उर्फ 'विंदा करंदीकर'(जन्मः २३ ऑगस्ट १९१८ - मृत्यूः १४ मार्च २०१०) हे मराठीतील ख्यातनाम कवी, लेखक व समीक्षक होते. देशाच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा एकोणचाळिसावा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना अष्टदर्शने या साहित्यकृतीसाठी प्रदान करण्यात आला. वि.स. खांडेकर आणि कुसुमाग्रजांनंतर हा पुरस्कार मिळवणारे ते तिसरे मराठी साहित्यिक ठरले. याशिवाय करंदीकरांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, कबीर सन्मान, जनस्थान पुरस्कार सारखे अनेक सन्मान व पुरस्कार देण्यात आले.


विंदाचे वडील विनायक करंदीकर कोकणात पोंभुर्ला येथे असत. विंदांनी त्यांचे शिक्षण कोल्हापूर येथे पूर्ण केले. हैदराबाद मुक्ती संग्रामात भाग घेतला आणि त्यासाठी तुरुंगवासही भोगला. कोकणच्या आर्थिक मागासलेपणाबद्दल ते संवेदनशील होते. राष्ट्रीय स्वयं संघ ते मार्क्सवाद असा त्यांचा वैचारिक प्रवास राहिला, पण ते अशा कोणत्याही संघटनेचे सभासद झाले नाहीत. अर्थार्जनासाठी त्यांनी अध्यापन स्वीकारले. बसवेश्वर कॉलेज, रत्नागिरी, रामनारायण रुईया महाविद्यालय , मुंबई, एस.आय.ई.एस. कॉलेज इत्यादी महाविद्यालयांमध्ये ते इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते. केवळ लेखन करण्यासाठी, इ.स. १९७६ मध्ये व्यावसायिक आणि इ.स. १९८१सालामध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. विंदाचे वैयक्तिक जीवन साधे, स्वावलंबी राहिले. त्यांनी स्वातंत्र्य-सैनिकांना मिळणारे वेतनपण कधी स्वीकारले नाही. काटेकोरपणाबद्दल त्यांची भूमिका नेहमी आग्रही राहिली.

विंदा करंदीकर यांच्या पत्नी सुमा करंदीकर आणि मुलगी सौ.जयश्री विश्वास काळे हेसुद्धा सामाजिक कार्यात सक्रिय असतात. त्यांना नंदू आणि उदय असे दोन मुलगे आहेत.विंदानी मराठी काव्यमंजूषेत विविध घाटाच्या रंजक व वैचारिक काव्यलेखनाची भर घातली, मराठी बालकवितेची मुहूर्तमेढ रोवली. विंदा, मंगेश पाडगावकर आणि वसंत बापट या ज्येष्ठ कवित्रयींनी संपूर्ण महाराष्ट्रात एकत्रित काव्यवाचनाचे असंख्य कार्यक्रम करून कविता जनसामान्यांपर्यंत पोहोचतील असे पाहिले. विंदाचे पहिले काव्यवाचन आचार्य भागवत यांच्याकडे झाले. इ.स. १९४९ साली पुण्यात भरलेल्या मराठी साहित्य संमेलनातील पहिल्या जाहीर काव्यवाचनाने त्यांचा मराठीभाषकांस परिचय झाला.विंदा करंदीकरांच्या कवितेत एकाच वेळी सामर्थ्य आणि सुकोमलता, विमुक्तपणा आणि संयम, अवखळपणा आणि मार्दव, गांभीर्य आणि मिस्किलपणा आणि प्रगाढ वैचारिकतेबरोबरच नाजुक भावसौंदर्य यांचा एकदम प्रत्यय येतो. कधी कधी त्यांची कविता कड्यावरून आपले अंग झोकून देणार्या जलप्रपातासारखी खाली कोसळताना दिसते. अशावेळी तिचा जोष, तिचा नाद, तिचे सामर्थ्य तिची अवखळ झेप पाहता-ऐकता क्षणीच आपले मन वेधून घेते. तर कधी कधी लपतछपत हिरवळीतून वाहणार्या एखाद्या झुळझुळ ओढ्याप्रमाणे ती अंग चोरून नाजूकपणे अवतरताना आढळते. प्रमत्त पुंगवाची मुसंडी आणि हरिणशावकाची नाजूक हालचाल, दगडगोट्यांनी भरलेले विस्तीर्ण माळरान आणि तुरळक नाजूक रानफुलांनी नटलेली लुसलुशीत हिरवळ, गौतमबुद्धाची ध्यानमग्न मूर्ती आणि जातिवंत विदूषकांची मिस्किल नजर यांची एकदम किंवा एकामागून एक आठवण व्हावी असेच तिचे रूप आहे. निखालस शारीर अनुभवातील रसरशीत सत्याला सुरूप देण्यात ती जशी रंगून जाताना दिसते तशीच केवळ वैचारिक अनुभवांच्या वातचक्रातून गिरगिरत वरवर जाण्यात संपूर्ण देहभान विसरते. ती कधी चित्रमयी बनते, कधी कोड्याच्या भाषेत बोलते, तर कधी तिच्या अभिव्यक्तीत एक प्रकारचा गद्याचा परखडपणा अवतरतो. तिचे रूप न्यारे आहे. व्यक्तित्व आगळे आहे. तिचा रोख झोक नोक सर्व तिचा आहे. ती एकाच वेळी रसिकास आकर्षून घेते आणि गोंधळून सोडते.

विंदांच्या 'मृ्द्‌गंध' या पॉप्युलर प्रकाशनाने १५ डिसेंबर १९५४ ला प्रसिद्ध केलेल्या पहिल्या आवृत्तीच्या मलपृष्ठावरून

विजया राजाध्यक्ष यांनी ग्रंथाली प्रकाशनाकरीता विंदाशी केलेल्या संवादात विंदा आजच्या समकालीन मराठी साहित्याबद्दल म्हणतात, "वाचकांचे अनेक थर आहेत, यातला कोणताही एक थर वंचीत ठेवणे हे पाप आहे. अशी कल्पना करा की, वाड्मय हे एक जंगल आहे. चार उच्चभ्रू लोकांना बाग हवी असते. त्या बागेच्या रचनेबद्दल त्यांच्या काही कल्पना असतात. पण कोणत्याही देशात बागेप्रमाणे जंगलही पाहिजेत आणि गवताळ प्रदेशही पाहिजेत. जंगलात सर्व प्रकारची बेगुमानपणे वाढलेली झाडे पाहीजेत." हे म्हणतानाच विंदा मराठी साहीत्यात पुरेसे महावृक्ष नसल्याबद्दल खंतही व्यक्त करतात.

भालचंद्र वनाजी नेमाडे


शिक्षण : खानदेशात मॅट्रिक(१९५५), (बी.ए.१९५९, फर्ग्युसन कॉलेज, पुणे), एम.ए. १९६१, (भाषाशास्त्र, डेक्कन कॉलेज, पुणे), आणि एम.ए., (इंग्रजी साहित्य, मुंबई विद्यापीठ) मुंबई- १९६४. त्यांना जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून डी.लिट. ही सन्माननीय पदवी मिळाली आहे.

व्यवसाय : इंग्रजीचे प्राध्यापक : अहमदनगर(१९६५), धुळे (१९६६), औरंगाबाद. (१९६७-७१), School of oriental and African studies, London (१९७१-७१), आणि १९७४ पासून मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद. शेवटी ते मुबई विद्यापीठातील तुलनात्मक साहित्याच्या गुरुदेव टागोर आसनावरून निवृत्त झाले.कोसला हे पुस्तक त्यांच्या वयाच्या २५व्या वर्षी प्रकाशित झाले.


 कोसला ही पांडुरंग सांगवीकर या खेड्यातून आलेल्या व पुण्यात शिकणाऱ्या तरुणाची आत्मकथा आहे. ही कादंबरी सर्वसाधारण मराठी वाङ्मयप्रवाहाच्या बाहेरील कलाकृती मानली जाते.कोसलाच्या यशानंतर नेमाडेंनी बिढार(१९६७), जरीला(१९७७) व झूल(१९७९) या "चांगदेव पाटील" या काल्पनिक नायकाच्या जीवनावरील कादंबऱ्या लिहिल्या.
हिंदू नावाची कादंबरी नेमाडे लिहिली असून ती जुलै १५, इ.स. २०१० ला पॉप्युलर प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झाली आहे. कादंबऱ्यांसोबतच त्यांचे 'देखणी'आणि 'मेलडी’(१९७०) हे काव्यसंग्रहही प्रसिद्ध आहेत.

 या कवितासंग्रहातील कवितांची हिंदी आणि इंग्रजी भाषांतरेही प्रकाशित झाली आहेत.१९६० नंतरचे मराठीतील श्रेष्ठ लेखक अशी भालचंद्र नेमाडे यांची प्रतिमा आहे.

वि. वा. शिरवाडकर

विष्णु वामन शिरवाडकर / कुसुमाग्रज

विष्णु वामन शिरवाडकर,(२७ फेब्रुवारी, १९१२-१० मार्च १९९९) हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने लेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्न असे त्यांचे वर्णन करतात. वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. त्यांचा जन्म दिवस हा "'मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.




कुसुमाग्रजांचा जन्म पुणे येथे इ.स १९१२ मध्ये २७ फेब्रुवारी या दिवशी झाला. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते. त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचे नाव विष्णु वामन शिरवाडकर असे बदलले गेले. नाशिक येथे त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. बी.ए.ची पदवी मिळाल्यानंतर काही काळ त्यांनी चित्रपट व्यवसायात पटकथा लिहणे, चित्रपटात छोट्या भूमिका करणे अशी कामे केली. यानंतर स्वराज्य, प्रभात,नवयुग,धनुर्धारी, अशा विविध नियतकालिकांचे, वृत्तपत्रांचे संपादक म्हणून त्यांनी काम केले. १९३२ साली झालेल्या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहात त्यांचा सहभाग होता. १९३३ साली त्यांनी 'ध्रुव मंडळा'ची स्थापना केली. अनेक सामाजिक चळवळीत, सत्याग्रहांमधे सहभाग घेतला. पुढील काळातही त्यांनी नाशिक जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली.
१० मार्च १९९९ रोजी त्यांचे निधन झाले.

सामाजिक अन्याय व विषमता या विषयांवर कुसुमाग्रजांनी त्यांच्या लिखाणातून कठोर टीका केली. "साहित्यिकाने सामाजिक बांधिलकी मानली पाहिजे" या मताचा त्यांनी पुरस्कार केला. कवितांबरोबरच त्यांनी अनेक नाटकेही लिहिली. याशिवाय कादंबरी, कथा, लघुनिबंध इत्यादी साहित्यप्रकारही त्यांनी हाताळले.
[संपादन]साहित्यविचार
प्रा. देवानंद सोनटक्के यांच्या मतानुसार अशाप्रकारे कुसुमाग्रजांचा साहित्यविचार पूर्णतः लौकिकतावादी आहे. एका समाजमनस्क कलावंतांच्या सामाजिक चिंतनाचा आलेख त्यात उमटला आहे. कलावादाचा अतिरेक आणि सामाजिकतेचा तिरस्कार अशा द्वंद्वात अडकलेल्या मराठी साहित्यव्यवहारात त्यांनी समन्वय साधला आहे. कलाक्षेत्रात त्या त्या वेळी निर्माण झालेल्या संभ्रमावस्थेतेचे पितामहाच्या भूमिकेतून केलेले ते मार्गदर्शन आहे. कुसुमाग्रज, अहंकार, अनुभव आणि आविर्भाव ही कलेची आधारभूत तत्त्वे मानतात, त्यांचा हा विचार लेखकसापेक्ष आहे. अहंकार लेखकाच्या लेखनप्रक्रियेला प्रेरणा आणि गती देतो, हे तत्त्व लेखकसापेक्ष आहे. आविर्भाव आशयाचा आकार म्हणजे घाट ठरवितो, म्हणजे हे तत्त्व कलाकृतिसापेक्ष आहे. वर्चस्व हे तत्त्व रसिकसापेक्षआहे; तर लेखकाच्या अनुभवाची समृध्दी लेखकाच्या सामीलकीवर अवलंबून असते, हे तत्त्व समाजसापेक्ष आहे. कुसुमाग्रजांचा साहित्यविचार समाजसापेक्ष असून ते सामाजिकतेलाच परतत्त्व मानतात, विविध जातींतील लेखक लिहू लागणे यात त्यांना साहित्याची परपुष्टता, समृद्धी वाटते. [१]
कुसुमाग्रजांच्या साहित्यविचाराचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असे तो एकाचवेळी लेखकसापेक्ष आणि समाजसापेक्ष आहे. लेखकाच्या अनुभवाला, त्याच्या स्वातंत्र्याला आणि त्याचा व्यक्तिमत्त्वाला कुसुमाग्रज महत्त्व देतात. कलेचे आधारभूत तत्त्व ते सौंदर्य, नीती, आत्मनिष्ठा इत्यादींना मानत नाही. त्यांच्या मते "अहंकार, अनुभव आणि आविर्भाव ही साहित्याचीच नव्हे कोणत्याही मानवनिर्मित कलेची आधारभूत तत्त्वे होत.” (रूपरेषा,पृ.२३)
प्रा. देवानंद सोनटक्के यांच्या मतानुसार कलाकृतीत नावीन्य अनुभवामुळेच येते, असे कुसुमाग्रज म्हणतात. म्हणजे कुसुमाग्रजांची नावीन्याची संकल्पना आकृतिवादी नसून आशयवादी आहे.नावीन्य व अनुभव समृद्धीसाठी लेखकाने सामीलकी आणि सामाजिकतेचा स्वीकार करावा. समाजजीवनातील उपेक्षितांचे अनुभव साहित्यात यावे. त्यासाठी समाजजीवनातील व साहित्य व्यवहारातील पुरोहितशाही, जातीयता नष्ट होणे गरजेचे आहे, असे कुसुमाग्रज मानतात.

कविता संग्रह
जीवन लहरी(१९३३)
जाईचा कुंज (१९३६)
विशाखा (१९४२)
समिधा ( १९४७)
किनारा(१९५२)
मेघदूत(१९५६)
मराठी माती (१९६०)
स्वगत(१९६२)
हिमरेषा(१९६४)
वादळ वेल (१९६९)
रसयात्रा (१९६९)
छंदोमयी (१९८२)
मुक्तायन (१९८४)
श्रावण (१९८५)
प्रवासी पक्षी (१९८९)
पांथेय (१९८९)
माधवी(१९९४)
महावृक्ष (१९९७)
चाफा(१९९८)
मारवा (१९९९)
अक्षरबाग (१९९९)
थांब सहेली (२००२)
[संपादन]निबंध संग्रह
आहे आणि नाही (पुस्तक) - लघुनिबंध संग्रह
प्रतिसाद(पुस्तक) - लघुनिबंध संग्रह
[संपादन]नाटक
दूरचे दिवे
दिवाणी दावा
आमचं नाव बाबुराव
वैजयंती
नाटक बसते आहे
बेकेट
आनंद
राजमुकुट
देवाचे घर
एक होती वाघीण
मुख्यमंत्री
वीज म्हणाली धरतीला
ऑथेल्लो
विदूषक
जेथे चंद्र उगवत नाही
दुसरा पेशवा
कौंतेय
ययाति देवयानी
नटसम्राट
[संपादन]कथासंग्रह
फुलवाली (कथासंग्रह)
काही वृद्ध काही तरुण (कथासंग्रह)
सतारीचे बोल (कथासंग्रह)
अपॉईंटमेंट (कथासंग्रह)
बारा निवडक कथा (कथासंग्रह)
[संपादन]कादंबरी
वैष्णव (कादंबरी)
जान्हवी (कादंबरी)
कल्पनेच्या तीरावर (कादंबरी)


महाराष्ट्र सरकारचे उत्कृष्ट पुस्तकासाठीचे पुरस्कार
’मराठी माती’ला १९६० साली
’स्वगत’ला १९६२ साली
’हिमरेषा’ला १९६२ साली
’नटसम्राट’ला १९७१ साली
’नटसम्राट’ला साहित्य अकादमीचा पुरस्कार (१९७४)
विशाखा कवितासंग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कार
भारत सरकारचा साहित्यक्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्कार

जयंत विष्णू नारळीकर

जयंत विष्णू नारळीकर


नारळीकरांचा जन्म कोल्हापूर येथे जुलै १९, १९३८ रोजी झाला. त्यांचे वडील, विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ होते. वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित विभागचे प्रमुख होते. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या. जयंत नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. इ.स. १९५७ साली त्यांनी विज्ञानाची पदवी (BSc) प्राप्त केली.या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील कॅंब्रिज येथे गेले. तेथे त्यांना बीए, एमए व पीएचडी च्या पदव्या मिळाल्या. रॅंग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल व इतर अनेक बक्षिसे मिळाली.


१९६६ साली नारळीकर यांचा विवाह मंगला सदाशिव राजवाडे (गणितज्ञ) ह्यांच्याशी झाला. त्यांना तीन मुली आहेत - गीता, गिरिजा व लीलावती. १९७२ साली ते भारतात परतले. त्यांनी मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टी.आय.एफ.आर.) खगोलशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून पद स्वीकारले. १९८८ साली त्यांची पुणे येथील आयुका संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली.

स्थिर स्थिती सिद्धान्त
चार दशकांहून अधिक कालावधीपासून त्यांचे अंतरिक्ष विज्ञान क्षेत्रात संशोधन सुरू आहे. त्याच बरोबर सतत पुस्तके लिहिण्याचा कार्यक्रमही चालू आहे. सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजवण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे प्रयत्न केले आहेत. यासाठी सर्व प्रसारमाध्यमांचा ते उपयोग करतात. त्यांच्या 'यक्षांची देणगी' या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.

१९६५ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला.
२००४ मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला.
२०१० मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला.
त्यांना भटनागर पुरस्कार आणि एम. पी. बिरला पुरस्कारही मिळाले आहेत.

पुस्तके
वामन परत न आला
अंतराळातील भस्मासुर
कृष्णमेघ (अनुवाद, मूळ लेखक:फ्रेड हॉयल Fred Hoyle)
प्रेषित
व्हायरस
अभयारण्य
यक्षांची देणगी
टाइम मशीनची किमया
याला जीवन ऐसे नाव
आकाशाशी जडले नाते
विज्ञानाची गरुडझेप
गणितातील गमतीजमती
विश्वाची रचना
विज्ञानाचे रचयिते
नभात हसरे तारे

वि.स.खांडेकर

विष्णू सखाराम खांडेकर


ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेले पहिले मराठी साहित्यिक !

विष्णू सखाराम खांडेकर हे मराठी साहित्यातील एक अग्रगण्य कादंबरीकार, एक लोकप्रिय साहित्यिक म्हणून ओळखले जातात. त्यांनी कादंबरीसह कथा, कविता, लघुनिबंध, समीक्षा, चित्रपट-कथा, नाटक, व्यक्तिचित्रे, अनुवाद अशा विविध साहित्यप्रकारांत अगदी विपुल असे लेखन केले. वृत्तपत्रीय लेखन व ग्रंथ-संपादन या क्षेत्रांतही त्यांनी ठसा उमटवला.


कुमारवयापासूनच त्यांच्यावर उत्तम साहित्याचे संस्कार होत होते, ते त्यांच्या मराठीच्या शिक्षकांमुळे आणि बालकवी, राम गणेश गडकरी, अच्युतराव कोल्हटकर यांसारख्या साहित्यिकांशी झालेल्या परिचयामुळे. गडकरींमुळे पाश्र्चात्त्य साहित्य वाचण्याचा छंदही त्यांना तेव्हा लागला होता. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी खांडेकरांना विनोद चांगला साधतो व काव्यात्म प्रकृतीचे लेखनही ते करू शकतात, तेव्हा या दोहोंचे मिश्रण असलेल्या गोष्टी त्यांनी लिहाव्यात असे सुचवले; तेव्हा खांडेकर यांना स्वत:त लपून बसलेला कथाकार सापडला. ते उत्कृष्ट वक्ते म्हणूनही महाराष्ट्रात प्रसिद्ध होते.

एक कादंबरीकार म्हणून स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच त्यांना महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेरही अफाट लोकप्रियता मिळाली. १९३० मध्ये ‘हृदयाची हाक’ ही पहिली कादंबरी त्यांनी लिहिली. त्यानंतर एकापाठोपाठ एक कांचनमृग (१९३१), दोन ध्रुव (१९३४), हिरवा चाफा, दोन मने (१९३८), रिकामा देव्हारा (१९३९), पहिले प्रेम(१९४०) अशा त्यांच्या अनेक कादंबर्‍या प्रकाशित झाल्या. सुमारे ३५ कथासंग्रह, १० लघुनिबंध संग्रह, गोफ आणि गोफण यांसारखे समीक्षालेख संग्रह असे झंझावाती लेखन त्यांनी केले. छाया, ज्वाला, अमृत, देवता, माझं बाळ यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांच्या कथाही त्यांनी लिहिल्या.
शब्दप्रभुत्व, कोटीबाजपणा, कल्पनावैभव यांचा वारसा त्यांनी कोल्हटकर-गडकरी यांच्याकडून घेतला. मध्यमवर्गीय माणसांच्या आशा-आकांक्षा, सर्वसामान्यांची सुख दु:खे, त्यांचा आदर्शवाद त्यांनी मुख्यत्वे आपल्या कथा-कादंबर्‍यांतून मांडला. त्यांचा नायक हा सामाजिकतेचे भान असलेला, आदर्शाची ओढ असलेला असे. हळूहळू बदलत चाललेल्या सामाजिक परिस्थितीत या प्रकारचा आदर्शवाद ही मध्यमवर्गीय तरुण पिढीची मानसिक गरज होती. त्यामुळे खांडेकर त्या काळातले सर्वांत लोकप्रिय लेखक ठरले. त्यांची क्रौंचवध (१९४२) ही कादंबरीही लोकप्रिय ठरली. ययाती(१९५९), अमृतवेल (१९६७) या स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वांत जास्त गाजलेल्या त्यांच्या कादंबर्‍या होत. ‘ययाती’ला १९६० चा साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला.

भारत सरकारने १९६८ मध्ये पद्मभूषण सन्मान देऊन त्यांना गौरवले. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने त्यांना डी. लिट. (डॉक्टर ऑफ लिटरेचर) बहला केली. तर भारतीय ज्ञानपीठातर्फे १९७४ मध्ये त्यांना ‘ज्ञानपीठ’ या अत्युच्च मानाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांच्या कथा-कादंबर्‍यांवर अनेक भाषांमध्ये चित्रपट, दुरदर्शन मालिकाही निर्माण झाल्या. त्यांच्या साहित्याचे अन्य भारतीय भाषांत व विदेशी भाषांतही अनुवाद झाले.

‘रूपककथा’ ही खांडेकरांनी मराठी कथेला दिलेली देणगी होय. आपले जीवनविषयक तत्त्वज्ञान आणि आदर्श मूल्ये यांची मांडणी त्यांनी या कथांतून केली. वेचलेली फुले (१९४८) या संग्रहात या रूपककथा आहेत. अक्षरश: चकित व्हायला व्हावे एवढे विविध प्रकारचे, विपुल आणि तरीही दर्जेदार असे लेखन करून खांडेकरांनी मातृभाषेची सेवा केली आहे, आणि त्यायोगे मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून त्यांनी मराठी रसिकांत व साहित्यिकांमध्ये चैतन्य आणि आत्मविश्र्वास निर्माण केला.

यशवंतराव चव्हाण

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण


आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण (मार्च १२, इ.स. १९१३:कराड, महाराष्ट्र - नोव्हेंबर २५, इ.स. १९८४) हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.


गुणांच्या बळावरच त्यांनी गरीब शेतकरी कुटुंबातील मुलगा ते राष्ट्रीय नेते अशी झेप घेतली. सातारा जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी इ.स. १९१३ मध्ये जन्मलेल्या यशवंतरावांना त्यांच्या आईने-विठाबाईंनी-निग्रहाने सांभाळले, घडवले. स्वातंत्र्यपूर्व काळात कराड येथे शालेय शिक्षण घेत असतानाच त्यांनी तिरंगा फडकवल्याबद्दल १८ महिने तुरुंगवास भोगला. वकिलीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते (नुकतेच लग्न झालेले असूनही) इ.स. १९४२ च्या लढ्यात सातारा जिल्ह्यात आघाडीवर होते. या आंदोलनातही त्यांनी दोन वर्षांचा तुरुंगवास भोगला.
इ.स. १९५६ मध्ये स्थापन झालेल्या द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली. तसेच मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर (१ मे, १९६०) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणूनही त्यांचीच निवड झाली. इ.स. १९६२ मध्ये चीन युद्धाच्या काळात तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी यशवंतरावांची नेमणूक देशाच्या संरक्षणमंत्रीपदावर केली. हा त्यांच्या कारकीर्दीचा सर्वोच्च बिंदू म्हणता येईल. पुढील काळात त्यांनी उपपंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री ही पदे यशस्वीरीत्या भूषविली. केंद्रात जनता पक्षाचे सरकार असताना (१९७७-७८) ते विरोधी पक्षनेते होते. तसेच पुढे ते केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्षही झाले.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असताना त्यांनी काही महत्त्वाच्या योजना राबवल्या .
- पंचायत राज या त्रिस्तरीय (जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत) व्यवस्थेची सुरुवात. (प्रशासकीय विकास)
- राज्य पंचवार्षिक योजनांचा प्रारंभ. (आर्थिक विकास)
- कोल्हापूर प्रकारच्या बंधाऱ्यांचा प्रचार. कोयना व उजनी ह्या प्रमुख प्रकल्पांच्या उभारणीला गती. (मूलभूत सोयी सुविधांचा विकास)
- १८ सहकारी साखर कारखान्यांची स्थापना. (सहकाराला चालना)
- मराठवाडा (आत्ताचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ) व कोल्हापूर विद्यापीठाची (शिवाजी विद्यापीठाची) स्थापना. (शैक्षणिक विकास)
- राज्यातील कृषी विद्यापीठांच्या स्थापनेतही संकल्पनात्मक सहभाग. (कृषिविकास)
- मराठी साहित्य संस्कृती महामंडळ व विश्र्वकोश मंडळाची स्थापना. (सांस्कृतिक विकास)
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्रींपासून ते ना. धो. महानोरांपर्यंतच्या विचारवंतांशी व साहित्यिकांशी त्यांचे चांगले संबंध होते. कृष्णाकाठ, ऋणानुबंध आदी पुस्तकांतून त्यांच्यातील लेखकही दिसतो.

यशवंतराव चव्हाणांचे चरित्र सांगणारी अनेक पुस्तके आहेत. त्यांतली काही पुस्तके अशी :
यशवंतराव चव्हाण, व्यक्तित्व व कर्तृत्व (लेखक : गोविंद तळवलकर)
यशस्वी यशवंतराव (रा.द.गुरव)
यशवंतराव चव्हाण : चरित्र (बाबूराव बाळाजी काळे)
यशवंतराव चव्हाण : व्यक्ती व कार्य (कृ.भा. बाबर)
यशवंतराव चव्हाण : व्यक्ती और कार्य (परमार रंजन)
आमचे नेते यशवंतराव (रमणलाल शहा)
यशवंतराव बळबंतराव चव्हाण (नामदेव व्हटकर)
यशवंतराव चव्हाण जीवन दर्शन (पंजाबराव जाधव)
सोनेरी पाने (भा.वि.गोगटे)
यशवंतराव : इतिहासाचे एक पान (रामभाऊ जोशी)
घडविले त्यांना माऊलीने (ग.शं. खोले)
ही ज्योत अनंताची (रामभाऊ जोशी)
यशवंतराव चव्हाण गाजते कीर्ती (दुहिता)
मुलांचे यशवंतराव चव्हाण (जे.के.पवार)
नवमहाराष्ट्राचे शिल्पकार (दत्तात्रय बारसकर)
कृष्णाकाठचा माणूस (अरुण शेवते)
वादळ माथा (राम प्रधान)
यशवंतराव चव्हाण - चरित्र (अनंतराव पाटील)
भारताचे सुपुत्र यशवंतराव चव्हाण (डॉ.पंजाबराव जाधव)
यशवंतराव चव्हाण (प्रा.डॉ.कायंदे पाटील)