Wednesday, 23 April 2014

रजनीकांत

शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत



 हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेता,मनोरंजन व्यवसायातील प्रसिद्ध व्यक्ती,चित्रपटातील एक मोठे व्यक्तीमत्त्व, आणि ख्यातनाम तमिळ चित्रपट अभिनेते व परोपकारी/लोककल्याणकारी व्यक्ती आहे.एम.जी.रामचंद्रन नंतरचे सर्वात यशस्वी कलाकार म्हणून त्यांची ख्याती आहे.ते गेल्या तीन हून अधिक दशकांपासून तमिळ चित्रपट सष्टीवर अधिराज्य गाजवत आहेत.तमिळ आणि एकंदरीतच दक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीचे अनभिक्षीत सम्राट ,प्रेक्षकांची गर्दी खेचून आणणारे,आपल्या संवादफेकी बद्दल प्रसिद्ध आणि आपल्या विशिष्ट अभिनय शैलीसाठी रजनीकांत जाणले जातात. हे तमिळ चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेते आहेत. दक्षिण भारतात त्यांच्या नावावर सर्वात जास्त यशस्वी चित्रपट आहेत. त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिळ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. त्यांची मातृभाषा मराठी असली, तरीही त्यांनी मराठी चित्रपटांत कधीही काम केले नाही. ते भारतातील व आशिया खंडातील ('शिवाजी द बॉस' या चित्रपटानंतर) सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. 'शिवाजी द बॉस' चित्रपटासाठी त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते.रजनीकांत हे भारताबाहेर अनेक देशात लोकप्रिय अभिनेते आहेत,तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे.जपान मध्ये त्यांचे चित्रपट अधिक लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे व त्यांचे फॅनक्लब्स देखील आहेत.
रजनीकांत ह्यांचा जन्म १२ डिसेंबर १९५० रोजी बंगळूर येथे एका महाराष्ट्रीयन मराठा हेन्द्रे पाटील (मराठी भाषक) कुटूंबात झाला.त्यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड असून वडिलांचे रामोजीराव आणि आईचे जीजाबाई गायकवाड असे आहे.गायकवाड कुंटुंबीयांच्या चार अपत्यांपैकी सर्वात लहान रजनीकांत आहेत.त्यांचे मुळ गाव पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील आहे असे सांगीतले जाते.तसेच जेजूरीचा खंडेराय त्यांचे कुलदैवत असल्याचे मध्यंतरी रजनीकांत ह्यांनी सकाळ ह्या वृत्तपत्रास दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते.रजनीकांत ह्यांना दोन मोठे भाऊ आणि एक बहिण देखील आहे.शाळेत असतांना गरिबीमुळे त्यांना खूप कठिण परिस्थितीत दिवस काढावे लागले.बंगळूर येथील आचार्य पाठशाळा ह्या शाळेत त्यांचे शालेय शिक्षण झाले व रामकृष्ण मिशनच्या बंगळूरमधील महाविद्यालयात त्यांचे उच्चशिक्षण पूर्ण झाले.१९६८-१९७३ दरम्यान रजनीकांत मद्रास आणि बंगळूर मध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळी कामं केली.त्यानंतर ते बंगळूर बस ट्रांस्पोर्ट सर्व्हिस मध्ये कंडक्टर (वाहक) म्हणून दाखल झाले.चित्रपट काम करण्याच्या जिद्दी मुळे आणि एका मित्राच्या मदतीने ते त्यानंतर चेन्नैला चित्रपटातील अभिनय शिकण्यासाठी गेले.मद्रास फिल्म इंस्टीट्यूट मध्ये अभिनयाचा अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांनी आपल्या अभिनयाची कारकिर्द १९७४-७५मध्ये सुरू केली.
२००० सालचा भारत सरकारतर्फे दिल्या जाणार्या पद्मभूषण ह्या नागरी गौरवाचे मानकरी.
जर्मनीतील सर्वोच्च नागरी सन्मान/पुरस्कार द फ्युरिअर ने सन्मानीत.
जपानचा एमटीव्ही सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार, जागतीक चित्रपटातील योगदानाबद्दल.
टाईम्स मॅगझीन ने रजनीकांत ह्यांना जगातील सर्वात प्रभावी १०० व्यक्तींच्या यादीत स्थान दिले आहे.
आशिया खंडातील चित्रपट उद्योगात जॅकी चॅन नंतरचे सर्वात अधिक मानधन मिळविणारे कलाकार.
आंतरराष्ट्रीय चित्रपट जगतात सर्वाधिक प्रसिद्धी बद्दल गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस मध्ये नोंद.(सर्वाधिक जागतिक चाहते असणारा कलाकार.)
६ वेळा (सर्वोत्कृष्ट अभिनेता) तमिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार विजेता तसेच अनेकदा नामांकन.
९ वेळा (सर्वोत्कृष्ट अभिनेता) सिनेमा एक्सप्रेस चित्रपट पुरस्कार विजेता तसेच अनेकदा नामांकन.
१० वेळा फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेता तसेच लेखक, निर्माता,सहकलाकार, अशा अनेक भूमिकांबद्दल अनेक नामांकन आणि पुरस्कार.
महाराष्ट्र शासनाचा २००७ चा सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार (राज कपूर पुरस्कार) विजेता.
१९९५ मध्ये आध्यात्मिकतेसाठी "ओशोबिस्मित" पुरस्काराने सन्मानीत.
भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोत्तम कामगिरीचा चेवलिर शिवाजी गणेशन पुरस्कार विजेता.

केशव हेडगेवार

डॉ. केशव बलीराम हेडगेवार

केशव बळीराम हेडगेवार  हे भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या हिंदुत्ववादी-राष्ट्रवादी संघटनेचे संस्थापक होते.. केशव बलीराम हेडगेवार यानचा जन्म जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेला एप्रिल १ सन इ.स. १८८९ मध्ये महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश च्या मधल्या बोधाण तालुक्यातील कुंदाक्रुती गावाता झाला.


हेडगेवारांचे शिक्षण त्यांच्या मोठ्या भावाने केले. मैट्रिक पास झाल्या नंतर, इ.स. १९१० साली ते चिकित्सा शिक्षण घेण्या साठी ते कोलकात्ताला गेले. तरुणपणात सशस्त्र क्रांतीत सहभाग घेतलेला. शाळेत असताना त्यांनी - व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाला ६० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल वाटण्यात आलेली मिठाई रागाने फेकून दिली होती. तसेच पुढे ‘वंदे मातरम्‌’ चा घोष केल्याबद्दल त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले होते. बंगालमधील प्रत्यक्ष क्रांतिकार्यात सहभाग घेता यावा यासाठी त्यांनी आपले उच्चशिक्षण जाणीवपूर्वक कोलकतामध्ये घेतले. तेथे ते अनुशीलन समिती या क्रांतिकारी संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते बनले. पुढील काळात नागपुरात परतल्यावर कॉंग्रेसच्या माध्यमातून त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील अनेक आंदोलनांमध्ये भाग घेतला व अनेक वेळा कारावास भोगला. इ.स. १९२० ते इ.स. १९३१ या काळात ते अनेक सत्याग्रहांमध्ये, आंदोलनांमध्ये सहभागी होते.

या सर्व काळात डॉक्टरांनी हिंदू समाज जवळून पाहिला, अनुभवला. हिंदू समाजाला एवढी प्राचीन परंपरा, प्रदीर्घ इतिहास व सांस्कृतिक वारसा असताना हा देश गुलाम का झाला, या प्रश्र्नाने डॉक्टरांना अंतर्मुख केले. या देशातील हिंदू समाज परस्परांतील, जाती-जातींतील भेदांनी दुभंगला आहे. राष्ट्रीय हितापेक्षा वैयक्तिक हिताला प्राधान्य दिले जाते आहे. या दुर्गुणांमुळेच देश गुलाम झाला. देशात इतर अनेक विचार प्रवाह असूनही त्यामध्ये राष्ट्र म्हणून विचार करणारी एकही यंत्रणा नाही. या भूमिकेतूनच डॉक्टरांनी इ.स. १९२५ सालच्या विजयादशमीच्या दिवशी (दि. २७ सप्टेंबर, इ.स. १९२५) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना स्थापन केली. इथे हिंदूंचे संघटन करताना हिंदू स्वयंसेवक संघ न म्हणता राष्ट्रीय हा शब्द वापरला. कारण हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व ही डॉक्टरांची ठाम धारणा होती. याच राष्ट्रीय समाजाला संघटित करून राष्ट्राला परम वैभवाला न्यायचे हे संघटनेचे ध्येय ठरवून त्यांनी वाटचालीला आरंभ केला. स्थापनेच्या क्षणापासून डॉक्टरांचे संघटना बांधणी, विस्तार, मुनष्यबळ नियोजन, संघटनेची रचना, विचारधारा, एकूण कार्यपद्धती - या सर्व गोष्टींबाबतचे चिंतन व प्रत्यक्ष कार्य चालूच होते. दरम्यान इ.स. १९२९ मध्ये डॉ. हेडगेवार यांची औपचारिकरीत्या ‘सरसंघचालक’ (राष्ट्रीय प्रमुख किंवा प्रमुख संघटक) या पदावर नियुक्ती झाल्याचे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घोषित केले.

डॉक्टरांनी स्थापन केलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला एक वेगळे तत्त्वज्ञान व वेगळ्या प्रकारची कार्यपद्धती दिली. त्या पायावरच रा. स्व. संघ हा गेली अनेक वर्षे यशस्वीरीत्या कार्यरत आहे. क्रांतिकार्यातील आपले जुने सहकारी सोबत घेऊन त्यांनी नागपुरात एका पडक्या वाड्यात संघाची पहिली शाखा सुरू केली. चारित्र्यसंपन्न व्यक्तिनिर्माण व त्या आधारावर राष्ट्रनिर्माण या अंतिम ध्येयाचा विचार त्यांनी संघस्थापनेच्या माध्यमातून केला. डॉ. हेडगेवार हे कुशल संघटक, मार्गदर्शक व नेते होते. त्यांच्याच प्रेरणादायी नेतृत्वामुळे गोळवलकर गुरुजी, बाळासाहेब देवरस, भैय्याजी दाणी, एकनाथजी रानडे (स्वामी विवेकानंद स्मारकाचे शिल्पकार), पं. दीनदयाळ उपाध्याय आदी नेते - कार्यकर्ते भारताला प्राप्त झाले. इ.स. १९२५ ते इ.स. १९४० या काळात, सतत १५ वर्षे डॉक्टर देशभर प्रवास करत होते, एक-एक माणूस, कार्यकर्ता, स्वयंसेवक घडवण्याचा व संघाला जोडण्याचा प्रयत्न करत होते.

सच्चे नेतृत्व, त्याग, सेवा, समर्पण भावना,दूरदर्शी विचार आणि शिस्तबद्ध, निश्र्चल व व्रतस्थ कार्यजीवनशैली ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची विविध अंगे होती. दिनांक २१ जून,इ.स. १९४० साली डॉक्टरांचे निधन झाले. त्यापूर्वी एक वर्ष आधी त्यांनी संघाच्या कार्यपद्धतीबाबत संघस्वयंसेवकांसाठी काही निर्देश देऊन ठेवले. संघाची निश्र्चित अशी कार्यपद्धती तयार झाली व जणू आपल्या पश्चात संघटनेला ध्येयप्राप्तीसाठीची शिदोरीच त्यांनी संघाला अर्पण केली.

भगवा ध्वज, गुरू, गुरूदक्षिणेची वेगळी संकल्पना, विचारांना मुख्य व व्यक्तीला गौण स्थान, सामूहिक निर्णय पद्धती, पूर्णवेळ कार्यकर्ता संकल्पना, दैंनदिन शाखा (बाल-तरुण-थोरांनी रोज संध्याकाळी खेळण्यासाठी, देशभक्तिपर गाणी म्हणण्यासाठी एकत्र जमणे), सभासद नोंदणी-अध्यक्ष-सचिव-संचालक मंडळ या प्रचलित पद्धतींना फाटा आदी वैशिष्ट्ये असलेली कार्यपद्धती डॉ. हेडगेवार यांनी रा. स्व.संघामध्ये रुजवली.

हेडगेवार सुरवातीला कॉंग्रेसचे सदस्य होते व मा. गांधीनी सुरु केलेल्या असहकार चलवलीत त्यानी भाग घेतला होता. पण हिन्दू बहुसंख्य असुनही त्यांचावर व त्यांचा संस्कृतीवर परकीय धर्मियांकडून होणारे अत्याचार व स्वःधर्माची झालेली जातीजमातीतील विभागणी पाहून हिंदूंनमध्ये ऐक्यभाव निर्माण व्हावा यासाठी सन १२२५ मध्ये ' राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ' या शिस्तबद्ध सामाजिक संघटनेची स्थापना केली.

आज देशभरात संघाचे स्वयंसेवक विविध भागात आपल्या सर्वस्वाचा त्याग करुन लोकसेवेत कार्यरत आहेत. पण संघ शिस्तीप्रमाणे याची कुठेही प्रसिद्धि केलि जात नाही.


* डॉ. केशव बलीराम हेडगेवार यांचा स्मृतीस विनम्र अभिवादन.

साने गुरुजी

पांडुरंग सदाशिव साने उर्फ़ साने गुरुजी


महाराष्ट्राच्या भावशक्तीचे प्रतीक असलेला राष्ट्रभक्त व जनतेसाठी अंत:करण पिळून लिहिणारा एकमेवाद्वितीय साहित्यिक !

साने गुरुजींचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने ! त्यांचा जन्म कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. त्यांच्यावर त्यांच्या आईच्या शिकवणुकीचा फार मोठा प्रभाव पडला होता. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी अंमळनेर येथील प्रताप हायस्कूल येथे शिक्षक म्हणून काही काळ नोकरी केली. प्रताप हायस्कूलच्या वसतिगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला. त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वत:च्या उदाहरणातून स्वावलंबनाचे  धडे दिले, सेवावृत्ती शिकवली. अंमळनेर येथील तत्त्वज्ञान मंदिरात त्यांनी तत्त्वज्ञानाचा अभ्यासही केला.


१९२८ साली त्यांनी ‘विद्यार्थी’ हे मासिक सुरू केले. या संदर्भात गुरुजी म्हणतात ‘शाळेत जे शिक्षण तुम्हाला घेता येत नाही, असे खरे विचारप्रवर्तक शिक्षण, मने बनविणारे, विचार दृढ करणारे शिक्षण हे मासिक तुम्हाला देणार आहे.’ शिक्षकांबद्दल ते म्हणत, ‘खरा शिक्षक तो की, ज्याच्याभोवती गुळाच्या ढेपेला ज्याप्रमाणे मुंगळे चिकटतात, तशी मुले गोळा होतात.’

त्यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता. ते स्वत: खादीचाच वापर करत असत. १९३० साली त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. ‘कॉंग्रेस’ नावाचे साप्ताहिक, दुष्काळात शेतकर्‍यांची करमाफी व्हावी म्हणून प्रयत्न, जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील कॉंग्रेस अधिवेशन यशस्वी होण्यासाठी कार्य, १९४२ च्या चळवळीत भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार, राष्ट्र सेवा दलाचे कार्य - या माध्यमातून त्यांनी राजकीय कार्य केले.  ‘पत्री’ या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहातून त्यांनी देशभक्तिपर कविता प्रसिद्ध केल्या. त्यातील ‘बलसागर भारत होवो’ सारख्या कवितांचा नागरिकांवरील वाढता प्रभाव लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने  त्या काव्यसंग्रहाच्या प्रती जप्त केल्या.

‘बलसागर भारत होवो। विश्र्वात शोभूनी राहो।।
राष्ट्रार्थ प्राण हे उरले। मी सिद्ध मराया हो ।।’

या काव्यपंक्तींनी त्या काळात प्रेरणा निर्माण केली होती. आजही ही कविता तेवढीच परिणामकारक आहे.

समाजातील जातिभेद,अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट रूढी व परंपरांना साने गुरुजींनी नेहमी विरोध केला. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी १९४६ च्या दरम्यान महाराष्ट्राचा दौरा केला, या भूमिकेला पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला. अखेर त्यांनी या मुद्यावर उपोषणाचा मार्ग अवलंबला व त्यांना यश मिळाले. ‘एका पांडुरंगाने दुसर्‍या पांडुरंगाला खर्‍या अर्थाने मुक्त केले,’ असे त्या वेळी म्हटले गेले.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते समाजवादी पक्षात सामील झाले. स्वातंत्र्यानंतर आंतरभारती चळवळीच्या माध्यमातून त्यांनी भारत जोडण्याचा प्रयत्न केला. विविध राज्यांतील लोकांनी एकमेकांची संस्कृती समजून घ्यावी, अनेक भाषा समजून घ्याव्यात असे या चळवळीत अभिप्रेत होते.ते स्वत: तामीळ, बंगाली आदी भाषा शिकले होते. १९४८ मध्ये त्यांनी ‘साधना’ साप्ताहिक सुरू केले. त्यांच्या कथा, कादंबर्‍या, लेख, निबंध, चरित्रे, कविता यांमधून त्यांच्यातील संवेदनशील साहित्यिकही आपल्याला दिसतो. मानवतावाद, सामाजिक सुधारणा व देशभक्ती ही मूल्ये त्यांच्या साहित्यात ठायी ठायी दिसतात. त्यांनी एकूण ७३ पुस्तके लिहिली. आजही त्यांच्या कविता सामाजिक कार्यकर्त्यांना प्रेरणा देतात, काही कविता शाळाशाळांतून प्रार्थना म्हणून म्हटल्या जातात. साने गुरुजींनी स्फुर्तिदायी कविता लिहिल्या, ‘श्यामची आई’ सारखी सार्वकालिक सर्वोत्कृष्ट कादंबरी लिहिली;  त्यांनी ‘स्त्री जीवन’ हा जात्यावरच्या ओव्यांचा संग्रहही लिहिला, तसेच ‘भारतीय संस्कृती’ या तत्त्वज्ञानात्मक ग्रंथाचे लेखनही केले. त्यांनी अन्य भाषांतील चांगल्या पुस्तकांचे मराठी भाषांतरही केले. त्यांनी त्यांचे बहुतांश लेखन हे तुरुंगात असतानाच केले. ‘श्यामची आई’ ही सुप्रसिद्ध कादंबरीही त्यांनी नाशिकमधील तुरुंगात असतानाच लिहिली. आचार्य विनोबा भावे-रचित ‘गीता प्रवचने’ सुद्धा विनोबजींनी (धुळे येथील तुरुंगातच) सांगितली व साने गुरुजींनी लिहिली. धुळ्यातील तुरुंगात त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल सुमारे १५ महिन्यांचा तुरुंगवास भोगला.

साने गुरुजी हे अतिशय हळव्या मनाचे व्यक्तिमत्त्व होते. विनोबाजी त्यांना यथार्थतेने अमृताचा पुत्र म्हणत. स्वातंत्र्यासाठी त्यांनी पराकोटीचा त्याग करून , मनापासून प्रयत्न केले होते. स्वतंत्र देशाची सुंदर स्वप्ने त्यांनी पाहिली होती. ती स्वप्ने साकार करण्यासाठी ते कष्टही करत होते. पण त्यांचे आदर्श विचार, त्यांच्या कल्पनेतील भारत यांच्या विपरीत अनुभव त्यांना येऊ लागले. त्यांच्या संवेदनशील मनाला हा विरोधाभास सहन झाला नाही. मनाच्या हताश अवस्थेतच त्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. म्हणूनच आचार्य अत्रे यांनी त्यांच्याबद्दल ‘मृत्यूचे चुंबन घेणारा कवी’ असे उद्गार काढले. ६० वर्षांनंतर आजही साधना हे साप्ताहिक त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून चालविले जात आहे, तसेच आंतरभारती चळवळही त्यांचे अनुयायी पुढे नेत आहेत.

लक्ष्मीकांत बेर्डे

लक्ष्या
लक्ष्मीकांत बेर्डे
लक्ष्मीकांत बेर्डे या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत दीड ते दोन दशकं अक्षरश: धूमाकुळ घातला. विनोदाचे अत्यंत अचुक टायमिंग असणारा हा अभिनेता. पण केवळ विनोदी अभिनेता असे त्यांचे वर्णन करणे त्यांच्यावरचा अन्याय ठरेल. कसदार अभिनय करणाऱयाया या अभिनेत्याकडे त्यांच्या अभिनयक्षमतेला वाव मिळू शकतील असे चित्रपट अपवादानेच मिळाले.

वास्तविक अनेक गंभीर भूमिकांमधूनही त्यांनी आपली सशक्त अभिनयक्षमता दाखवून दिली. मात्र, एकूणच त्यांच्या विनोदी भूमिकांमुळे त्यांच्यावरचा विनोदी अभिनेत्याचाच शिक्का कायम राहिला. लक्ष्मीकांतला खरा 'ब्रेक थ्रू' मिळाला तो 'टुरटुर' या नाटकाने. हे पहिलेच नाटक जबरदस्त हीट ठरले. त्यानंतर शांतेचे कार्ट चालू आहे, बिघडले स्वर्गाचे द्वार, कार्टी चालू आहे ही नाटकेही यशस्वी ठरली.

मग लक्ष्मीकांतने मागे वळून पाहिलेच नाही. नाटके करता करता त्यांनी चित्रपटात प्रवेश केला. तेथेही ते प्रचंड यशस्वी ठरले. 'लक्ष्या' या नावाने अबालवृद्धांमध्ये त्याची लोकप्रिय पसरली. त्यांची जोडी जमली ती महेश कोठारे यांच्यासमवेत. कोठारेंचा चित्रपट अन लक्ष्या नाही असे सहसा घडलेच नाही.

कारण कोठारे व बेर्डे म्हणजे व्यावसायिक यशाची हमखास खात्री अशी ओळख निर्माण झाली होती. त्याचबरोबर या दोघांचा चित्रपट म्हणजे मनोरंजनाची शंभर टक्के हमी हे समीकरणही रूढ झाले होते. धुमधडाका, धडाकेबाज, थरथराट ते आताच्या 'झपाटलेला'पर्यंत ते कायम होते. सचिनबरोबरही 'बनवाबनवी'सह अनेक चित्रपट केले.

त्यांना अभिनयाची नैसर्गिक देणगी मिळाली होती. विनोदाचे त्यांचे टायमिंग अचुक होते. प्रेक्षकांच्या समोर आल्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन टाकण्याची त्यांची शैली अनोखी होती. त्यांच्या लोकप्रियतेला 'कॅश' करण्यासाठी 'चल रे लक्ष्या' मुंबईला सारखा चित्रपटही निघाला. शिवाय अनेक चित्रपट त्यांना समोर ठेवून काढण्यात आले.

त्यात अनेक पडेल चित्रपटही होते. अशोक सराफ व लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जोडीने याच काळात धुमाकूळ घातला. वास्तविक या दोन्ही कलाकारांचे ट्युनिंग अतिशय चांगले जमले होते. मात्र, त्याचा चांगला उपयोग फार कमी दिग्दर्शकांना करता आला. त्यांच्या चित्रपटांनी मराठी मनांचे मनोरंजन करीत अनेकांना आयूष्यातील तणाव, दुःख विसरायला लावून आनंदाचे कारंजे फूलविले.

मराठीत प्रसिध्दीच्या लाटेवर स्वार असतांनाच त्यांना हिंदी‍त चांगल्या निर्मिती संस्थांच्या ऑफर्स आल्या. राजश्री प्रॉडक्शनचा मैने प्यार किया हा त्यातीलच एक. यात लक्ष्मीकांतने सलमान खानच्या मित्राची भूमिका अगदी छान निभावली. याशिवाय अनेक हिंदी चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या. पण अभिनयाचा कस लागेल अशी भूमिका त्यांनी हिंदीत क्वचितच मिळाली.

मराठीत अशा भूमिका त्यांना मिळाल्या, पण त्याही अगदी थोड्याच. ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेल्या 'एक होता विदुषक' या गंभीर नाटकातील भूमिकेने कलक्ष्मीकांतच्या अभिनयक्षमतेवर शिक्कामोर्तब झाले. पण तशा भूमिका त्यांना फार काही मिळाल्या नाहीत.

अगदी अलीकडच्या काळात त्यांनी पुन्हा रंगभूमीवर लेले विरूद्ध लेले आणि सर आले धावून या नाटकाद्वारे बऱयाच वर्षांनी पाऊल ठेवले. पण ही नाटके फार चालली नाहीत. अनेक दूरचित्रवाणी मालिकांमधूनही त्यांनी एक काळ गाजवला.

असा हा हरहुन्नरी कलाकार चाहत्यांना शेवटपर्यंत हसवत राहिला. पण किडनीच्या आजाराची माहिती इतरांना न देता हलक्या पावलांनी १६ डिसेंबर २००४ रोजी या जगातून निघून गेला.


लक्ष्मीकांत बेर्डे यांचे चित्रपट
धडाकेबाज
दे दणादण
झपाटलेला
हमाल दे धमाल
अशी ही बनवाबनवी
चल रे लक्षा मुंबईला
हसली ती फसली
थरथराट
साजन
बेटा
मैने प्यार किया
हम आपके है कौन

रंगभूमी कारकीर्द-
एक होता विदूषक
लेले विरूध्द लेले
कार्टी प्रेमात पडली
बिघडले स्वर्गाचे दार
शांतेच कार्ट चालू आहे

अहिल्याबाई होळकर

अहिल्याबाई होळकर / Ahilyabai Holkar

अहिल्यादेवींचा जन्म मे ३१ इ.स. १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेड्यात झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते व धनगर होते. त्याकाळी स्त्रीशिक्षण फारसे प्रचलित नसतानाही तिच्या वडिलांनी त्यांना लिहिण्यावाचण्यास शिकवले होते. बाजीराव पेशव्यांचे एक सरदार मल्हारराव होळकर व माळवा प्रांताचे जहागीरदार होते. ते पुण्यास जाताना चौंडीस थांबले होते. आख्यायिकेनुसार, ८ वर्षाच्या अहिल्यादेवींना, मल्हाररावांनी एका देवळात बघितले. मुलगी आवडल्यामुळे त्यांनी तिला, स्वतःचा मुलगा खंडेराव याची वधू म्हणून आणले.



त्या मराठा साम्राज्याच्या माळवा प्रांताचा कारभार बगत होत्या. मल्हारराव होळकरांच्या त्या सून होत. मुलाच्या मृत्यूनंतर मल्हाररावांनी त्यांना सती जाऊ दिले नाही. त्यांच्या स्मरणार्थ, इंदूर विद्यापीठास त्यांचे नाव दिलेले आहे.
एका इंग्रजी लेखकाने अहिल्यादेवी होळकर, यांना भारताच्या "कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ, मार्गारेट" म्हटले आहे.  (इ.स. १७२५ - इ.स. १७९५, राज्यकालावधी इ.स. १७६७ - इ.स. १७९५) ही भारतातील, माळव्याच्या जहागीरदार असलेल्या होळकर घराण्याच्या 'तत्त्वज्ञानी राणी' म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी नर्मदातीरी, इंदूरच्या दक्षिणेससलेल्या महेश्वर या ठिकाणी आपली राजधानी हलविली.
अहिल्यादेवींचे पती खंडेराव होळकर यांचे इ.स. १७५४ मध्ये, कुम्हेरच्या लढाईत धारातीर्थी पडले. १२ वर्षांनंतर, त्यांचे सासरे मल्हारराव होळकर हेही मृत्यू पावले. त्यानंतर अहिल्याबाईंनी आपल्या राज्याला तुंगांपासून?? वाचवले. त्या लढाईत अहिल्यादेवी स्वतः सैन्याचे नेतृत्व करीत होत्या. पुढे त्यांनी तुकोजीराव होळकर यांची सेनापती म्हणून नेमणूक केली. अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या.
राणी अहिल्यादेवी यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले, किंवा त्यांचा जीर्णोद्धार केला, .आणि महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यांत द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. वेरावळ येथील सोमनाथचे गझनीच्या महंमदाने ध्वस्त केलेले देऊळ बघून अहिल्यादेवींनी शेजारीच एक शंकराचे एक देऊळ बांधले. सोमनाथला जाणारे लोक या देवळालाही भेट देतात.मल्हाररावांनी तिला प्रशासकीय व सैन्याच्या कामात तिला पारंगत केलेले होते. त्या आधाराने अहिल्याबाईंनीने इ.स. १७६६ ते इ.स. १७९५, म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत माळव्यावर राज्य केले. इ.स. १७६५ मध्ये सत्तेसाठी झालेल्या एका लढाईदरम्यान लिहिलेल्या एका पत्रावरून मल्हाररावांचा अहिल्याबाईंच्या कर्तृत्वावर किती विश्वास होता हे दिसून येते.
"चंबळ पार करून ग्वाल्हेर येथे जावा. तेथे तुम्ही ४-५ दिवस मुकाम करू शकता.तुम्ही मोठे सैन्य ठेवू शकता व त्यांचे शस्त्रांसाठी योग्य तजवीज करा.....कूच करतांना,मार्गावर तुम्ही सुरक्षेसाठी चौक्या लावा."
पूर्वीच शासक म्हणून तरबेज झाल्यामुळे, मल्हारराव व मुलाच्या मृत्यूनंतर, अहिल्याबाईंनी स्वतःलाच राज्यकारभार पाहू देण्याची अनुज्ञा द्यावी अशी पेशव्यांना विनंती केली. त्यांनी शासन करण्यास माळव्यात अनेकांचा विरोध होता, पण होळकरांचे सैन्य अहिल्याबाईंच्या नेतृत्वाखाली काम करण्यास उत्सुक होते. अहिल्याबाई सैनिकी कवायतीत हत्तीच्या हौद्याच्या कोपऱ्यात चार धनुष्य आणि बाणांचे भाते ठेवत असत,असे म्हणतात.
पेशव्यांनी परवानगी दिल्यावर, ज्या माणसाने तिला विरोध केला होती त्यास चाकरीत घेऊन, तुकोजीराव होळकर (मल्हाररावांचा दत्तक पुत्र) यास सैन्याचा मुख्य करून, अहिल्यादेवी होळकरांनी पूर्ण दिमाखात माळव्यास प्रयाण केले. अहिल्याबाईंनी पडदा प्रथा कधीच पाळली नाही. त्या रोज जनतेचा दरबार भरवीत असत व लोकांची गाऱ्हाणी ऐकण्यास नेहमीच उपलब्ध असत. जरी राज्याची राजधानी ही नर्मदातीरावर असलेल्या महेश्वर येथे होती तरीही, इंदूर या खेड्याचा विकास करून त्याचे सुंदर मोठ्या शहरात रूपांतर करणे, हे अहिल्याबाईंनी केलेले फार मोठे काम होते. त्यांनी माळव्यात रस्ते व किल्ले बांधले, अनेक उत्सव भरवले, हिंदूमंदिरांमध्ये कायमस्वरूपी पूजा सुरू रहावी म्हणून अनेक दाने दिली., माळव्याबाहेरही त्यांनी मंदिरे, घाट, विहिरी, तलाव व धर्मशाळा बांधल्या.
भारतीय संस्कृती कोशात अहिल्याबाई होळकरांनी केलेल्या बांधकामांची यादी आहे-काशी, गया, सोमनाथ,अयोध्या, मथुरा, हरिद्वार, कांची, अवंती, द्वारका, बद्रीकेदार, रामेश्वर व जगन्नाथपुरी वगैरे. अहिल्यादेवींस, सावकार, व्यापारी, शेतकरी इत्यादी आर्थिकदृष्ट्या सुदृढ झालेले बघून आनंद होत असे. परंतु त्यांनी त्यांच्यावर आपला अधिकार असल्याचे कधीच जाणवू दिले नाही. त्यांनी सर्व राज्यकारभार हा सुखी व धनाढ्य लोकांकडून नियमांतर्गत मिळालेल्या धनापासून चालविला होता, असे दिसते.
अहिल्याबाईंनी जनतेच्या/रयतेच्या काळजीपोटी अनेक गोष्टी प्केल्या. त्यांनी अनेक विधवांना पतीची मिळकत त्यांच्यापाशीच ठेवण्यात मदत केली. अहिल्याबाईच्या राज्यात कोणीही विधवा मुलाला दत्तक घेऊ शकत असे. एकदा त्यांच्या एका मंत्र्याने लाच घेतल्याशिवाय दत्तक घेण्याच्या मंजुरीस नकार दिला, तेव्हा अहिल्याबाईंनी दत्तकविधानाचा कार्यक्रम स्वतः प्रायोजित करून, रीतसर कपडे व दागिन्यांचा आहेर दिला. अहिल्यादेवी होळकरांच्या स्मृतीस अभिवादन म्हणून, सन १९९६ मध्ये, इंदुरातील नागरिकांनी तिच्या नावाने एक पुरस्कार सुरू केला. तो, दरवर्षी, जनसेवेचे विशेष काम करणाऱ्यास दिला जातो. भारताच्या पंतप्रधानांनी पहिल्या वर्षी तो पुरस्कार नानाजी देशमुखांना दिला.
भिल्ल व गोंड या राज्याच्या सीमेवर असलेल्या जमातींमधील वाद अहिल्यादेवी सोडवू शकल्या नाहीत. तरीही, त्यांनी त्या लोकांना पहाडातील निरुपयोगी जमीन दिली आणि त्यांना, त्या क्षेत्रातून जाणाऱ्या सामानावर थोडा 'कर' घेण्याचा अधिकार दिला. याही बाबतीत, (आंग्ल लेखक) 'माल्कम' यांच्यानुसार, अहिल्याबाईंनी 'त्यांच्या सवयींवर लक्ष ठेवले'.
महेश्वर येथील अहिल्यादेवींची राजधानी ही जणू काव्य, संगीत, कला व उद्योग यांची संस्थाच होती. महाराष्ट्रातील प्रसिद्ध मराठी कवी मोरोपंत व शाहीर अनंतफंदी यांना व संस्कृत विद्वान खुशालीराम यांना अहिल्याबाईंनी आश्रय दिला. कारागीर, मूर्तिकार व कलाकारांना त्यांच्या राजधानीत सन्मान व वेतन मिळत असे. त्यांनी महेश्वर शहरात एक कपड्याची गिरणीपण सुरू केली.
एकोणीसाव्या व विसाव्या शतकातील, भारतीय, इंग्रजी व अमेरिकन इतिहासकार हे मान्य करतात की, अहिल्यादेवी होळकरांस, माळवा व महाराष्ट्रात, त्या काळी व आताही, संताचा सन्मान दिला जातो. इतिहासाच्या कोणाही अभ्यासकास ते मत खोडून काढण्याजोगे आजवर काहीही सापडलेले नाही.
अहिल्याबाई होळकर ह्या एक खरोखरीच विस्तृत राजकीय दृश्यपटलाच्या एक सूक्ष्म अवलोकनकर्त्या होत्या. सन १७७२ मध्ये पेशव्यांना लिहिलेल्या एका पत्रात त्यांनी ब्रिटिशांबरोबर हात मिळवणी करण्याबाबत एक ताकीद दिली होती. त्यांना कवटाळणे हे अस्वलास कवटाळण्याजोगे असल्याचे तिने नोंदले:" वाघासारखे इतर प्राणी हे शक्ती वा युक्तीने मारले जाऊ शकतात, परंतु अस्वल मारणे हे फारच कठीण असते. सरळ त्याच्या चेहऱ्यावर वार केल्यासच ते मरते. एकदा त्याच्या मजबूत पकडीत सापडल्यावर ते त्याच्या शिकारीस, गुदगुल्या करून ठार मारते. असाच इंग्रजांचा मार्ग आहे. हे बघता त्यांच्यावर मात करणे कठीण आहे.
"या इंदूरमधील शास्कांनी, त्यांच्या अखत्यारीत असलेल्या सर्वांस चांगले काम करण्यास प्रोत्साहन दिले. व्यापाऱ्यांनी चांगल्या कपड्यांचे उत्पादन केले, व्यापार वाढला, शेतकरी हे शांततेत व दबावरहित होते. कोणतेही प्रकरण राणीच्या निदर्शनास आले की ते कडकपणे हाताळले जाई. अहिल्याबाईंना आपल्या प्रजेचा उत्कर्ष आवडत असे. तसेच ती प्रजा राजा हिसकावून घेईल म्हणून आपली संपत्ती उघड करण्यास घाबरत नाही, हे बघणे आवडत असे. दूरदूरपर्यंत, रस्त्यांच्या कडेला, दाट छायादार वृक्ष लावण्यात आले होते, विहिरी केल्या होत्या, पथिकांसाठी विश्रांतीगृहे. गरीब,घर नसलेले व अनाथ या सर्वांना त्यांच्या जरुरीनुसार, सर्व मिळत होते. बहुत काळापासून, भिल्ल समाज पहाडातून सामानाची नेआण करत असतांना लुटमार करीत असे. त्यांना त्यातून मुक्ती मिळाली व त्यांना प्रामाणिकपणे शेती करण्याची संधी देण्यात आली. सर्व समाजाला अहिल्याबाई आवडत असत आणि तो त्यांच्या उदंड आयुष्याची प्रार्थना करत. त्यांच्या कन्येने तिचा पती, यशवंतराव फानसे यांच्या मृत्यूनंतर सती जाणे हे त्यांच्या आयुष्यातले शेवटचे सर्वात मोठे दुःख होते. वयाच्या ७०व्या वर्षी अहिल्याबाई होळकरांची प्राणज्योत निमाली. त्यांची स्मृती अद्यापही टिकून आहे.
भारत स्वतंत्र झाल्यावरही अनेक वर्षे शेजारील भोपाळ, जबलपूर किंवा ग्वाल्हेर या शहरांपेक्षा इंदूर सर्व बाबतीत प्रगतीशील राहिले. याच्या मागे अहिल्याबाईंची दूरदृष्टी होती.

अहिल्याबाई होळकर यांचे टपाल तिकिट
अहिल्याबाईंच्या सन्मान व स्मृतिप्रीत्यर्थ भारत सरकारने ऑगस्ट २५ , इ.स. १९९६ या दिवशी एक डाक तिकिट जारी केले.
या अशा शासनकर्तीस मानवंदना म्हणून इंदूरच्या विमानतळाचे नाव "देवी अहिल्याबाई विमानतळ" असे ठेवण्यात आले आहे, आणि इंदूर विद्यापीठास "देवी अहिल्या विश्वविद्यालय" असे नाव देण्यात आले आहे".

आनंदऋषी महाराज

प.पु राष्ट्रसंत आचार्य श्री आनंदऋषीजी महाराज / Anand Rishiji Maharaj

प.पु राष्ट्रसंत आचार्य श्री आनंदऋषीजी महाराज 


जैन धर्मियांचे आचार्य श्री आनंदऋषीजी महाराजांचा  जन्म श्रावण शुक्ल प्रतिपद २७ जुलै १९०० साली आपल्या महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यामधील चिचोंडी या गावी झाला. त्यांचे नाव नेमीचंद होते. त्यांच्या वडिलांचे नाव देवीचंदजी गुगळे आणि आईचे नाव हुलसाबाई.  मोठ्या भावाचे नाव उत्तमचंदजी  होते. आनंदऋषीजी लहानपणासुनच पवित्र होते, त्यांचे गुरू रत्न ऋषीजी महाराज यांच्या कडून त्यांना लहानपनापासुनच आध्यात्मिक मार्गदर्शन मिळाले.
आनंदऋषीजीनी वयाच्या १३व्या वर्षी त्यांचे सर्व आयुष्य जैन संत म्हणून व्यथित करण्याचे ठरविले. त्यांनी ७ डिसेंबर १९१३ साली(मार्गशिस शुक्ल नवमी) अहमदनगर जिल्हातील मिरी या गावी दिक्षा घेतली, त्यावेळी त्यांना आनंदऋषीजी महाराज हे नाव देण्यात आले.
आनंदऋषीजीनी पंडित राजधरी त्रिपाठी यांच्याकडून संस्कृत आणि प्राकृत शिक्षणास सुरुवात केली. त्यांनी १९२० साली अहमदनगर येथे पहिले प्रवचन दिले.
आनंदऋषीजीनी पुढे रत्नऋषीजी सोबत जैन धर्माच्या प्रसार व प्रसाराचे कार्य सुरु केले. जैन धर्मानुसार साधु किंवा साध्वी यांनी एका जागेवर न थांबता (आजारपण, वृध्तत्व वगळता) विहार करत राहिले पाहिजे. चातुर्मासात संत गृहस्ताच्या विंनतीवरुन एका ठिकाणी वास्तव्य करु शकतात.
रत्नऋषीजी महाराज यांच्या १९२७ साली अलीपुर येथील (संथारा) मॄत्युनंतर आनंदऋषीजीनी त्यांच्या गुरुशिवाय हिंगणघाट येथे पहिला चार्तमास केला. १९३१ साली आनंदऋषीजी यांच्या बरोबर झालेल्या धार्मिक चर्चेनंतर जैन धर्म दिवाकर महाराज यांना आनंदऋषीजीची आचार्य होण्याची क्षमता जाणवली.
आचार्य आनंदऋषीजींनी २५ नोव्हेबर १९३६ साली श्री. तिलोक रत्न स्थानकवासी जैन धार्मिक परिक्षा बोर्डची स्थापना केली.
१९५२ साली राजस्थान मध्ये सादडी येथे झालेल्या साधु संमेलन मध्ये त्यांना जैन श्रीमान संघाचा प्रधान म्हणुन घोषीत करण्यात आले. १३ मे १९६४ साली (फाल्गुन शुक्ल एकादशी) आनंदऋषीजी श्रीमान संघाचे दुसरे आचार्य झाले, याचा समारोह राजस्थान येथील अजमेर येथे झाला.
आनंदऋषीजी १९७४ साली त्यांचा मुंबई येथील चार्तमास पुर्ण करुन पुण्याला आले. पुण्यात शनिवार वाडा येथे त्यांचे भव्य स्वागत समारंभ करण्यात आला. १३ फेब्रुवारी १९७५ साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव नाईक यांनी त्यांना राष्ट्र संत म्हणुन गैरविले. त्याच वर्षी आनंद फाऊंनडेशनची स्थापना झाली हे त्यांचे ७५व्या वाढदिवसाचे वर्ष होते.
आनंदऋषीजींनी २८ मार्च १९९२ साली अहमदनगर येथे त्यांचा मॄत्यु झाला. अहमदनगर येथील आनंदऋषीजी हॉस्पिट्ल हे त्यांच्या स्मरणार्थ बांधण्यात  आहे.

अण्णा हजारे

पद्मश्री ,पद्मभूषण, लोकनायक किसन बाबूराव हजारे ऊर्फ अण्णा हजारे / Anna Hajare

किसन बाबूराव हजारे ऊर्फ अण्णा हजारे (जून १५, इ.स. १९३७:भिंगार, अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र - हयात). मूळचे सैन्यात वाहनचालक असणारे . किसन बाबुराव तथा अण्णा हजारे हे भारतातील एक ज्येष्ठ महाराष्ट्रीय समाजसेवक आहेत. १९९० साली त्यांना त्यांच्या समाज सेवेच्या कार्याबद्दल भारत सरकारने पद्मश्री आणि १९९२ साली पद्मभूषण या पुरस्कारांनी सन्मानित केले. त्यांनी ग्रामस्थांच्या सहकार चळवळीद्वारे राळेगण सिद्धी या गावाचा कायापालट घडवून आणला आहे. स्वच्छता, पाणी व्यवस्थापन व सामाजिक सलोखा यावर त्यांनी भर दिला होता. या कामाबद्दल गावाला अनेक पारितोषिके मिळाली आहेत. या नंतर अण्णा हजारे यांनी माहितीच्या अधिकारासाठी आंदोलन केले. माहितीच्या अधिकारावर त्यांनी पुस्तकाचे लेखनही केले आहे. या आंदोलनामुळे सरकारला माहितीचा अधिकार सर्वसामान्यांना देण्याचा कायदा लवकर संमत करावा लागला. अण्णा हजारे यांनी वेळोवेळी भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलने करून जनजागृतीची कामे केली आहेत. त्यांच्या आंदोलनांमुळे महाराष्ट्राच्या अनेक मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले आहेत.


किसन हजारेंचा जन्म जून १५, इ.स. १९३७ रोजी भारताच्या मुंबई इलाख्यातील भिंगार मधील खोमणे वाड्यात झाला. हे गाव आता महाराष्ट्र राज्याच्या अहमदनगर जिल्ह्यात आहे. हजारेंचे वडील बाबूराव हजारे तेथील आयुर्वेद आश्रम औषधशाळेत मजूर होते. बाबूरावांचे वडील ब्रिटिश फौजेत सैनिक होते. १९४५मध्ये आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर बाबूरावांनी सुरुवातीला भिंगारमध्येच बस्तान बसवले, पण नंतर १९५२ साली ते राळेगण सिद्धी या आपल्या मूळ गावी परतले. किसनयांना सहा लहान भावंडे होती व कुटुंबाची परिस्थिती हलाखीची होती. त्याच्या आत्याने किसनची देखभाल करण्याचे ठरवले व शिक्षणासाठी त्या त्याला मुंबईला घेऊन गेल्या. सातवीपर्यंत शिकल्यावर घरात मदत व्हावी म्हणून किसनने शिक्षण सोडून नोकरी शोधण्यास सुरुवात केली. त्यासाठी सुरुवातीस दादरजवळ फुले विकली व नंतर स्वतःचेच दुकान थाटले व आपल्या दोन भावांना राळेगण सिद्धीहून बोलावले.
इ.स. १९६२च्या सुमारास चीनने भारतावर आक्रमण केलेले असताना भारतीय सैन्याने धडाक्यात भरती सुरू केली होती. त्यावेळ २५ वर्षांचे असलेले हजारे लष्कराच्या किमान शारीरिक क्षमतेस पात्र नव्हते, पण कोणत्याही परिस्थितीत नवीन जवान भरती करणे आवश्यक असल्याने लष्कराने त्यांना भरती करून घेतले. औरंगाबाद येथे सुरुवातीचे प्रशिक्षण घेतल्यावर १९६३मध्ये त्यांना वाहनचालकाचे पद दिले गेले.
त्यानंतर दोन वर्षातच पाकिस्तानने भारतावर चाल केली. त्यावेळी हजारेंचा मुक्काम पंजाबमधील खेमकरण क्षेत्रात होता. नोव्हेंबर १२, इ.स. १९६५ रोज पाकिस्तानी वायुसेनेने भारतीय ठाण्यांवर हल्ले सुरू केले. हजारे त्यावेळी इतर वाहनांसह आपले वाहन चालवीत होते. या हल्ल्यात त्या तांड्यातील ते स्वतः सोडून एकूणएक जवान शहीद झाले. हे पाहून विषण्ण झालेल्या हजारेंनी जगण्यातील अर्थ शोधण्यास सुरुवात केली. आपल्या प्रवासात नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील एका दुकानात त्यांच्या हाती राष्ट्रनिर्मितीसाठी युवा पिढीला आवाहन हे स्वामी विवेकानंद यांनी लिहिलेले पुस्तक पडले. हे वाचताना त्यांना गमले की अनेक संतांनी इतरांच्या सुखासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग केलेला आहे. आपण आपले उरलेले आयुष्य गरीबांची दुःखे दूर करण्यात घालवावे असे त्यांना वाटू लागले. यानंतर फावल्या वेळात त्यांनी महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद आणि विनोबा भावे यांचे साहित्य वाचण्यास सुरुवात केली. यानंतर काही वर्षांनी १९७०च्या दशकात त्यांची मृत्यूशी पुन्हा एकदा जवळून गाठ पडली. वाहन चालवीत असताना भीषण अपघातातून ते बचावले. या क्षणी त्यांना वाटले की आपल्या उरलेल्या आयुष्याचा सदुपयोग करण्यासाठी जणू काही दैवच त्यांना इशारे देत आहे. वयाच्या ३८व्या वर्षी किसन हजारेंनी आपले उरलेले आयुष्य इतरांच्या सेवेसाठी वेचण्याचा संकल्प सोडला. १९७८मध्ये त्यांनी भारतीय लष्कराचा राजीनामा दिला.
लष्कर सोडल्यावर हजारे राळेगण सिद्धी या आपल्या मूळ गावी परतले हे गाव मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यात आहे. जवळजवळ कायमच्या दुष्काळी प्रदेशात असलेल्या या दुर्लक्षित गावात त्यावेळी गरिबी आणि निराशेचा सुकाळ होता. हजारेंनी ग्रामस्थांसह अनेक दशके अथक प्रयत्न करून गावाचा कायापालट केला. आर्थिक आणि सामाजिक अशा दोन्ही आघाड्यांवर त्यांनी गावातील परिस्थिती सुधारली. तंत्रज्ञान किंवा औद्योगिकीकरणाचा आधार न घेता केवळ अतोनात कष्ट आणि सहकार यांवर त्यानी गावातील गरिबी दूर करण्यात यश मिळवले.


आंदोलने आणि चळवळी

अण्णा हजारेंनी भ्रष्टाचाराचा निपटारा करण्याकरिता वेळोवेळी आंदोलने केली व प्रसंगी कारावासही स्वीकारला. १९८० पासून आतापर्यंत अण्णा हजारे यांनी १६ उपोषणे केली आहेत. प्रत्येक वेळी सरकारला त्यांच्यासमोर नमते घ्यावे लागले.त्यांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या.अण्णाची १६ पैकी १३ उपोषणे ही महाराष्ट्र सरकारच्या विरोधातील तर ३ उपोषणे केंद्र सरकारच्या विरोधात करण्यात आली आहेत.
यांतील १५वे आणि १६वे उपोषण हे जनलोकपाल विधेयकासाठीचे होते. अण्णांनी एकूण आतापर्यंत ११६ दिवसापेक्षा जास्त काळ उपोषण केले आहे. अण्णाच्या या उपोषणांमुळे आणि आंदोलनामुळे महाराष्ट्र सरकारला ४५० अधिकाऱ्यांवर कारवाई करावी लागली तर ६ मंत्र्यांना आपले पद गमवावे लागले आहे.
अण्णांनी पहिले आंदोलन १९७९ मध्ये केले. शासकीय यंत्रणेकडून हेळसांड होऊन गावास वेठीस धरणार्‍या प्रशासनाविरुद्ध गावातील शाळेला मान्यता मिळण्यासाठी, या आंदोलनादरम्यान अहमदनगर जिल्हा परिषदेसमोर अण्णांनी १९८० साली पहिले यशस्वी उपोषण केले. अण्णांच्या उपोषणाने एका दिवसातच सरकारी यंत्रणेला झुकविले. अण्णांची मागणी मान्य झाली. अण्णांच्या सक्रिय सामजिक चळवळीच्या जीवनातला हा पहिला प्रसंग होता. सत्याग्रहाच्या आणि अहिंसेच्या मार्गाच्या लढ्याने अण्णांना पहिल्यांदाच मोठे यश मिळविता आले होते. उपोषण केले, प्रशासन झुकले आणि शाळेला मान्यता मिळाली. 'नापासांची शाळा' म्हणून ही शाळा प्रसिद्ध आहे.
महाराष्ट्र सरकारतर्फे राबविल्या जाणाऱ्या वीस कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी होण्याकरिता राळेगण सिद्धी येथील संत यादवबाबा मंदिरात अण्णांचे दुसरे यशस्वी उपोषण ७ -८ जून १९८३ साली झाले. ग्राम विकास योजना अंमलात आणत असताना सरकारी अधिकाऱ्यांची टाळाटाळ आणि निवडणूक यांच्या विरोधातील हे आंदोलनही यशस्वी झाले. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. ग्राम विकास योजनांच्या मंजुरीबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी लिखित आश्वासन दिले.उपोषण केले. याचा परिणाम म्हणून ग्रामविकासात सरकारचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढला.
अण्णांनी तिसरे उपोषण २० ते २४ फेब्रुवारी १९८९ या काळात केले होते. हे उपोषण शेतकर्‍यांकरिता होते. गावाला पाणी पुरवठा करण्याचे धोरण व व ठिबक सिंचन अनुदान धोरण यांत फार त्रुटी होत्या. त्या त्रुटी दूर करण्यासाठी हे उपोषण होते. सरकार पुन्हा झुकले ४ कोटी रुपये मान्य करत सिंचन योजनांना मंजुरी देण्यात आली.
चौथे आंदोलन अण्णांना पुढील ९ महिन्यातच पुन्हा पुकारावे लागले. शेतकर्‍यांना सिंचनासाठी वीज पुरवठा मिळवून देण्यासाठीच्या प्रश्नासाठी २० ते २८ नोव्हेबर या दरम्यान १९८९ मध्ये ते पुकारण्यात आले होते. हे उपोषण ९ दिवस चालले. अखेरीस सरकारवर दबाव वाढला. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांनी लिखित आश्वासन दिले. वीज पुरवठ्यासाठी २५० केव्हीच्या लाईन आणि इतर सुविधांसाठी ५ कोटी रुपये मंजूर झाले. दरम्यानच्या काळात अण्णांच्या कामाला राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळू लागली होती.
पाचवे उपोषण : सन १९९४ साली अण्णांनी वन विभागातील योजनामधील भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन करण्याच्या निर्णय घेतला. सरकारशी अनेक वेळा संपर्क करुनही सरकारकडून कोणतही उत्तर मिळत नव्हते. अण्णाचे हे भ्रष्टाचाराविरोधातील पहिले उपोषण. महाराष्ट्र दिनी म्हणजे १ मे रोजी या उपोषणाला सुरवात झाली.हे उपोषण ६ दिवस चालले. १४ भ्रष्ट अधिकाऱ्यांपैकी ४ अधिकाऱ्यांना सरकारने निलंबित केले. दहा अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करू असे आश्वासन मिळाले.
पुढील ६ वे उपोषण अण्णांनी १९९६ साली केले. त्यातही त्यांना यश आले. राज्यातील शिवसेना-भाजपा युती-सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधात ते करण्यात आले. २० नोव्हेंबर १९९६ रोजी त्यांनी उपोषणाला सुरुवात केली होती. मंत्र्याविरोधातील आरोप असल्याने लढाई मोठी होती. त्यामुळे उपोषणाचा कालावधीही वाढणार होता. उपोषण १२ दिवस चालले. आतापर्यंतचे अण्णाचे हे सर्वात मोठे उपोषण होते. ३ डिसेंबर १९९६ ला युतीच्या दोन मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले. जलसंधारण मंत्री होते महादेव शिवणकर आणि पाणी पुरवठामंत्री शशिकांत सुतार.
अण्णांनी १९९७ सालीसुद्धा उपोषण केले.यावेळीही युती सरकारमधील भ्रष्टाचाराचाच मुद्दा होता. अण्णांच्या निशाण्यावर होते यावेळी युती सरकारमधील समाज कल्याणमंत्री बबनराव घोलप. उपोषण १० दिवस चालले. घोलपाना राजीनामा द्यावा लागला तर १८ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले.
अण्णानी थेट मंत्र्यांविरोधात सुरू केलेली लढाई साहजिकच अडचणींना आमंत्रण देणारी होती. घोलप न्यायालयात गेले होते. न्यायालयात अण्णा घोलपावरील आरोप सिद्ध करू शकले नाहीत आणि अब्रुनुकसानीच्या आरोपाखाली अण्णांना मॅजिस्ट्रेट कोर्टाने तीन महिन्यांची साधी कैद दिली होती. याच्याही विरोधात अण्णांनी ९ ते १८ आगस्ट १९९९ दरम्यान १० दिवसाचे उपोषण केले. त्याच वेळी पाच हजार रुपयांच्या बाँडवर सोडून देण्याची अटही कोर्टाने घातली होती. ती सवलत नाकारून हजारे यांनी तुरुंगात जाणे पसंत केले होते. मात्र नंतर राज्य सरकारने त्यांना स्वत:च्या अधिकारात तुरुंगातून मुक्त केले. पुढे अपिलात सेशन्स कोर्टाने अण्णांना निर्दोष ठरवले.
१९९९ साली झालेल्या विधासभेच्या निवडणुकांमधे शिवसेना-भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला, आणि बबनराव घोलप पुन्हा मंत्री होऊ शकले नाहीत.
सन २००३ - ९ दिवसाचे उपोषण राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी कॉग्रेस या आघाडीचे सरकार होते. हे उपोषण माहितीच्या अधिकारासाठी होते. ९ ओगस्ट या क्रांतिदिनाच्या दिवशी या आंदोलनाला सुरुवात झाली. सरकारने माहितीचा अधिकार दिला. अण्णांचे उपोषण यशस्वी झाले.
माहितीचा अधिकार तर कायद्याने मिळाला मात्र तो अधिकाऱ्यांच्या लालफितीत अडकला. सरकारी अधिकारी अडवणूक करू लागले. अण्णांनी पुन्हा उपोषणाचं अस्त्र उगारले. १० वे उपोषण! मागण्या होत्या माहिती अधिकाराची योग्य अमलबजावणी करणे. दफ्तर दिरंगाईला लगाम लावणे आणि बदलीचा कायदा आणणे. ९ फेब्रुवारी २००४ साली सुरू झालेले हे उपोषण ९ दिवस चालले. सरकारने अण्णाच्या मागण्या मान्य केल्या, बदल्यांचा आणि दफ्तर दिरंगाईचा कायदा आला .
अण्णांचं ११ वे उपोषण १० व्या उपोषणाच्या पुढचे पाऊल होते. माहिती अधिकाराच्या माध्यमातून अण्णांना समाजात जागरूकता आणायची होती. केंद्र सरकारने माहिती अधिकाराच्या कायद्यात सुधारणा करण्याचा घाट घातला होता. त्यामुळे महिती अधिकाराचा कायदा कमकुवत होणार होता अण्णांनी आळंदीला ९ ओगस्ट रोजी उपोषणाला सुरुवात, अण्णांना माहिती अधिकार कायद्यातल्या सुधारणा मान्य नव्हत्या. ११ दिवस हे उपोषण चालले. सरकारने मागणी मान्य केली. अण्णांच्या उपोषणाला मिळालेले हे ११ वे यश.
साल २००६ मध्ये राळेगणसिद्धी इथे अण्णांच्या १२ व्या उपोषणाला सुरुवात झाली, हे उपोषण माजी न्यायमूर्ती पी बी सावंत आयोगाने दिलेल्या अहवालाच्या अंमलबजावणीसाठी होते. त्यात दोषी ठरवलेल्या मंत्र्यावर सरकारने कारवाई करावी या मागणीसाठी होते. पी बी सावंतानी अण्णांसह ३ मंत्र्यांना दोषी ठरवले होते, मात्र सरकारतर्फे या मंत्र्यांविरोधात कोणतीही कारवाई होत नव्हती. सुरेश जैन, पद्मसिंह पाटील आणि नवाब मालिक यांना मंत्रीपदे गमवावी लागली होती, मात्र या मंत्र्यांवर न्यायालयीन कारवाई मात्र होत नव्हती. सरकारने अण्णांना कारवाईचे आश्वासन दिले. अण्णांनी उपोषण मागे घेतले.
हजारे यांनी माजी मंत्री सुरेश जैन यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे त्यांच्याविरुद्ध जैन यांनी बदनामीचा खटला भरला होता. हजारे यांनीसुद्धा जैन यांनी केलेल्या आरोपांची दखल घेऊन त्यांच्यावर बदनामीचा खटला भरला, ही दोन्हीही प्रकरणे अनिर्णीत आहेत.
अण्णाच्या १२ व्या उपोषणाने भ्रष्ट मंत्र्यावर कारवाईचे आश्वासन तर मिळाले, मात्र त्यानंतर अण्णांना जीवे मारण्यासाठी ३० लाखांची सुपारी देण्यात आली. ही सुपारी खासदार पद्मसिंह पाटील यांनी दिली असा अण्णांचे म्हणणे होते. पद्मसिंह पाटलांवर कारवाई होत नव्हती. अखेरीस सरकारने गुन्हा नोंदवला, पद्मसिंह पाटलांना कैदेत जावे लागले. अण्णांच्या सत्याग्रहाला, उपोषणाला मिळालेले १३ वे यश होते.
साल २०१० अण्णांनी १४ वे उपोषण केले ते सहकार चळवळीतल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात, सहकार कायद्यात आमूलाग्र बदल करावे या मागणीसाठी,. ठेवीदारांना ठेवी परत मिळाव्या यासाठी. १६ ते २० मार्च दरम्यान हे उपोषण झाले. सहकार कायदात सुधारणांची प्रक्रिया सुरू झाली. काही प्रमाणावर अण्णांना या उपोषणातही यश मिळाले .
आता वेळ होती अण्णांच्या १५ व्या उपोषणाची केंद्राला इशारा देऊनही सरकार जागे होत नव्हते, जनलोकपाल कायद्याच्या मंजुरीसाठी हे उपोषण होते, भ्रष्टाचाराच्या विरोधातले हे आंदोलन. साहजिकचं भ्रष्टाचाराने पोळलेल्या जनसामान्यांनी अण्णांना उत्स्फूर्त पाठिंबा दिला. ५ ते ९ एप्रिल २०११ रोजी हे उपोषण दिल्लीतल्या जंतर मंतर मैदानावर झाले. सरकारवर वाढलेल्या दबावाने सरकारनेनं अण्णांशी बोलणी सुरू केली. कायद्याच्या मसुद्यासाठी सरकारच्या ५ मंत्र्यासह अण्णा आणि त्यांच्या सिव्हिल सोसायटीच्या ५ सदस्यासह जॉइन्ट ड्राफ्ट कमिटी  स्थापन झाली अण्णानी उपोषण मागे घेतले.
माहिती अधिकार
हजार्‍यांनी माहितीच्या अधिकारासाठी आंदोलन केले. माहितीच्या अधिकार या विषयावर त्यांनी एक पुस्तक लिहिले आहे. या आंदोलनामुळे सरकारला माहितीचा अधिकार सर्वसामान्यांना देण्याचा कायदा संमत करावा लागला.


अण्णा हजारे
भ्रष्टाचार विरोध
लोकपाल कायदा
दोन सप्टेंबर २०११ पर्यंत(म्हणजे एकूण पंधरा दिवस) उपोषणाला परवानगी देतानाच रामलीला मैदानाचा काही भाग आंदोलनासाठी, तर काही भाग वाहनतळ म्हणून वापरण्याची अटही यात मान्य करण्यात आली होती. प्रशासनातर्फे रामलीला मैदानावर साफसफाई केली गेली. जयप्रकाश नारायण पार्कसारख्या छोट्या जागेऐवजी रामलीला मैदानासारखी मोठी जागा अण्णांना आंदोलनासाठी मिळाली. जयप्रकाश नारायण पार्कमध्ये केवळ पाच हजार आंदोलकांनाच परवानगी दिली जाणार होती, रामलीला मैदानात जागा भरेल इतक्‍या आंदोलकांना सहभागी होण्याची परवानगी मिळाली. अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्ली, चंदीगड, बंगळूर, चेन्नई, मुंबई, पुणे, कोलकता या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर निदर्शने करण्यात आली. दिल्लीमध्ये जंतर-मंतर व इंडिया गेट परिसरात आंदोलकांची गर्दी झाली होती. तिहारच्या बाहेर कार्यकर्त्यांची गर्दी होती आणि ते अण्णा हजारे तुरुंगाबाहेर येण्याची वाट पाहत होते. विविध राज्यांमध्ये झालेल्या आंदोलनांत तरुणांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. देशभरात गावोगावी, शहरांमध्ये निदर्शने, मोर्चे, रॅली, 'कॅन्डल मार्च' काढून लहान मुलांपासून ते तरुण, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक अशा समाजाच्या सर्व थरांतील घटकांनी अण्णांच्या आंदोलनाला भरभक्कम पाठिंबा व्यक्त केला होता.
नुकतेच २६ डिसेंबर २०११ रोजी मुंबई येथे त्यांनी दोन दिवसांचे उपोषण केले. त्यानंतर जानेवारी २०१३ मध्ये झालेल्या राळेगण येथील आंदोलनात सरकारने लोकपाल बिल मंजूर केले.